बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणचं घोडं चौफेर उधळलय. कोण काय करतंय, काय बोलतंय कशाचा कशाला ताळमेळ लागेना. हल्ली हल्ली हे राजकारण विकेंडच्या बैठकीसारखा वाटायला लागलंय. म्हणजे समजायला थोडा वेळ लागतोय, सुरुवातीला सगळं अंधुक अंधुक, नंतर एकदा का रक्तात भिनलं की, मात्र नशा उतरता उतरत नाही.

तर आपण सुरुवातच करु एका किश्श्यानचं, म्हणजे पिक्चर क्लिअर होईल.

२०१४ ची सांगली लोकसभा मतदार संघाची जागा संजय काका पाटील यांनी जिंकली. संजय काका भाजपाचे उमेदवार होते. आणि त्यांनी पराभूत केलेली जागा काँग्रेसची होती. आता त्यावेळी जेत्याच्या मस्तीतून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डिवचायला सुरुवात केली होती.

पण या डिवचाडीवचीने मन दुखावलं होत एका ७० वर्षीय दलित नेत्याचं, ते बोलण्याच्या ओघात म्हंटले की,

आमचं आयुष्य काँग्रेसचा नवरदेव नाचवण्यात गेलं. आमच्यातला तर कधी नवरदेवाच्या पाटावर बसू शकला नाही. आम्ही काँग्रेसच्या राज्यात कायम वाजंत्रीच झालोय. त्यामुळं तुम्ही काय आता चिडवू नगा.

महाराष्ट्राच्या राजकारणातली हीच मेख ओळखतं, अखंड महाराष्ट्रात बारा बलुतेदारांना ‘बहुजन वंचित आघाडीचा’ नवरदेव म्हणून उभं करायचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं होत. 

अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ तयार केला होता.

आंबेडकरांनी या पॅटर्नची गरज म्हणून नेतृत्व एकहाती ठेवत दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधली होती. यामुळेच अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळालं होत. अकोला जिल्हा परिषदेत दोन दशकांपासूनची सत्ता, मखराम पवार, दशरथ भांडे, रामदास बोडखे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार आदी आमदार असा या पॅटर्नचा इफेक्ट होता.

मात्र १९९९ नंतर आंबेडकर स्वत: लोकसभा निवडणुकीत सलग पराभूत झाले.

लोकसभेमुळे वंचितला शक्तिप्रदर्शन करण्याची एक संधी मिळाली 

२०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यांनी अठरापगड जातींच्या अस्मितेला फुंकर घालून धनगर, माळी, भटके अशा बारा बलुतेदारांच्या परिषदा घेऊन बहुजन मतांचा जागर केला.  तर दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणात आक्रमक भूमिका घेत दलितांची मते अन् मने एकवटण्याचाही प्रयोग केला.

२०१९ लोकसभा निवडणुकीत वंचितने एमआयएमसारख्या आक्रमक पक्षासोबत मैत्री करून निवडणूक लढविली. यात आंबेडकरांच्या झोळीत लोकसभेत ४२ लाख आणि विधानसभेत २७ लाख मतांची गंगाजळी मिळाली. यात काँग्रेस आघाडीचे वंचितनं मोठं नुकसान केलं होतं. वंचितच्या माध्यमातून आंबेडकरांचे उपद्रवमूल्य सिद्ध झालचं होतं.

त्यात ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी टीम’ आहे इथपासून तर आतातरी आंबेडकरांनी भाजपाविरोधात महाआघाडी निर्माण करुन आव्हान देण्याची गरज व्यक्त होऊ लागलीय.

ते कसं, तर असं..

२८ मे २०२१ ला मराठा आंदोलनाच्या संदर्भात संभाजी राजेंनी प्रकाश आंबेडकरांसोबत एक पत्रकार परिषद घेतली होती. यात आंबेडकर म्हणतात,

मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याचे संकेत दिलेत.  आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अकोल्यात केलंय. 

वंचितशी जुळवून घेण्याबरोबरच पटोलेंनी आघाडी बाबत काही सूचक दिशानिर्देश पण दिलेत..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला. शरद पवार यांनी २०२४ मध्ये ‘महाविकास आघाडी’ एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरही नाना पटोले यांनी शरद पवारांचा ‘एकी’चा दावा खोडून काढला.

पाटोले काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हणतात की,

शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र,पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार.

त्यांच्या या वक्तव्यातून आघाडीत बिघाडी असल्याचं तर दिसतयचं, पण वंचित बहुजन आघाडी  सोबत जाण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसचं सोशल इंजिनियरिंग डेव्हलप व्हायला सुरुवात झाल्याचं  दिसतयं.

२०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीच सरकार स्थापन करायचं होत, त्यावेळी शिवसेनेबरोबर जाण्यासाठी काही काँग्रेसजन तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होत की शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची पुरोगामी प्रतिमा मलीन होण्याचे चान्सेस आहेत.

आता हे खरचं घडतंय,

शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यात आणि काँग्रेसच्या हातात नाहीयेत सत्तेच्या चाव्या. मुख्यमंत्री पद सेनेकडे तर सत्तेतली सगळी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे. सत्ता टिकवण्यासाठीच  फक्त काँग्रेसचा आधार घेतला जातोय. राज्यात जे काही निर्णय घेतले जातायत त्यात सेनेचा आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे.

आत्ताचा पदोन्नतीत आरक्षण रद्दचा मुद्दा याच ताजं उदाहरण आहे. त्यामुळं काँग्रेसची पुरोगामित्वाची प्रतिमा मलीन झालीय. 

त्यात सत्तेत असतानाच जर शिवसेना कट्टरतावादाकडे वळली तर काँग्रेसला गैरसोयीच ठरु शकते. कारण काँग्रेसचा आजवरचा आधार तळागाळातल्या अठरापगड जातीं, मुस्लिम, दलित आहेत. सेनेबरोबर सत्तेत येऊन काँग्रेसने अशा जातींना काही अंशी दुखावलंय. आत्ताचा काळ हा काँग्रेससाठी संक्रमण अवस्थेचा जरी असला तरी काँग्रेस नव्या पर्यायांचा विचार करतंय. त्यामुळं बुडत्या काँग्रेसला पुन्हा एकदा अठरापगड जातींचा आधार वंचित बहुजन आघाडीमार्फत मिळू शकतो.

थोडक्यात पुरोगामी प्रतिमा टिकवायला वंचित मेन फॅक्टर ठरु शकतो.

दुसरं म्हणजे, काँग्रेसच्या नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला. आता भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी उघडण्याच्या विरुद्ध जाऊन जर स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसला मित्र पक्षाची गरज आहेच. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जाऊ अशा वल्गना करून काँग्रेस मित्रपक्षांना एक प्रकारचा इशारा देतोय असं पण वाटतं.

तिसरं म्हणजे, युपीत पुढच्या वर्षी इलेक्शन होणार आहेत. वर दिल्याप्रमाणे संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर या निवडणुकांआधी बहुजन समाजाच्या वतीनं दिल्लीत गोलमेज परिषद घेण्याच्या तयारीत आहेत.

यापूर्वीच्या इतिहासात बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते म्हणून गोलमेज परिषदेला गेले होते.

आत्ताच्या होणाऱ्या परिषदेचा फायदा नकळतपणे भाजपाला होताना दिसतो. कारण संभाजी राजे हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. आणि प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू म्हणून आणि दलितांचे नेते म्हणून गोलमेज परिषदेला येणार ही प्रतिमा भाजपकडून रंगवली जाणार. थोडक्यात प्रकाश आंबेडकरांची प्रतिमा वापरुन भाजपाला दलित मतांचं ध्रुवीकरण करून आपल्या पदरात ती मत पाडता येऊ शकतात.

चौथं म्हणजे राज्यात २०१९ च्या लोकसभेत जशी मत वंचितने खाल्ली तशीच मत येणाऱ्या निवडणुकांमध्ये खाणार. याचा फटका तिसऱ्या आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (शरद पवारांनीच कालच तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे.)

या युपी इलेक्शन आणि पुढची येणारी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन वंचितला आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी नाना पटोलेंचा सहभाग महत्वाचा ठरू शकतो. कारण राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकरांचं सख्य नाही हे जगजाहीर आहे. आणि पाठिंब्याची बोलणी फक्त नाना पटोलेंच्या मध्यस्थीनेच होऊ शकते.

त्यामुळं सध्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचा भाव वधारताना दिसतोय. आता वाटाघाटी करण्यात हे काँग्रेस नेते कमी पडले नाहीत म्हणजे मिळवलं. नाहीतर पुन्हा एकदा मतं खाऊन वंचित टुम्म होईल. भाजप सत्तेत येईल आणि तिसरी आघाडी भाजपच्या तोंडाकडे बघत राहील.

थोडक्यात काँग्रेसने पहिले पाढे पंचावन्न गिरवले नाहीत म्हणजे मिळवलं.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.