भाजपच्या होर्डिंग्सवर कॉंग्रेस, सेना, MIM ; पुण्यातला पॅटर्न देशात गाजला पाहीजे भिडू…

डिजीटल किंवा होर्डिंग लावणं ही काय लय मोठ्ठी गोष्ट नाही, हजारभर रुपयात होर्डिंग होतो. एक चौक बघायचा चार कार्यकर्त्यांना कामाला लावायचं आणि द्यायचा लटकवून. होर्डिंग नेत्याचा असला तर प्रशासनवाले पण विचारायला येत नसतात.

या होर्डिंगच्या प्रोसेसमधली अवघड गोष्ट फक्त एकच असते ती म्हणजे कार्यकर्त्यांची नाव चुकवून न देणे. नावं आणि फोटो कंडका असली की विषय कट,

लय काय डोक्याला शॉट देणारं प्रकरण नसतय हे…

थोडक्यात कसय अशा होर्डिंगकडे लक्ष न देणं हाच उत्तम पर्याय असतो. तस आम्ही कधी अशा होर्डिंगकडे लक्ष देत नाहीच पण सकाळी चुकून एका होर्डिंगकडे लक्ष गेलं. झालं अस की या होर्डिंगवर फक्त तीनच माणसांचे फोटो होते.

“अभिमान पुण्याचा” अस ठसठशीत लिहण्यात आलं होतं…

यात एक ओळखीचे शिवसैनिक होते. साहजिक होर्डिंग्स पण शिवसेनेने लावले असणार. म्हणून नेत्यांचे फोटो बघितले तर एकाही नेत्याचा फोटो नाही. कोपऱ्यात बघितलं तर चक्क भारतीय जनता पार्टी, पुणे असं लिहलेलं दिसलं..

आयच्या गावात…

भाजपच्या होर्डिंगवर शिवसैनिकाचा फोटो, तेही तोंडभरून कौतुक करणारा….

ऑफिसला येवून मित्राला ही गोष्ट सांगितलं तर मित्र म्हटला त्या पोस्टरवर फक्त शिवसैनिकचं नाहीत तर MIM आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे देखील लोक आहेत. म्हटलं माहिती तर घ्यायला पाहीजे. एकेकाची माहिती घेत गेलो.

यातले पहिले व्यक्ती होते ते म्हणजे कॉंग्रेसचे किरण सावंत.

गेल्या ३० एक वर्षापासून पक्के कॉंग्रेसी असणारे किरण सावंत. यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी मोफत सॅनिटायझेशनचं काम केलं. कोरोनाच्या सुरवातीच्या काळातच त्यांची नोकरी गेली. दूसरीकडे कोरोनामुळे त्यांच्या भाच्याचा मृत्यू झाला. एखाद्याची नोकरी गेली असेल तर तो आहे ती बचत संभाळून ठेवण्याचा मार्ग स्वीकारतो, पण किरण सावंत त्यातले नव्हते. त्यांना पहिल्या लाटेतच माहिती मिळाली की कोरोनाचा सर्वाधिक प्रसार हा एखाद्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू पसरल्यामुळे झाला आहे.

तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन, स्मशानभूमी, सोसायट्यामध्ये मोफत सॅनिटायझेशन करण्यास सुरवात केली. हे काम करत असताना त्यांच्या डोळ्यांवर औषधांचा दुष्परिणाम झाला. त्यातून दृष्टीदोष झाला तरीही त्यांनी हे काम थांबवल नाही…

दूसरे व्यक्ती होते जावेद खान. जावेद खान हे कट्टर शिवसैनिक.

तरिही त्यांचा फोटो भाजपच्या होर्डिंग्सवर आहे. त्यांच कारण म्हणजे ते आणि त्यांचे सहकारी न थकता पहिल्या लाटेपासून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांच्या या कामात कुठे धर्म आडवा आला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर मृतांच्या जवळ देखील कोण जात नसे अशा काळात त्यांनी रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी अंगावर घेतली जी आजही अविरतपणे चालू आहे..

तिसरे व्यक्ती म्हणजे MIM चे अंजूम इनामदार…

अंजूम इनामदार व त्यांचे अठरा सहकारी देखील अत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या माध्यमातून आजवर चौदाशे अंत्यसंस्कार पार पडले आहेत. त्यांच्या कामाबद्दल त्यांना विचारलं तर ते म्हणतात एक दिवस येईल जेव्हा ही संख्या शून्य होईल आणि या कारणासाठी कोणाच्याही घरी जावं लागणार नाही. त्यांचा सन्मान भाजपमार्फत करण्यात आला आहे.

चौथे व्यक्ती म्हणजे अण्णा थोरात.

अण्णा थोरात राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहेत. ते पुण्याचे पहिले शहराध्यक्ष होते. पण राष्ट्रवादीपेक्षा त्यांची पुणेकरांना ओळख म्हणजे अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे सर्वेसर्वा. म्हणजे थोरात बंधु आणि मंडई हे पुणेकरांसाठी खास ओळखीचं समीकरण.

त्यांच काम सांगायचं तर जेव्हा कोरोना आला तेव्हापासून पोलीसांवर ताण निर्माण झाला. सर्व काही बंद असल्याने पोलीसांची जेवणाची सोय होत नव्हती. अशा काळात अखिल मंडई गणेशोत्सव मंडळामार्फत ते कोरोना काळात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीसांच्या जेवणाची सोय करत होते.

आत्ता एकतर पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत. अशा वेळेस पुणे भाजप मार्फत इतर पक्षातील व्यक्तींना देखील होर्डिंग्सवर स्थान दिल्याने तो चर्चेचा विषय ठरणारच.

पण ही कल्पना नेमकी कोणाची याची माहिती घेतल्यानंतर सभागृह नेते गणेश बीडकर यांच नाव समोर आलं. लागलीच त्यांना फोन करून विचारलं.

बोलभिडू सोबत बोलताना ते म्हणाले,

या लोकांनी काम करत असताना पक्षीय मतभेद ठेवले नाहीत. आम्ही सर्वजणच पक्ष, राजकीय विचार याच्या पलीकडे जावून काम करत राहिलो. अशा वेळी त्यांचा सन्मान करताना पक्ष पहाणं म्हणजे मनाचा कोतेपणा दाखवण्यासारखं होईल अन् ती गोष्ट कधीच झाली नसती.

दूसरीकडे आम्ही काहीतरी विशेष केल आहे असही आम्हाला वाटतं नाही. एकजुटीने समाज उभा राहतो तेंव्हा डोंगराऐवढी संकटेही सपाट होतात. ते पुण्यात होतांना आम्ही पाहीलं, त्याचं कौतुक तर झालेच पाहिजे, आमचं कर्तव्य आम्ही केलं इतकेच !!

थोडक्यात काय तर भाजपची भूमिका आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केल्याची आहे. संकटाच्या काळात असाच मनाचा मोठ्ठेपणा सगळ्यांनीच दाखवायला पाहीजे मग ते कार्यकर्ते असोत की नेते, अन् असा पुणेरी पॅटर्न देशभरात गाजायला हवा कारण तिच आत्ताची गरज आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.