उपकाराची परतफेड म्हणून पोलंडदेशाचे नागरिक कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करणार.

कृष्णा-पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुराने कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांची अपरिमित हानी झाली. अनेक गावं वाहून गेली, कित्येकांचे संसार उघड्यावर आले. असा अभूतपूर्व महापूर कित्येक पिढ्यांमध्ये पाहिला नव्हता. अनेक तरुणमंडळे मदतीला धावली. एनडीआरएफच्या खांद्याला खांदा लावून पूरग्रस्तांना संकटातून सोडवण्याच काम सुरु झालं. एवढच नाही तर ठिकठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु झाला.

फक्त राज्यातूनच नाही तर देशोदेशीची मदत सध्या कोल्हापूर सांगलीच्या पूरग्रस्तांना होत आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरचे युवराज व राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आठ देशांच्या राजदूतांनी भेटून आपली मदत देऊ केली. यातच आघाडीवर होते पोलंड देशाचे राजदूत.

आता तुम्हाला वाटेल हजारो किलोमीटर दूर वर असलेला हा छोटासा देश, यांना का कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करावीशी वाटत आहे? यालाही ही एक ऐतिहासिक कारण आहे.

हिटलरच्या छळछावणीपासून जीव वाचून आलेले ५००० पोलिश स्त्रीपुरुष १९४३ ते १९४८ या सालात कोल्हापूरमध्ये आश्रयास होते.

ऐकून धक्का बसला ना ?

होय. आज पुराचा मोठा फटका बसलेल्या वळीवडे गावात पंचगंगा नदीच्या किनाऱ्याजवळच पोलंडमधल्या निर्वासितांची छावणी होती. कोल्हापूरच्या संस्थानिकांनी त्यांना तिथे वसवलं होतं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने पोलंडवर आक्रमण केले. अनेक ज्यूंची निर्घृण हत्या केली. त्यावेळी अनेक पोलंडवासीय आधी रशियाला आसरा शोधायला गेले. सुरवातीला युद्धबंदी म्हणून रशियाने त्यांचा वापर केला पण त्यांचा सांभाळ सुद्धा केला. मात्र ज्यावेळी रशिया जर्मनीच्या विरुद्ध युद्धात उतरली तेव्हा त्यांना या पोलिश लोकांचा सांभाळ करणे परवडेनासे झाले. अशावेळी मग युद्धकालातल्या पोलंड सरकारने जगभरात आमच्या निर्वासितांची सोय करा अशी विनंती केली.

या हाकेला साद दिली भारताला कोल्हापूर आणि जामनगर या संस्थानांनी.

गुजरात जामनगरच्या बालाचडीमध्ये ५०० आणि कोल्हापूरच्या वळीवडे गावात ५००० पोलिश लोकांची राहायची सोय करण्यात आली. पाण्यासाठी हौद बांधण्यात आला होता. एक छोटे हॉस्पिटल आणि एक शाळा सुद्धा उभारण्यात आली होती. पूर्ण कॅम्पच्या सभोवताली कुंपण उभारण्यात आले होते. त्याच्या रखवालीसाठी शस्त्रधारी सैनिक चोवीस तास तैनात असायचे.

अखेर रेल्वेने हे पोलंडवासीय कोल्हापुरात पोहचले.

काही दिवसापूर्वी वळीवडे कॅम्पमध्ये राहून गेलेल्या झेडजीस्ला उर्फ सॅम पिटूरा आणि टेडीस्युझ उर्फ टेड  पिटूरा हे आपलं बालपण गेलेलं गाव पाहायला आले होते. त्यांना भेटायची संधी आमच्या टीमला मिळाली.

टेड कोल्हापुरात आला तेव्हा तीन वर्षाचा होता तर सॅमचा जन्मच मुळी वळीवडे कॅम्प मध्ये झाला. प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्यांनाही दोनखोलीची बराक राहण्यासाठी मिळाली होती. फक्त इतर कुटुंबामध्ये वडील लोकांना युद्धात लढण्यासाठी जावे लागले होते, पण टेड आणि सॅमचे वडील अपंग असल्यामुळेते वळीवडे कॅम्प मध्येच शिंपीकाम करायचे. तर त्यांची आई हॉस्पिटल मध्ये नर्स होती. एकंदरीत टेडला आठवते तसे त्या कॅम्पमध्ये स्त्रियांचेच वर्चस्व जास्त होते.

सुरवातीला गावकऱ्यांशी त्यांना जास्त संपर्क ठेवण्याची परवानगी नसायची. पण तरीही दुध घालायला येणाऱ्या स्त्रिया, ब्रेड आणि इतर वस्तू विकणारा किराणा दुकानदार साफसफाईला येणारे लोक यांच्याशी हळहळू पोलिश लोक मिसळू लागले. पोलिश सणसमारंभ त्यांनी कोल्हापुरात साजरे केले. भारतीय दिवाळी, रंगपंचमीसारख्या सणाची त्यांना उत्सुकता असायची. अधे मध्ये पिक्चर दाखवले जायचे. आसपासच्या उसाच्या शेतात, पंचगंगेच्या तीरावर त्यांच्या छोट्या छोट्या ट्रीप निघायच्या.

पिटूरा बंधूना वळीवडे स्टेशन पासून ते आत्ता भग्नावस्थेत असलेल्या त्यांच्या शाळेपर्यंतचा तो प्रवास भरून येणारा होता. हिटलरसारख्या क्रूरकर्म्यापासून जीव वाचवून निघालेली ही मंडळी कोण कुठल्या देशात आली. या मातीने त्यांना आपलं मानून त्यांचा संभाळ केला. कोल्हापूरशी ऋणानुबंध या पोलंडवासियांचे निर्माण झाले.

बालपणीचे टेड आणि सॅम वळीवडे कॅम्प मध्ये.

टेड आणि सॅमच्या आईने मारियाने त्यांना एक खूप हृद्यस्पर्शी आठवण सांगितली होती. सॅमचा जन्म नुकताच झाला होता. आणि कॅम्प मध्ये एक ओली बाळंतीण साफसफाईच्या कामाला आली होती. ती जवळपासच्याच कुठल्यातरी खेड्यातली असेल. त्या आईचे दुध आटले होते. आणि तीच बाळ दुधाविना रडत होते. हे बघून मारियामधल्या आईचा पान्हा फुटला. तिने त्याबाळाला आपल्या छातीशी धरून त्याला दुध पाजले. कोल्हापूरच्या मातीने केलेल्या उपकाराची परतफेड त्या माउलीने आपलं दुध पाजून केली.

आठवड्यातून एकदा कोल्हापूर शहरातून पद्मा स्काउट पथकातील मुलं खास या कॅम्प मधल्या मुलांशी फुटबॉल खेळण्यासाठी जायची. पिटूरा बंधूना कोल्हापूरच्या महावीर उद्यानातल्या पोलिश स्मारकाजवळ या पद्मा स्काउट मधले बापू शिंदे आणि ज्ञानदेव जाधव हे जुने सवंगडी खास भेटीसाठी आले होते. नव्वदीच्या घरात पोहचलेली ही सगळी मंडळी मात्र जुन्या उत्साहाने एकमेकांना भेटली.साऱ्यांनी मिळून पोलिश गीत गायली. सुखादुखाच्या गोष्टी शेअर केल्या.

 

पोलंडचे पिटूरा बंधू आपल्या कोल्हापूरच्या सवंगड्यासोबत आठवणीचे क्षण वाटून घेत असताना.

कॅम्प मधली पोलिश वांडा कोल्हापूरच्या तरुणाच्या प्रेमात पडून वांडा काशीकर झाली.

नऊवारी नेसून गंगावेस जवळच्या आपल्या अत्तराच्या दुकानात मालकीणबाईच्या थाटात कोल्हापुरी मराठी बोलत लक्ष ठेऊन बसायची. काही वर्षापूर्वी तिचं निधन झालं.

१९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर आणि दुसरे महायुद्ध संपल्यावर हे पोलंडवासी आपल्या देशी परत गेले. त्याच कॅम्प मध्ये भारत सरकारने पाकिस्तानातून फाळणी नंतर भारतात आलेल्या सिंधी लोकांची राहण्याची सोय केली. निर्वासितांना आश्रय देण्याची कोल्हापूरची परंपरा चालूच राहिली. आज या कॅम्पच्या जागी गांधीनगर म्हणून मोठे कपड्यांचे सिंधी मार्केट उभे आहे. तरीही कॅम्प चे छोटे अवशेष पहावयास मिळतात.

आता तो काळ अनुभवलेले लोक हळहळू आपल्यातून कमी होत आहेत. तरीही या सगळ्या दुव्यांना जोडून ठेवणारा हात म्हणजे कोल्हापूरचे कर्नल विजयसिंह गायकवाड. इंडोपोलिश असोसीएशनचे ते अध्यक्ष आहेत. पोलंड मधून आपल्या आश्रयभूमीकडे येणाऱ्या प्रत्येक पोलिश व्यक्तीचा ते पाहुणचार करतात. या इतिहासाचा एक भाग ते स्वतः जगत आहेत. स्वतः ऐंशी वर्षाचे तरून असून आजही पोलंडच्या कोल्हापुरातल्या या इतिहासाचे एखादे म्युझियम उभारावे, एखादी डोक्युमेंट्री बनावी यासाठी ते प्रयत्नशील असतात . शासन दरबारी खेटे मारत असतात.

पोलंडवासियांनी भारताचे हे उपकार कधीच विसरले नाहीत.

स्वतः पारतन्त्र्यात असूनही आपण आपल्याहून वाईट स्थितीत असणाऱ्या परदेशी पाहुण्यांची काळजी घेतली या बद्दल ते कायम ऋणी असतात. ज्या पंचगंगेने त्यांना आधार दिला तिच्या रौद्ररूपाने आपल्या अन्नदात्या कोल्हापूरवासियावर संकट ओढवले. अशावेळी पोलंडवासीय मागे कसे राहतील? कोल्हापूरवासीयांच्या ऋणाची परतफेड करण्याची संधी म्हणून त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे. या कामी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे.

शिवाय येत्या १४ सप्टेंबरला पोलंडचे उपपंतप्रधान पियोट्र ग्लीन्स्की हे भारतात छावणीमध्ये राहून गेलेल्या २० जेष्ठ नागरिकांना घेऊन येणार आहेत. या प्रसंगी एका मोठ्या समारंभाचे आयोजन केले जाणार असून पोलंडवासीयांच्या आठवणींच्या वस्तूसंग्रहालयाची पायाभरणीसुद्धा केली जाईल.

सहाय्य –  भूषण टारे आणि रणजीत यादव. 

हे ही वाच भिडू.