ईडन गार्डनवर पेटलेल्या दंगलीतही या खेळाडूने भारताचा व वेस्ट इंडिजचा झेंडा वाचवला..

१९६६ साली वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तीन टेस्ट सामने खेळले जाणार होते. भारताची धुरा त्यावेळेस एम. ए. के. पतौडी यांच्याकडे होती व वेस्टइंडीजची धुरा सर गॅरी सोबर्स यांच्याकडे. पहिला टेस्ट सामना वेस्टइंडीजने सहा विकेटने जिंकला. दुसरा सामना हा कोलकत्ता मध्ये ईडन गार्डनवर होणार होता. ३१ डिसेंबर १९६६ रोजी दुसरा सामना सुरु झाला. पहिला दिवस सुरळीत पार पडला. दुसरा दिवस नवीन वर्ष घेऊन उजाडला. १ जानेवारी १९६७ रोजी सामन्याचा दुसरा दिवस खेळला जाणार होता.

सामना सुरू झाला आणि अचानक सर्व वातावरणच बदलून गेले. खेळाची वेळ होताच वेस्ट इंडिज चे दोन्ही फलंदाज क्रिजपाशी आले. अंपायर आपल्या जागेवर उभे राहिले. सर्व खेळाडू आपआपल्या पोझिशन वर थांबले. खेळ सुरु झाला. बॉलर बॉल टाकणार तेवढ्यात दंगल सुरु झाली. 

हजारो लोक मैदानात उड्या मारून घुसले. पोलिसही आले, धक्काबुक्की सुरू झाली. यातूनच बघता-बघता मैदानाला युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांनी लाठीहल्ला केला, अश्रुधूर सोडला. 

भारताचे कर्णधार पतौडी यांनी आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन पॅव्हेलियन गाठले. सर्व खेळाडू पॅव्हेलियन मधून समोरची दंगल पाहत होते. वेस्टइंडीज खेळाडूंनी तर ड्रेसिंग रूमच्या दार आणि खिडक्या सुद्धा आतून बंद करून घेतल्या. तरीही अश्रुधुर ड्रेसिंग रूममध्ये येत होता. टॉवेल ओले करून खेळाडूंनी ते डोळ्यावर धरले. पण इतक्यात जाळपोळीचे प्रकार वाढल्याची बातमी समोर आली.

पॅव्हेलियनच्या दिशेने एक मोर्चा येत होता. हे कळताच सर्व खेळाडू मागच्या दाराने ड्रेसिंग रूमच्या बाहेर पडले आणि पटकन हॉटेल कडे पळाले.

पण सर्व खेळाडूंपैकी एक खेळाडू मात्र ड्रेसिंग रूममध्येच थांबला. त्याने ड्रेसिंग रूममधले सर्व लाकडी सामान बाजूला काढले. आणि खेळाडूंचे सामान दुसर्‍या कोपर्‍यात नेऊन ठेवले. त्याने तब्बल अडीच तास घालवून हे काम केले. आणि नंतर स्वतः एका बॅगवर बसून सामानाचे रक्षण करत तिथेच बसला.

त्या खेळाडूचे नाव होते ‘कॉनरॅड हंट’. तो वेस्टइंडीज चा ओपनिंग फलंदाज होता. त्याच्यासोबत त्याचा फिजियोथेरेपिस्ट सुद्धा त्यावेळेस तिथं होता.

एवढ्यात पॅव्हेलियन चा एक भाग पेटला. त्या पॅव्हेलियनवर भारताचा आणि वेस्टइंडीजचा राष्ट्रीय ध्वज होता. हंटला काय करु आणि काही नाही असे झाले. हळूहळू आगीचे झोळ हे ध्वजांच्या दिशेने वर सरकत होते. कशाचाही विचार न करता हंट तातडीने जागचा उठला आणि जीवाची पर्वा न करता  ध्वजांच्या दिशेने धावला. त्याला ते ध्वज वाचवायचे होते.

एका पोलिसाच्या मदतीने त्याने ते दोन्ही ध्वज सुरक्षितपणे उतरवले. तेव्हा कुठे हंटने सुटकेचा श्वास सोडला. हंटमुळे दोन्ही राष्ट्राचे ध्वज वाचले होते. आणि त्याची विटंबना टळली होती. 

थोड्यावेळाने दंगल शमली. पण सामन्याचे भवितव्य धोक्यात आले होते. हंट हॉटेलमध्ये परतला. सगळेजण त्याचीच वाट पाहत होते. काहीजण तर त्याला शोधण्यासाठी परत ग्राऊंडवर गेले होते. हंट येतोय हे दिसताच सगळेजण ओरडले,

“Here Comes The Hero !”

तिथं गेल्यावर हंटच्या लक्षात आलं की, त्या दिवशीचा खेळ तर स्थगित झाला होताच पण संपूर्ण दौराच रद्द होण्याची वेळ आली होती. 

सामना किंवा दौरा रद्द होऊ नये असे हंटचे मत होते. पण बाकीचे सर्व त्याच्या विरुध्द मताचे होते. गॅरी सोबर्सने खेळाडूंची एक मिटिंग घेतली. त्यात त्याने सांगितल की, ” हे बघा मित्रांनो, आपण हा सामना खेळायला तयार आहोत की नाही याविषयी भारतीय नियामक मंडळाला निर्णय हवाय. तेव्हा आत्ताच निर्णय घेतला पाहिजे. मी तरी खेळायला तयार नाही. अशा या दंगलग्रस्त वातावरणात मी कसलाही धोका पत्करायला तयार नाही.” बहुतेक सगळ्यांचच मत गॅरी प्रमाणेच होत.

हंटच्या मनात मात्र दंगल शमल्यावर खेळाव अस होत. त्याने गॅरीला सांगितलं की,

“भारतीय क्रिकेट मंडळा आपल्या संरक्षणासाठी का उपयोजना करणारेत ते समजून घेऊ आणि मगच उद्या निर्णय देऊ”.

सगळ्यांनी हंटला सहमती दर्शवली.पण सोबर्सला हे पटत नव्हतं. तो हंटला तिरस्काराने म्हंटला की, “मी काही तुझ्यासारखा शांतिदूत नाही, समजलं.”

हंटचा प्रस्ताव सर्वांनी मान्य केला. खेळाडूंच्या संरक्षणाची जय्यत तयारी केली गेली. हेलिकॉप्टर्स आणि जिप्स सुद्धा मदतीला उपलब्ध करून ठेवले गेले. पतौडीनी सुद्धा गॅरी सोबर्सची समजूत घातली.

“आपण खेळलो तर आपल्याला संरक्षण मिळेलच, पण जर खेळलो नाही तर लोकांना आपल्याबद्दल गैरसमज होईल. त्यापेक्षा आपण खेळू.”

पतौडीच्या म्हणण्याला सर्वांनी होकार दिला. 

हंटने राष्ट्रीय ध्वज तर वाचवलेच होते. पण त्याच्या पुढाकारामुळेच पुढे सामना चालू राहिला आणि अत्यंत शांततेत पार पडला.

  • कपिल जाधव

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.