बंडखोर आमदारांची ठाकरेंबद्दलची मवाळ भूमिका पाहता प्लॅन B पुन्हा शिवसेनाच आहे का ?

शिवसेनेत बंड झाल्यापासून एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते आहे ती म्हणजे बंडखोर आमदार ठाकरे कुटुंबावर बोलणं टाळत आहेत. एकनाथ शिंदे गटातील आमदार शरद पवार, संजय राऊत यांच्यावर तुटून पडतायेत पण ठाकरे घरण्याबद्दल एक शब्द वाकडा बोलत नाहीयेत.

एवढाच नाही तर भाजपच्या नेत्यांनाही तसं बोलू देत नाहीयेत. किरीट सोमय्यांनी जेव्हा ठाकरेंवर टीका केला तेव्हा सेनेच्या बंडखोर आमदारांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे मातोश्रीशी बंडखोर  आमदार अजूनही चांगले संबंध राखून ठेवण्याच्या मताचे दिसतात.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे अजूनही अधून मधून आमदारांना परत येण्याचं आव्हान करताना दिसतात. आमदारांच्या परतीचे दोर कापल्याचही उद्धव ठाकरे स्पष्टपणे सांगत नाहीत.

या सगळ्यामुळे बंडखोर आमदारांचा सेनेत परत जाण्याचा बॅक अप प्लॅन असेल का? अशी चर्चा देखील चर्चा होत आहेत.. 

ठाकरे पितापुत्रांचे आवाहन आणि बंडखोर आमदारांची भूमिका..

बंडखोरी झाल्यापासून ठाकरे पिता पुत्रांनी बंडखोर आमदारांना अनेकदा आवाहन केले आहे. या आवाहनांमध्ये काही वेळेस कठोर भाषा वापरली आहे तर काही वेळेस भावनिक आवाहन केले आहे. 

अपवाद वगळता शिंदे गटातील आमदारांनी सुद्धा ठाकरे कुटुंबावर बोलण्याचे आजपर्यंत टाळले आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना माफिया म्हटल्या नंतर, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मात्र उलट सोमय्या यांचीच कानउघाडणी केली होती.

केसरकर यांनी म्हटलं कि, “आजही आम्ही शिवसेनेत आहोत आणि उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणत्याही भाजप नेत्याने प्रतिमा मालिन करणारे वक्तव्य करू नये.” असं त्यांनी सांगितलं होतं. 

बंडखोर आमदारांची उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्याची भूमिका..

सेनेच्या बहुतांश बंडखोर आमदारांनी ठाकरे कुटुंबाबद्दल कोणतेही अपशब्द किंवा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल बोलणं टाळलं आहे. त्याउलट उद्धव साहेबांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी साद केसरकरांनी उद्धव ठाकरेंना घातलीय. 

बंडखोर आमदारांच्या शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या भूमिकेमुळे आमदारांचा सेनेत परत जाण्याचा बॅक अप प्लॅन असण्याची दाट शक्यता असल्याचे विश्लेषक सांगतात. 

बंडखोर आमदारांच्या या भूमिकेला हे फॅक्टर कारणीभूत आहेत..

ठाकरे कुटुंबाचा शिवसेनेवर असलेला प्रभाव.. 

शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं मानलं जायचं त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब हे समीकरण फार घट्ट आहे. यात जर ठाकरे कुटुंबावर टीका केली तर सामान्य शिवसैनिक दुखावला जाण्याची शक्यता आहे.  

आजही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर ठाकरे कुटुंबाचा शब्द प्रमाण मानतात. राज्यात बाळासाहेबांना दैवत मानणारा  शिवसैनिक मोठा वर्ग आहे. जर ठाकरे परिवारा टिका केली तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबावर बोलतांना बंडखोर आमदारांकडून काळजी घेतली जात आहे.  

पक्षाची विचारसरणी आणि भूमिकांचा प्रभाव..

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली असली तरी हिंदुत्वाची भूमिका सोडलेली असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी सांगितले होते. सत्तेच्या शेवटच्या दिवसात महाविकास आघाडी सरकारने  औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला.

तसेच मराठी भाषा, मराठी माणूस या सेनेच्या जमेच्या मुद्यांवर आणि स्थानिक राजकारणात ठाकरे कुटुंबाची भूमिका महत्वाची ठरेल याची जाणीव बंडखोर आमदारांना असल्याने बंडखोर आमदारांकडून सबुरीचा भूमिका घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपवर दबावाचे राजकारण सुरु ठेवणे..

भाजप प्रादेशिक पक्षांशी आघाडी करतो मात्र त्यांनतर त्या पक्षांचे खच्चीकरण करून आपल्या पक्षाचा विस्तार करतो अशी टिका नेहमी केली जाते. भाजपची अशीच पारंपरिक खेळी जर शिंदे गटाच्या बाबतीत खेळली गेली तर सुरक्षित पर्याय म्हणून शिवसेनेचं दार उघडं ठेवणे बंडखोर गटासाठी गरजेचं असेल.

सोबतच आपल्यासाठी जुना मार्ग सुरक्षित असल्याचे दाखवत नवीन सत्तेमध्ये जास्त पदे आपल्याकडे मागण्यातही बंडखोर गटाला याचा फायदा होईल असं सांगितलं जातंय.

भाजप आपल्या पारंपरिक पद्धतीचा वापर बंडखोर गटाच्या बाबतीत करत असेल तर हा सुरक्षित मार्ग भाजपला दबावात ठेवेल असं सांगितलं जातंय.

शिवसेनेवर पुन्हा क्लेम करण्यासाठी टिका टाळून साद घातली जातेय.. 

शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरी केली असली तरी शिवसेना पक्ष आणि पक्ष्याच्या भूमिकेला सोडलेलं नाही. त्यामुळे जर त्यांना भविष्यात पुन्हा मुख्य गटावर क्लेम करायची वेळ आल्यास दोन्ही पक्षात जास्त कटुता नसावी म्हणून ठाकरे कुटुंबावर टीका टाळली जातेय असं सांगितलं जातंय. 

टोकाची भूमिका घेतल्यांनंतर परत पक्षात जाण्याचे मार्ग खडतर होतात हा राजकारणातला सार्वत्रिक अनुभव असल्याचे सांगितले जाते. मात्र अशा चुका टाळल्यास बंडखोर आमदारांना सहज शिवसेनेत परत जात येईल असं  विश्लेषक सांगतात.  

सेनेचा दरवाजा सदैव उघडा राहण्यासाठी.. 

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं होतं. यात ते म्हणाले होते की, “गद्दार ते गद्दारच असतात मात्र ज्यांना पक्षात परत यायचं असेल त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.” 

तसेच  उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या १५ आमदारांना पत्र लिहिलंय. या पत्रामधून त्यांनी आमदारांना “आईच्या दुधाशी बेईमानी करू नका” असं भावनिक आवाहन केलंय. 

बंडखोर गटातील काही आमदारांना उद्धव ठाकरे भेटत असल्याचा दिपक केसररांनी केलेला खुलासा आणि ठाकरे कुटुंबाकडून आमदारांना केलं जाणारं आवाहन हे आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच होत असल्याचे विश्लेषक सांगतात.   

सेनेच्या बंडखोर आमदारांची भूमिका आणि ठाकरे कुटुंबाच्या आवाहनांना बघून बंडखोर आमदारांनी आपला बॅक अप प्लॅन अजूनही तयार ठेवल्याचे दिसते. तसेच या बॅक अप प्लानचा फायदा त्यांना भविष्यातील निर्णय घेण्यात महत्वाचा असेल हेच यावरून दिसते..

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.