कॉंग्रेसपासून भाजपपर्यंत सगळेच बलात्कार प्रश्नावर ‘वाचाळवीर’…!!!

‘कठूआ’ आणि ‘उन्नाव’ येथील बलात्कारांच्या घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजलेली असताना या प्रकरणातील गुन्हेगारांचं वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करणारी विकृत मानसिकता ही आपल्या आजूबाजूलाच आहे. बलात्कारासारख्या क्रूर घटनेचं समर्थन करण्यासाठी जात,धर्म, वंश इतकंच काय तर तिरंग्यासारख्या राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला जातोय. आपल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा यात सम-समान पातळीवर सहभाग आहे. ही यादी आहे अशाच काही नेत्यांची ज्यांनी बलात्काराच्या संदर्भात विवादास्पद वक्तव्ये देऊन आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलंय…!!!

  • मीनाक्षी लेखी – भाजप

सर्वोच्च न्यायालयाच्या वकील असणाऱ्या मीनाक्षी लेखी या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. ‘कठूआ’ आणि ‘उन्नाव’ प्रकरणात भाजपच्या मंत्र्यांवर आरोप आहे. उन्नाव प्रकरणात भाजपचे ‘कुलदीप सिंग सेंगर’ हे थेट आरोपी असून कठूआ  प्रकरणात आरोपींच्या समर्थनात निघालेल्या मोर्चामध्ये भाजपचे मंत्री सहभागी होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मीनाक्षी लेखींनी दोन्हीही प्रकरणांना विरोधकांचे षडयंत्र जाहीर केलं. आधी ते ‘अल्पसंख्यांक-अल्पसंख्यांक’ असं ओरडायचे, नंतर ते ‘दलित-दलित’ ओरडायला लागले आणि आता ते ‘महिला-महिला’ ओरडताहेत, असं त्या म्हणाल्या. काँग्रेसने यापूर्वी कुठल्या बलात्काराच्या प्रकरणावर मोर्चा का नाही काढला, असा प्रतिप्रश्नही त्या विचारतात.

  • के.जे. जॉर्ज- काँग्रेस

२०१५ साली कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री के.जे. जॉर्ज यांनी बलात्कारच्या एका प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असंवेदनशीलतेचा कहरच केला. ते म्हणाले की, “जेव्हा २ पुरुष एखाद्या महिलेवर बलात्कार करतात, तेव्हा त्या प्रकरणाला ‘गॅग रेप’ अर्थात ‘सामुहिक बलात्कार’ कसं म्हणता येईल..? त्यासाठी किमान ४-५ पुरुष तरी हवेत. तरच अशा प्रकरणांना सामुहिक बलात्कार म्हणता येईल.

  • मुलायम सिंग यादव – समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव बलात्काराच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना म्हणतात, “ज्यावेळी महिला आणि पुरुष यांच्यात काही कारणांवरून वाद होतात, त्यावेळी महिला पुरुषांवर बलात्काराचे आरोप करतात. मग बिचाऱ्या पुरुषांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यामुळे बलात्कारासाठी फाशीची शिक्षा देणं चुकीचं आहे. पुरुषांकडून चूक होऊ शकते”

 

  • मोहन भागवत आणि अबू आझमी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- समाजवादी पार्टी)

“पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण केल्याने मोठ्या प्रमाणात बलात्कार होतात. त्यामुळे ‘इंडिया’त अर्थात शहरात बलात्कार अधिक होतात, तर राष्ट्रीय भावना प्रबळ असणाऱ्या ग्रामीण भागात म्हणजेच ‘भारता’त बालात्कारांचं प्रमाण कमी आहे” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत याचं हे विधान. मोहन भागवत आणि अबू आझमी यांना एकत्रित घेण्याचं कारण असं की राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या ‘भागवत-आझमी’ जोडीचं या विषयावर मात्र एकमत आहे. वाढत्या बलात्कारांच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अबू आझमी सर्वप्रथम मोहन भागवत यांच्या विधानाशी आपण सहमत असल्याचं सांगून पुढे म्हणतात की, “महिला कमी कपडे वापरत असल्याने, बालात्कारांचं प्रमाण वाढलं आहे. महिलांनी आपल्या नातेवाईकांशिवाय इतर कुठल्याही परपुरुषाबरोबर रात्री घराबाहेर पडण्याची गरजच काय..?

  • ममता बॅनर्जी- तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाढत्या बलात्कारांच्या प्रकरणांसाठी आधुनिकतेला जबाबदार धरलं. आधुनिकतेमुळे पुरुष आणि स्त्रिया यांच्यामधील जवळीक वाढली आहे. त्यामुळे बलात्काराची प्रकरणे देखील वाढली आहेत, असं त्या म्हणाल्या. शिवाय वाढती लोकसंख्या हे देखील वाढत्या बलात्काराचं एक कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • आशा मिरजे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशा मिरजे निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “बलात्कार ३ कारणांमुळे होतात. महिलांचे कपडे, त्यांची वागणूक आणि नको तिथे फिरणे. बलात्कारासारख्या घटना कमी होण्यासाठी महिलांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.” विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या सदस्य होत्या.

  • ओम प्रकाश चौटाला- भारतीय राष्ट्रीय लोक दल

हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला बलात्कारांच्या घटनांसाठी वाढत्या वयापर्यंत मुलींची लग्न न होण्यास कारणीभूत ठरवलं. त्यावर उपाय सुचवताना १६ व्या वर्षीच मुलींची लग्न लावून दिली जावीत असं सांगितलं. आपल्या विधानाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी मुघल काळातील उदाहरण दिलं. मुघल काळात मुलींच्या संरक्षणासाठी मुली वयात येताच त्यांची लग्न लाऊन दिली जात. आजची परिस्थिती काही फारशी वेगळी नाही.

  • कोडेला शिव प्रसाद– तेलगू देशम पार्टी

आंध्र प्रदेशमधील तेलगू देशम पार्टीचे कोडेला शिव प्रसाद यांनी महिलांची तुलना कार बरोबर केली. “ज्या प्रमाणे पार्किंगमध्ये असणारी कार सुरक्षित असते, त्याचप्रमाणे महिला घरात सुरक्षित असतात. महिलांनी जर आपलं घर सोडलं नाही, तर त्यांच्यावर अत्याचारच होणार नाहीत. त्यामुळे त्यांना घरात पार्क करून ठेवले पाहिजे. तरच बलात्कार रोखले जाऊ शकतील”

Leave A Reply

Your email address will not be published.