पटणार नाही पण आंध्रप्रदेशच्या स्थापनेत अमृतांजनचा देखील मोठ्ठा वाटा राहिला आहे
काही लोक गांजा आणि चरसची नशा करतात. काही दारूची नशा करतात. प्रत्येकाचं म्हणणं असतं की नशा केल्याशिवाय त्यांना शांत झोप लागत नाही. अशीच भानगड अमृतांजनची पण आहे.काही लोक आहेत ज्यांना अमृतांजन लावल्याशिवाय झोप येत नाही. उशाला अमृतांजनची छोटी काचेची बाटली हीच त्यांची ओळख असते.
आत्ता खर सांगायचं तर अमृतांजनमध्ये नशा येण्यासारखी कोणतिही गोष्ट नाही तरिही लोकांना अमृतांजनची सवय होवून जाते. आज्जी, पणजीपासून हा खेळ चालत आला आहे त्यामुळं अमृतांजनला हलक्यात घेण्याच काम सहसा कोण करत नाही.
तरिही या छोट्याशा पिवळ्या डब्बीचा वट सांगण्यासाठी हा लेख लिहण्यात आला आहे.
अमृतांजनचा जन्म झाला तो मुंबईत. पण जन्माला घालणारा व्यक्ती साऊथ इंडियन होता. काशीनाथधुमी नागेश्वर राव अस त्यांच नाव. अभ्यासू लोकांना ते स्वातंत्र सैनिक आणि पत्रकार म्हणून माहित असतील. काही लोकांना समाजसुधारक राव म्हणजे हेच का असा प्रश्न पडला असेल. तर आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात ज्यांनी जिवाचं रान केलं ते राव अन् हे राव एकच का असाही प्रश्न पडला असेल.
तर भिडू लोकांना आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका ताकदीने पार पाडलेले राव ते हेच. त्यांनीच हे सगळं केलं. ते पत्रकार होते, स्वातंत्र्य सैनिक होते, ते अमृतांजन बामचे निर्माते होते आणि आंध्रप्रदेश राज्याच्या स्थापनेचा आवाज देखील तेच होते.
नागेश्वर राव पंतुलु नावाने त्यांना ओळखण्यात येत. त्यांनी महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगात सहभाग घेतला होता.
राव यांचा जन्म आजच्या आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात १८६७ साली झाला. मद्रासच्या ख्रिश्चियन कॉलेजमधून ते पदवीधर झाले औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत नोकरी करण्यासाठी कलकत्याला गेले. इथेच त्यांनी औधष निर्मातीतील बेसिक शिक्षण घेतलं.
यानंतर मुंबईतल्या विलियम एंड कंपनीत ते काम करण्यास आले. आपल्या कामामुळे नोकरीत बढती मिळत गेली आणि चांगल्या पगाराची चांगली नोकरी हे स्वप्न पुर्ण झालं. पण पुढे ब्रिटीशांसाठी काम न करता स्वत: काहीतरी करावं म्हणून त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कलकत्ता येथील अनुभवावून त्यांनी अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी यावर एक रामबाण उपाय म्हणून पिवळ्या रंगाचं एनाल्जेसिक बाम तयार केलं. एक बाम विकण्यासाठी कंपनी तयार करण्यात आली.
१८९३ साली स्थापन झालेली ही कंपनी म्हणजे अमृतांजन
त्यांनी हे बाम लोक एकत्र जमतात अशा ठिकाणी मोफत वाटण्यास सुरवात केली. हळुहळु बाम खपू लागलं. अमृतांजनची सुरवातीची किंमत दहा आणे होती. अस सांगतात की, या दहा आण्यांवर हा माणूस कोट्याधीश होत गेला.
पैसा आला की राजकारण आलं, राव राजकारणात उतरले. पण तेव्हाचं राजकारण हे लोकांच्यातून निवडून येण्याचं नव्हतं तर लोकांच भलं करण्याचं होतं. समाजसेवेचं होत. त्यांनी मुंबईत आलेल्या तेलगू भाषिक लोकांसाठी काम करण्यास सुरवात केली. याच काळात मुंबईतल्या तेलगु भाषिक लोकांचा आवाज म्हणून आंध्र पत्रिका नावाने साप्ताहिक सुरू करण्यात आलं.
बघता बघता आंध्र पत्रिका देखील फेमस झालं. आत्ता राव यांनी हे साप्ताहिक तत्कालीन मद्रास शहरातून सुरू करण्याचा विचार केला. आजच्या तामिळनाडूत समावेश असणाऱ्या आध्रप्रदेशचा आवाज अस याचं स्वरुप होतं. तामिळ लोकांपासून वेगळी अस्मिता असणाऱ्या तेलगु भाषिकांचा आवाज म्हणून आंध्रपत्रिका काम करू लागलं. मद्रासमध्ये प्रसिद्ध झाल्याने साप्ताहिकाचं स्वरूप दैनिकात झालं.
अस सांगतात की,
याच पत्रकातून आंध्र प्रदेश या राज्याच्या स्थापनेची सर्वप्रथम मागणी करण्यात आली. थोडक्यात काय तर अमृतांजनच्या पैशातून त्यांनी पेपर काढला आणि या पेपरातून आंध्रच्या स्थापनेचा एल्गार दिला.
अपेक्षित परिणाम साध्य करणं जमलं, आंध्र प्रदेशात राव यांच नाव होवू लागलं. त्यांचाय समावेश आंध्र आंदोलनाच्या संस्थापकांमध्ये केला गेला. त्यांच्या प्रयत्नातून तेलगु भाषा बोलणाऱ्यांना न्याय देण्यासाठी समिती गठित करण्यात आली.
१९२४ ते १९३४ पर्यन्त ते आंध्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले. त्यांच्या सामाजिक लढ्यामुळे त्यांना “देसोद्धारक” नावाने गौरवण्यात आले. त्यानंतर च्या काळात म्हणजे नोव्हेंबर १९३७ मध्ये पहिल्यांदा त्यांच्या घरात तेलगु भाषिक नेत्यांची बैठक पार पडली जिथे आंध्रप्रदेश राज्याच्या स्थापनेचा विचार मांडण्यात आला.
मात्र १९३८ साली राव यांच निधन झालं. त्यानंतर भारताची स्वातंत्र चळवळ व दूसरे महायुद्ध यांच्यात आंध्रप्रदेश या राज्याची मागणी जोर पकडू शकली नाही. सर्व सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा या मागणीने जोर घेतला आणि १९ डिसेंबर १९५२ रोजी औपचारिक स्वरूपात आंध्रप्रदेश राज्यास मंजूरी मिळाली.
नोकरी करणारा साधा माणूस ज्याने आंध्रप्रदेश स्थापनेचा विचार मांडला आणि तेलगु भाषिक लोकांना एकत्र केलं. त्यासाठी आंध्रपत्रिका हे वर्तमानपत्र या लढ्याचं शस्त्र होतं. आत्ता तुम्ही म्हणाल यात अमृतांजन कुठे आलं. तर अंमृतांजन तयार झालं नसतं तर त्यांच्याकडे पैसे आले नसते, त्या पैशातून वर्तमानपत्र उभारलं नसतं. व तेलगु भाषिक एकत्र आले नसते. त्यामुळे अमृतांजनच पण क्रेडिट तितकच खास आहे.
हे ही वाच भिडू.
- किर्तनामुळे कैलास जीवन घराघरात पोहचलं : भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी
- महात्मा गांधींमुळे बोरोलिन कंपनी स्थापन झाली..!
- हा आहे खरा तेल लावलेला पहिलवान, जो गेली ४५ वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला गंडवतोय.
संकष्टी चतुर्थी लाच चंद्र्दोय नंतरच चंद्र का दिसतो?