सरकारनं अश्लील म्हणून बॅन केलेल्या तमाशाला लोकमान्यता मिळवून दिली अण्णाभाऊ साठेंनीच

तमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा समृद्ध प्रकार. पांढरपेशी समाजाला जरी तमाशा हा खेडवळांचा भडक शृंगार वाटत असला तरी तमाशाची ज्याला खरी जाण आहे, ज्यानं जत्रेत लागलेला तमाशा प्रत्येक्षात जाऊन पाहिलाय तो या मताशी सहमत होत नाही.

तमाशा क्षेत्रातील सुप्रसिद्ध कवी पठ्ठे बापूराव यांनी म्हटल्याप्रमाणे,

‘लौकर यावे सिद्ध गणेशा । आतमध्ये कीर्तन वरून तमाशा ॥’ 

असा त्याचा मूळचा प्रकार आहे.

भक्ती व शृंगार या दोहोंच्या संयोगातून तमाशाचा जन्म झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

उत्तर पेशवाई आणि पुढे १८८० ते १९३० हा त्यानंतरचा काळ तमाशाच्या भरभराटीचा काळ म्हटला जातो. याच काळात पठ्ठे बापूराव, तात्या सावळजकर, शिवा संभा कौलापूरकर, दगडू तांबे शिरोलीकर, भाऊ बापू (मांग) नारायणगावकर, भाऊ फक्कड, गुणी हरिभाऊ रथी महारथींच्या तमाशाच्या फडांनी अख्या महाराष्ट्र गाजवून सोडला होता.

मात्र पुढे पुढे १९३०–३५ नंतर मात्र तमाशाच्या भरभराटीला ब्रेक लागला.स्वातंत्र्योत्तर काळात  तमाशातील अश्लीलतेचं कारण देत दारूबंदीप्रमाणेच तमाशाबंदीचीही मागणी करण्यात येत होती.

त्यातूनच मुंबई राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी १९४८ साली तमाशावर बंदी घातली गेली.

या निर्णयाला महाराष्ट्रातून त्यातल्यात्यात ग्रामीण भागातून जोरदार विरोध झाला. बंदी उठावी म्हणून तमाशा कलावंतांनीही जोरदार प्रयत्न केले. शेवटी जनमताच्या रेट्यापुढं सरकारला झुकावं लागलंच.

या खास मराठी लोकनाट्यातील गोडवा व सामर्थ्य लक्षात घेऊन १९४८ मध्ये शासनाने एक ‘तमाशा सुधार समिती’ नेमली व तिच्या द्वारे मग तमाशातील अश्लील प्रकारांना आळा घालून त्यात सुधारणा घडवून आणण्याचं म्हणजेच तमाशाला सेन्सॉर करायचं ठरवलं.मग या समितीनं काही सूचना दिल्या.

तमाशातील नटनटींना जाहिरातीसाठी तंबूबाहेर बसविण्यात येऊ नये, तमाशात अश्लील पदं व संवाद नसावेत आणि दौलतज्यादा करताना कोणीही नर्तकीच्या अंगाला स्पर्श करू नये अशा सूचना देण्यात आली होती.

त्यानंतर महाराष्ट्र तमाशा परिषद (१९५५) ही संस्थाही स्थापन झाली.

तिने तमाशाचे लोकाभिमुख स्वरूप कायम ठेवून तिच्यातील अनिष्ट प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. तमाशाचा उपयोग सामाजिक व राजकीय प्रचारासाठी करण्यात आला. तमाशाला खऱ्या अर्थानं लोकनाट्य करण्याची ही सुरवात होती असं म्हणता येइल.

मात्र तमाशाला ‘लोकनाट्य’ म्हणण्याची आणि ‘लोकनाट्य’ करायची खरी सुरवात केली ती मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. तमाशाला लोकनाट्य करण्याचा किस्साही तसा गमतीदार आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते दिवस होते. महाराष्ट्रापासून मुंबई तोडून ती गुजरातला देण्यासाठी महाराष्ट्रद्वेषांची खटपट चालू होती.

अण्णा भाऊ तेव्हा आपल्या कलापथकांमधून अशा भोंदू आणि स्वार्थी राजकारन्यांवर आणि मुंबई शासनावर फटकारे ओढत होते.

तेव्हा मोरारजी देसाईंनी चिडून त्यांच्या कलापथक आणि तमाशावर बंदी घातली. तरीही हातात डफ घेऊन लाखो कामगारांपुढं आपला ‘माझी मुंबई’ हा वग सादर करण्यासाठी उभे राहिले. ”मायबाप सरकारनं तमाशावर बंदी घातली असल्यानं मी तुमच्यापुढं ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य सादर करत आहे”. प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून अण्णाभाऊंनी फक्त नवीन नामकरण करून तमाशा सादर केलाच. 

प्रथम मायभुच्या चरणा

छत्रपती शिवबा चरणा

स्मरोनी गातो । कवणा ।।

अशी आपल्या गणाची सुरवात करणाऱ्या अण्णाभाऊंनी शोषितांना प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांना आपल्या वगाचा विषय केलं होतं. त्यामुळं आणाभाऊंनी फक्त नावाचं नाही तर तमाशाचा बाज पण आता ‘लोकनाट्यासारखा’ केला होता. तमाशा आता लोक शिक्षणाचं आणि लोकजागरनाचं माध्यम बनलं होतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.