४०० वर्षांपुर्वी मॉं साहेब जिजाऊंनी बांधलेले बंधारे आजही भक्कम स्थितीत आहेत…

गोष्ट आहे सोळाव्या शतकातली. आज आपण पाहतोय ते पुणे शहर इतकं विशाल नव्हतं. पुनवडी नावाचं छोटंसं गाव होतं. शहाजीराजांना जहागीर म्हणून मिळालेलं हे गाव. शहाजी राजानी किती दिवस शाह्यांच्या चाकरी करायच्या म्हणून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यावर वचक बसावा म्हणून आदिलशहाने आपला सरदार मुरार जगदेव याला प्रचंड सैन्य देऊन शहाजी राजांची जहागिरी असलेल्या पुण्यावर धाडले. 

मुरार जगदेवने पुण्यात प्रचंड लुटालुट केली. अख्खं पुण जाळून बेचिराख केलं आणि तिथे कसब्यात गाढवाचा नांगर फिरवला. सुलतानाचं सैन्य निघून गेलं तेव्हा संपूर्ण गाव नष्ट झालं होतं. मुरार जगदेवने जमिनीत खोचलेली एक पार त्यावर अडकवलेली चप्पल आणि फुटकी कवडी एवढचं काय शिल्लक राहिलेलं. याचा अर्थ या गावात आता कोणीही राहायचं नाही अथवा कोणतही पिक घ्यायचं नाही.

महाराष्ट्रासाठी ती काळरात्र होती. सगळा अनागोंदीचा कारभार. कोणीकोणास वाली नव्हता. कधी आदिलशहा, कधी निजाम तर कधी उत्तरेतील मुघल येऊन लुटालूट, रक्तपात करून जात होते.

हे सगळ घडत होत तेव्हा जिजाऊ गरोदर होत्या. त्यांना शिवनेरीवर सुरक्षित हलवण्यात आलं होतं. तिथेच त्यांच्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं होतं, शिवाजी. लाडाने सगळे शिवबा म्हणायचे.

महाराष्ट्राची काळरात्र संपवणाऱ्या स्वातंत्र्यसूर्याचा जन्म झाला होता.

शिवबांना घेऊन आईसाहेब जिजाऊ शहाजी राजांकडे दक्षिणेत गेल्या. काही वर्षे तिकडे काढल्यावर त्यानी परत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्याची ओढ त्यांना बंगळूरच्या सोन्याच्या पिंजऱ्यात स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लेकराला घेऊन आऊसाहेब पुण्यात परतल्या.

आल्या तेव्हा त्यांना दिसलं गेल्या बारा वर्षात पुण्याची स्थिती ओसाडच आहे. गावात कोण चिटपाखरू नाही, शेत रिकामी पडली आहेत. रानावनात जंगली श्वापदांचा उपद्रव वाढला होता. गाढवाचा नांगर फिरवल्यामुळे पसरलेलं भीतीचं वातावरण कमी झालेलं नाही.

जिजाऊनी कारभार हाती घेतला आणि सगळ बदलायचं ठरवलं.

पुण्यात राहण्याची सोय होण्यापूर्वी जिजाऊंचा मुक्काम सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खेड-शिवापूर येथील वाड्यात होता. याच गावांच्या दरम्यान एक छोटी नदी आहे, या नदीचं नाव शिवगंगा.

त्या काळात पावसाळ्यात धो धो पाऊस पडायचा, पण दिवाळी दसरा झाला की हे पाणी वाहून जायचं. नद्या कोरड्या पडायच्या. पाण्याची दुर्देशा व्हायची. जिजाऊंनी नेमकी हीच गोष्ट हेरली आणि शिवगंगा या छोट्याशा नदीवर बंधारे बांधायचं ठरवलं.

बनेश्वर, कुसगाव आणि रांजे गावाच्या हद्दींमध्ये जिजाऊंमार्फत तीन बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे देखील साधेसुधे नाहीत १०० फूट लांबीचे असणाऱ्या या बंधाऱ्यांना पाणी सोडणारे दारे आहेत. दारे उघडण्याची बंद करण्याची व्यवस्था आहे.

आजही सिंहगडच्या पायथ्याला असणाऱ्या या छोट्या बंधाऱ्यांना तूम्ही जावून पाहू शकता. आजही सुस्थितीत हे बंधारे आहेत. यावरूनच मॉं जिजाऊ साहेबांची दूरदृष्टी किती व्यापक होती याचा अंदाज येतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.