हुसेनने बैलावर माधुरीचं चित्र काढलं, पंढरपूरकरांनी ते आठवडाभर मिरवलं

२००६ मध्‍ये इंडिया टुडे या मासिकाच्‍या कव्‍हर पेजवर एक नग्न चित्र झळकलं होत. भारत मातेचं चित्र होत ते. या चित्रामध्‍ये एका नग्‍न युवतीच्‍या मागे भारताचा नकाशा होता. नग्‍न युवतीच्‍या शरीरावर भारतातील राज्‍यांची नावे होती.

या चित्रावर प्रचंड टीका झाली. आणि या चित्राच्या चित्रकारावर सुद्धा. हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असणारे चित्रकार होते मक़बूल फ़िदा हुसेन. ज्यांनी हिंदू देवदेवतांची सुद्धा नग्न चित्र काढून भडका उडवून दिला होता.

अशा या भारताचे पिकासो म्हणून ख्यात असलेल्या एम एफ हुसेन यांनी देवांच्या नग्न चित्रांवर एक यहुदी म्हण सांगितली होती. 

ईश्वर का वास तफ़सीलों में होता है.

त्यांच्या या म्हणीचा अर्थ कळला नाही मात्र हे कळलं की, हुसेन यांची कला मात्र ईश्वरात वसते. अशा या आंतरराष्ट्रीय चित्रकाराचा जन्म आपल्या विठू माऊलीच्या पंढरीत झाला होता हे फारच कमी लोकांना माहित असेल. 

हुसेन यांची अनेक चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तुफान गाजली. मोठ्या प्रदर्शनांमधून कोट्यवधी डॉलरना त्यांची चित्रं विकली गेली होती. भारत सरकारने १९५५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविले होते. त्यांचा इतिहास तुम्हाला सगळीकडेच वाचायला मिळेल. पण या माणसाची नाळ शेवटपर्यंत पंढरपुराशी कशी जोडली गेली होती त्याचा किस्सा कुठंच भेटणार नाही, अगदी कुठेही.

जगाच्या पाठीवर कुठेही कायम अनवाणी फिरणाऱ्या हुसेन यांनी १९९५ मध्ये पहिलीच आणि शेवटची भेट पंढरपूरला दिली होती. आणि ते हि एका स्थानिक संस्थेचा ‘पंढरी भूषण पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी.

हुसेन यांचा जन्म १९१५ साली एका गरीब बोहरी कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली होती. त्यांचे वडील त्या काळी कंदील बनवण्याचा व्यवसाय करत. पंढरपुरातील पंढरीच्या डोल्याजवळ त्यांचे घर होते. त्याकाळी ते जोडव्यवसाय म्हणून मंडईत आंबेही विकत. परंतु हा व्यवसाय अडचणीत आल्यावर हुसेन यांचे कुटुंबीय १९२० च्या दरम्यान प्रथम गुजरातला आणि नंतर मुंबईला गेले.

त्यांच्या बालपणीचा काही काळ पंढरपुरातील झारीवाड्यातला होता. पंढरपुरातल्या मध्यवर्ती भागातल्या एका अरुंद बोळात हा शंभर वर्षांपूर्वीचा वाडा आहे. आपल्या पंढरपूर भेटीदरम्यान त्यांनी या झारीवाड्याचीही चौकशी केली केली. आयोजकांनी त्यांना त्यांचे जन्मठिकाण दाखवल्यावर त्या पडक्या घरी ते अर्धा तास एका पोत्यावर पडून राहिले. त्यावेळी त्यांचा लाडका कंदील आणि छत्री त्यांच्यासोबत होती.

याच पंढरपुरात त्यांचे एक मावसभाऊ खुदाबुद्दीन शरीफउद्दीन राहायचे. जेव्हा हुसेन पंढरपुरात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या भावाला एक प्रश्न विचारला, 

माझी आई कशी दिसायची ? आईची कबर कुठे आहे.

‘पंढरी भूषण’ पुरस्कार हा त्यांच्या जन्मगावातला त्यांचा पहिला आणि शेवटचा सन्मान.

१९९५ मधली त्यांची ही पंढरपूर भेट गावातल्या तरुण पिढीच्या मनावर कायमची कोरली गेली. तब्बल दहा हजार लोक त्यांना बघायला आले होते. अवघ्या पंढरपुराचे कामकाज त्या दिवशी ठप्प झालं होत. हुसेन मोकळेपणाने लोकांमध्ये मिसळत होते, शुद्ध मराठीत त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळी हुसेन यांनी एका बैलाच्या पाठीवर अवघ्या दहा मिनिटांत माधुरी दीक्षितचे चित्र काढलं होतं.

पुढचे कित्येक दिवस हा बैल पंढरपुराच्या गल्ल्यांतून अभिमानाने फिरवला जात होता.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतलं. इथं त्यांच्या बाबतीत घडलेला एक विरोधाभास नमूद करावासा वाटतो.

त्‍यांनी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती मातेच नग्‍न चित्र काढलं होत. त्‍यानंतर हुसेन यांना कठोर टीकेला सामोरे जावे लागले. १९७० मध्‍ये तयार केलेली ही पेंटिंग ‘विचार मीमांसा’ नावाच्‍या मासिकावर प्रकाशित झाली होती. त्याच शीर्षक होत ‘मकबूल फिदा हुसेन-पेंटर की कसाई’

यानंतर काही हिंदू संघटनांनी हुसेन यांच्‍या घरावर हल्‍ला केला होता. त्‍यांच्‍याविरोधात आंदोलने झाली, काही गुन्‍हे दाखल झाले. त्यातला एक खटला त्यांच्या जन्मगावात दाखल झाला जिथे गावच्या पांढरीने त्यांना ‘पंढरी भूषण’ हा पुरस्कार दिला होता.

अशा सन्मानानंतर एका चित्रकाराला जगायला अजून काय लागतं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.