ऋषी सुनक मोदींच्या बाजूने भांडलेत, ते मोदींच्या डॉक्युमेंट्रीचं प्रकरण काय आहे?

२००२ हे साल गुजराती माणूस कधीच विसरणं शक्य नाही. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेला हिंसाचार हा राजकीय दृष्ट्यासुद्धा मोठा चर्चेचा विषय असल्याचं बोललं जातं. हे असं असताना आता २००२ चा गुजरात हिंसाचार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

बीबीसीनं एक डॉक्यूमेंट्री बनवलीये, ‘इंडिया- द मोदी क्वेश्चन’ (India- The Modi Question).

या डॉक्युमेंट्री वरून भारतीय परराष्ट मंत्रालय, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री, ब्रिटनमधले पाकिस्तानी वंशाचे खासदार ते थेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या डॉक्युमेंट्रीवर भाष्य केलंय. प्रश्न असा येतो की, अश्या डॉक्युमेंट्रीज तर दिवसागणिक बनतच असतील.

मग या डॉक्युमेंट्रीमध्ये असं काय विशेष आहे? हा प्रश्न सहाजिकच डोक्यात येतो.

या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय आयुष्य कसं राहिलंय हे दाखवलंय. म्हणजे गुजरातमध्ये भाजपचं काम करणारा कार्यकर्ता ते गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास असं सगळं या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवलंय. इथपर्यंत कदाचित सगळं ओके असेलही, पण त्यानंतरचा डॉक्युमेंट्रीतला भाग आहे तो २००२ च्या गुजरातमधल्या हिंसाचार दाखवलाय.

आता ही डॉक्युमेंट्री बनवण्यासाठी ज्या माहितीचा आधार घेण्यात आला होता ती माहिती ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयाच्या एका अप्रकाशित अहवालातली आहे.

या अहवालात नेमकं गुजरात हिंसाचाराबद्दल काय लिहीलंय तर,

“आवश्यक कारवाईत दिरंगाई केल्यामुळे हिंसाचाराला सुरुवात झाली. त्याला वरिष्ठ पातळीवरून पाठिंबाही मिळाला”

या अहवालात २००२ साली हिंसेचं वातावरण निर्माण करण्यास तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्षरित्या जबाबदार होते. असं म्हटलंय.

याशिवाय, हा अहवाल तयार करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ते अजूनही आपल्या मतावर ठाम आहेत. हिंसाचार हा अगदी सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता.’

आता या अहवालाबाबतचे हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यावर बीबीसीने बनवलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये काय असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यामुळे, या डॉक्युमेंट्रीबाबत देशाल्याच नाही तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा प्रतिक्रिया येतायत.

ब्रिटनच्या संसदेत सुद्धा हा मुद्दा चर्चेत आला.

ब्रिटनच्या संसदेत विषय असा झाला की, ब्रिटनच्या संसदेत एक पाकिस्तानी वंशाचे खासदार आहेत. त्यांचं नाव इम्रान हुसेन. तर, या इम्रान हुसेन यांनी काय केलं तर, भारतीय वंशाचे असलेल्या पंतप्रधान ऋषी सुनक यांना या डॉक्युमेंट्रीचा दाखला देत ब्रिटीश परराष्ट्र कार्यालयाच्या त्या अप्रकाशित अहवालातल्या माहितीबद्दल त्यांचं मत काय आहे? असा सवाल विचारला.

या प्रश्नाचं उत्तर ऋषी सुनक यांनी अतिशय हुशारीनं दिलं. त्यांनी इंग्लंडची बाजू हुशारीने मांडली त्याचवेळी पंतप्रधान मोदींवर आरोपही केले नाही. ते म्हणाले,

“ब्रिटिश सरकारची भूमिका कायम आहे. तिच्यात अजिबात बदल झालेला नाही. अर्थात, आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं कुठेही समर्थन करत नाही पण सन्माननीय सदस्य इम्रान हुसेन यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी असहमत आहे.”

तर, या डॉक्युमेंट्री विषयी बोलताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या डॉक्युमेंट्रीला ‘एका विशिष्ट प्रकारच्या बदनामीचा प्रपोगंडा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार साहित्याचा हा एक भाग’ असल्याचं म्हटलं आहे.

आजवर २००२ सालच्या गुजरात हिंसाचाराच्या या मुद्द्यावरून अनेकदा राजकारण उफाळून आलेलं आपण बघितलंय. आतापर्यंत ते देशांतर्गत असल्याचंच दिसलं, आता मात्र हे प्रकरण कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्याचं दिसतंय.

तब्बल २० वर्ष उलटल्यानंतरही हे प्रकरण राजकीय मुद्दा म्हणून समोर येऊ शकतं हे या डॉक्युमेंट्रीच्या निमित्तानं लक्षात येतं असं बोललं जातंय. तर, या डॉक्युमेंट्रीविषयी बीबीसीनं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दाखला देत म्हटलंय की,

“हा माहितीपट मालिका भारतातील बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्याक मुस्लीम यांच्यातील तणावाचं परीक्षण करतो. याच तणावाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणावर प्रकाश टाकतो.”

तर, “ही डॉक्युमेंट्री बनवण्यापुर्वी आम्ही भारतातल्या अनेक तज्ज्ञ, नेते, प्रत्यक्ष उपस्थित आणि नागरिकांशी चर्चा केली होती. चर्चा केलेल्या लोकांमध्ये भाजपच्या लोकांचाही सहभाग होता.  या माहितीपटात उपस्थित झालेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याची संधी आम्ही भारत सरकारलाही दिली होती. पण त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.” असंही बीबीसीनं म्हटलंय.

एकंदरीत पाहता ब्रिटन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने बनवलेल्या, पण प्रकाशित न झालेल्या एका अहवालावर आधारित डॉक्युमेंट्री बीबीसीने बनवली. ही डॉक्युमेंट्री आता भारतातच नाही तर, ब्रिटनच्या संसदेतही चर्चेचा विषय ठरलेय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.