या १२ राज्यात भाजपच्याच घरात आग लागलीय !

विरोधक म्हणतात दुसऱ्यांची घरं जाळत सुटलेल्या भाजपचं आता स्वतःच घरं जळायची वेळ आलीय. अमित शहा म्हणे सामदामदंड भेद वापरून पक्ष फोडत सुटले होते. ज्या मशालीने दुसऱ्यांची घरं पेटवली होती, त्याची ठिणगी चुकून यांच्याच घरात पडली आणि आता मोठा जाळ व्हायला सुरुवात झालीय. त्याच झालंय असं की, ज्या राज्यात भाजप प्रचंड बहुमताने आलंय, जिथं भाजपाची सरकार आहेत तिथं अंतर्गत कुरघोड्या सुरू आहेत.

१. शेवटी “खेला होबे” चं 

पश्चिम बंगालमधल्या निवडणुका हरल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तिकीट वाटपाच्यावेळी तृणमूल मधून आयात केलेल्या नेत्यांना तिकीट दिली. यावरून दिलीप घोष यांच्यावर टीका झाली. भाजपचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी अलीकडेच आपला मुलगा शुभ्रांसु यांच्यासह तृणमूलमध्ये घरवापसी केली.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अंतर्गत वादात भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांना  विरोध होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी कलकत्त्यातल्या भाजपा मुख्यालयासमोर ‘गो बॅक टीएमसी सेटिंग मास्टर’ चे पोस्टर्स लावण्यात आलं होतं. ही पोस्टर्स कोणी लावली हे समोर आले नाही मात्र विरोध स्पष्ट दिसतोय. अलिपूर द्वारचे जिल्हाध्यक्ष सुद्धा तृणमूलमध्ये आले आहेत.  भाजपमधून जोरदार आऊटगोईंग सुरु असल्याचं चित्र सध्या पश्चिम बंगाल मध्ये दिसत आहे.

२. योगी Vs हायकमांड

उत्तर प्रदेशात काही काळापूर्वी झालेल्या पंचायत निवडणुका आणि कोरोनाच्या वाढलेल्या  मृत्यूदरामुळे उत्तर प्रदेशात राजकीय संघर्ष सुरू झाला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत बैठक केली. असे मानले जाते की संघाच्या हस्तक्षेपानंतर हा वाद थोडा शांत झालाय.

पुढच्या वर्षी यूपीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत भावी मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण? यावरुन सध्या घमासान सुरु आहे. निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असे युपीचे कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पत्रकारांना सांगितले. तर दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी एटामध्ये सांगितलं की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात पुढच्या विधानसभा निवडणुका लढवल्या जातील.

त्याच वेळी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बरेली येथे गेल्या आठवड्यात सांगितले की, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका कोणाच्या नेतृत्वात लढवायच्या, याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाकडून घेतला जाईल.

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मानले जाणारे अरविंद कुमार शर्मा सेवानिवृत्तीपूर्वी राजीनामा देऊन युपीला पोहोचले होते. घाईतच त्यांना विधानपरिषदेचा सदस्य बनवून सभागृहात पाठविण्यात आले. अरविंद शर्मा यांना मुख्यमंत्रीदेखील करता येईल, असे राजकीय तज्ज्ञांनी म्हंटले होते. पण ५ महिने उलटून गेले तरी अरविंद शर्मा यांना ना मंत्रीपरिषदेत स्थान देण्यात आले, ना कोणतीही महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली. अखेरीस त्यांना उत्तर प्रदेशात भाजपचे उपाध्यक्ष नेमण्यात आले. शर्मा यांना उपाध्यक्ष बनवण्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांना सध्या बाजूला सारले गेले आहे.

यावर शर्माजींना कॉंग्रेस म्हणतंय,

पीएमओ छोड़कर क्यों आए थे, प्रदेश उपाध्यक्ष बनने?

त्यामुळे एकूणच यूपीत सगळं ठीक नाहीये.

३. ‘वसुंधरे’शिवाय कमळाबाईला पर्याय नाही.

राजस्थान भाजपमध्ये सुरु असलेलं युद्ध आता शाब्दिक राहील नसून तिथं पोस्टर वॉर रंगलं होत. सतीश पूनिया आणि वसुंधरा राजे यांच्या गोटात संघर्ष सुरु आहे. माजी खासदार बहादुरसिंग कोली  यांच्यासह भाजपाचे माजी आमदार भवानी सिंह राजावत, प्रहलाद गुनेल, प्रताप सिंह सिंघवी यांनी वसुंधराराजेंना वाळवंटातील एकमेव नेता म्हणून घोषित केलंय. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, राजस्थानमध्ये राजे म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे राजे आहेत. त्यामुळे समर्थक म्हणत आहेत की राजस्थानात अद्याप ‘वसुंधरे’ला पर्याय नाही, हे राज्य वसुंधरेशिवाय अपूर्ण आहे.

त्याचवेळी राजस्थानचे भाजपा अध्यक्ष सतीश पूनिया आणि राजस्थानमधील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया म्हणाले की,

पक्षाची घटना सर्वोच्च आहे, यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र काम करतात, पक्षापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नाही.

४. त्रिपुरातला ‘असंतोष’ शांत करण्याची जबाबदारी ‘संतोष’ची 

त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे नेते नाराज आहेत. काही आमदारांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्र्यांविरोधात आवाज उठविला होता. परिणामी त्रिपुरामध्ये सुरु असलेला  असंतोष शांत करण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव बी.एल. संतोष यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षात बंडखोरी होण्याच्या शक्यतेमुळे संतोष काही दिवसांपूर्वी त्रिपुरा दौर्‍यावर गेला होते. २०१७  मध्ये कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुदीप रॉय बर्मन त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री बिप्लब देब यांना आव्हान देत आहेत.

त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का दिल्यानंतर आता तृणमूल कॉंग्रेस भाजपच्या बंडखोरांना त्रिपुरामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकतीच भाजप सोडून तृणमूल मध्ये परत आलेल्या मुकुल रॉय यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

५. कर्नाटकात ‘येडियुरप्पा हटाव’ मोहीम

कर्नाटक भाजपमध्ये मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना हटवण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. भाजपचे एम.एल.सी.ए.एच. विश्वनाथ यांनी येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी केली होती. सोबतच मुख्यमंत्र्यांचा धाकटा मुलगा बी. वाय. विजयेंद्र याच्यावर भ्रष्टाचार आणि प्रशासनात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता.

तर दुसरीकडे येडियुरप्पांचे प्रमुख विरोधक हुबळी -धारवाड पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार अरविंद बेलाड यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा त्यांचा विश्वास आहे आणि त्यांचा सतत पाठलाग केला जातोय. या दरम्यान प्रदेश प्रभारी व भाजपा सरचिटणीस अरुण सिंग यांनी मुख्यमंत्री व आमदारांशी चर्चा केली आहे. यामुळे हे स्पष्ट होते की कर्नाटक भाजपमध्येही काही ठीक नाही.

६. मध्यप्रदेशात शिवराज सिंहांवर दबाव 

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा आणि कैलाश  विजयवर्गीय यांची भेट घेतली. यानंतर, कैलास विजयवर्गीय यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली, तेव्हा मध्यप्रदेशचे भाजपा अध्यक्ष व्ही.डी. शर्मा आणि सुहास भगत दिल्ली येथे आले आणि त्यांनी प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली. त्यानंतर मध्यप्रदेशात राजकीय उष्णता वाढली आहे.

शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात २०१८ ची विधानसभा निवडणूक लढविली गेली, ज्यात पक्ष हरला  आणि १५ वर्षानंतर कॉंग्रेसची सत्ता आली. परंतु काही महिन्यांनंतर मार्च २०१९ मध्ये ज्योतिरादित्य सिंधियांनी कॉंग्रेसचा हात सोडला आणि भाजपचं कमळ जवळ केलं. यानंतर पुन्हा एकदा राज्यात शिवराज सिंह सरकार आलं, खरं यावेळी दबाव होता सिंधियांचा. नुकत्याच झालेल्या दमोहच्या  पोटनिवडणुकीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे शिवराजांवरचा दबाव आणखीनच वाढला.

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शिवराज सरकारच्या मंत्रिमंडळला  नर्मदा खोरे विकास प्रकल्पांमध्ये बजेटपेक्षा जास्त सूट देण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. निषेध इतका वाढला की काही आमदार नरोत्तमच्या बाजूने होते तर काही आमदार शिवराज सिंह यांच्या बाजूने बोलू लागले.

त्याचवेळी, आमदारांच्या दिल्ली ते भोपाळ अशा वाऱ्या वाढल्या आहेत. ह्या वाऱ्या करणारे सर्व नेते शिवराजविरोधी गटातले आहेत. या सर्व घटना पाहता असे म्हणता येईल की मध्यप्रेदशात राजकीय गर्मी वाढतच आहे.

७. उत्तराखंडमध्ये चेहराबदल महागात 

उत्तराखंडमध्ये झालेल्या भांडणानंतर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री बदलले आहेत. नुकतेच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री तीरथसिंग रावत आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यात एक रंजक राजकीय लढाई झाली. कुंभमेळ्यादरम्यान बनावट कोविड टेस्ट घोटाळ्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यावर आरोप करत म्हटले की,

हे सर्व त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी घडल आहे आणि त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच वेळी त्रिवेंद्र सिंह यांनी या प्रकरणावर न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

८. गुजरातमध्ये मुख्यमंत्री Vs प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्यात दिवसेंदिवस बिनसतच चाललंय.  गुजरात विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. अशा परिस्थितीत पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, परंतु रुपाणी विरुद्ध पाटील यांच्यात राजकीय चढाओढ सुरू आहे. अलीकडेच १ मे रोजी पंतप्रधान मोदी गुजरात दौर्‍यावर आले होते तेव्हा मोदींनी रुपाणी यांच्यासमवेत तौकते वादळाने बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण केले.

यानंतर मोदींनी सी.आर.पाटील यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. रुपाणी यांना त्यापासून दूर ठेवले. मोदींचा सी.आर.पाटील यांना पाठिंबा आहे, असा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न कोठेतरी करण्यात आला.

९. गोव्यात तुझं माझं जमेना 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीच्या काळापासूनच या दोन नेत्यांमध्ये वाद सुरु आहेत. जेव्हा गोव्यामध्ये ४ दिवसात ७५ लोक मृत्युमुखी पडले होते, तेव्हा गोव्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले होते. पण त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात समन्वय नसल्यामुळे या सर्व गोष्टी घडल्याचे ऐकिवात आले.

सावंत म्हणाले की राज्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. तर दुसरीकडे राणे म्हणाले की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होत आहेत. त्यावेळी जे.पी नड्डा यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांच्यातील मतभेद विसरून राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला.

१०. आसाममध्ये सरबानंद सोनोवाल भाजपाची दुखरी नस

आसाममध्ये भाजपने आपले माजी मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांना दुसरी संधी नाकारुन हेमंत बिस्वा सरमा यांना संधी दिली. खरं तर भाजपला हा निर्णय घेणं सोप्प नव्हतं. कारण हेमंत बिस्वा कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. हेमंत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपची मजबुरी होती. पक्षाने हेमंत यांना मुख्यमंत्री केले नसते तर आसाममध्ये बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली असती.

आसाममधील २०१६ च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: म्हटले होते की निवडणुका झाल्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात आसाम सुवर्णमय होईल. पण यावेळी भाजप हेमंत बिस्वा सरमापुढे वाकली.

११. छत्तीसगढ मध्ये वन मॅन शो

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी छत्तीसगढच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी दिल्लीहून रायपूरला पोहोचले होते. हा कार्यक्रम भाजपच्या राज्य मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. पण भाजपचे मोठे नेते आणि माजी मंत्री अजय चंद्रकर यांना या कार्यक्रमाची माहितीच नव्हती. जेव्हा ते कार्यक्रमात पोहोचले तेव्हा त्यांचे गृहनिर्माण मंडळाचे माजी अध्यक्ष भूपेंद्र सवानी यांच्याशी भांडण झाले.

यावर कॉंग्रेसच्या वतीने असे म्हटले जात होतं की, भाजपामधील दुफळी वाढतच चालली आहे. या घटनेचा व्हिडिओही कॉंग्रेसने ट्विट केला होता. कॉंग्रेसचे मंत्री रवींद्र चौबे यांनी भारतीय जनता पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये वन मॅन शोच्या आधारे काम केले जात आहे. यामुळे पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, मोठे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत.

१२. बिहारमधल्या महागठबंधनच, ‘खट्ट’बंधन

बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपमध्ये वाद सुरु झालाय. नुकतेच भाजपचे एमएलसी टून्ना पांडे यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. ते म्हणाले की मी नितीशकुमार जिंदाबाद म्हणणार नाही.

टुन्ना म्हणाले की, ते एनडीएचा भाग आहेत आणि ते निश्चितपणे बिहारचे मुख्यमंत्री आहेत पण नितीश हे आमचे नेते नाहीत. माझ्यासाठी सीवानमधील माणसंच सर्वकाही आहेत. गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेने जास्तीत जास्त मते देऊन तेजस्वी यादव यांची निवड केली होती, पण नितीशकुमार यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून सत्ता मिळवली, असे टुन्ना म्हणाले होते.

पण हा फक्त टुन्नाचा मुद्दा नाही. निवडणुकीदरम्यान, लोजपाने जेडीयूला विरोध केला होता.  मागच्या विधानसभा निवडणुकीत ‘हनुमान’ चिराग यांना भाजपच्या राज्यकर्त्यांचा आशीर्वाद होता, त्यामुळे नितीश कुमारांच्या बऱ्याच  जागा कमी झाल्या.

त्यामुळे या बारा राज्यांत भाजपमध्ये अंतर्गत वाद वरवर तरी दिसतोय. आता आत काय दडलंय कोणाला माहित.

अशाप्रकारे १२ राज्यांची कहाणी सुफळ संपूर्ण!!

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.