हेअरकट असेल की टॅटू, चिलीच्या या प्रेसिडेंटचा स्वॅगच वेगळाय

प्रेसिडेंट म्हटलं कि सूट बुटातली ऐट. प्लेन बंदगळा आणि त्याखाली त्याच रंगाचा पायजमा हा तर भारतीय राष्ट्रपतींचा युनिफॉर्म असल्यागत ठरलेला पोशाख. अलीकडच्या जवळपास सगळ्याच प्रेसिडेंट्सनी अगदी परंपरा असल्यागत हा ड्रेसकोड पाळलाय.

अब्दुल कलामांना तर अश्या बंदगळ्यात आपला जीव गुदमरतो का काय असं वाटलं होतं.

बाकी राजकारण्यांचे पांढरेशुभ्र कपडे तर आपल्याला माहित आहेतच. भारताच्या राजकारणात नवीन पिढी आल्यावर तरी किमान कपड्यांची स्टाइल चेंज होईल अशी अपेक्षा होती मात्र थोडा बदल सोडला, तर ती पण राजकारणात आणि कपड्यात जुनीच स्टाइल कॉपी मारतायत असं म्हटलं जातंय.

मात्र चिलीचा जो प्रेसिडेंट आलाय त्या भाऊचा स्वॅगच वेगळाय.

अवघ्या ३५व्या वर्षी चिलीचा सगळ्यात तरुण प्रेसिडेंट ठरलेल्या ह्या भाऊंचं नाव आहे गॅब्रियल बोरिच.

त्यांच्या वयाबरोबरच सध्या चर्चा आहे त्यांच्या हेअरस्टाइल आणि टॅटूची. त्याच्या त्या एखाद्या वांड  फुटबॉलपटूसारख्या असणाऱ्या ‘मोहॉक’ हेअरस्टाइवर चिलीची पोरं आणि पोरी चांगलेच फिदा झाले होते. आता ‘मोहॉक’ हेअरस्टाइल कशी असते तर सलूनमध्ये दोन्ही साईडला मशीन मारून मध्ये जास्त ठेव असं म्हटल्यावर जी कडक स्टाईल होते ती हीच. आमच्याकडं याला साईड कट म्हणत्यात. 

विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आल्यानंतर विध्यार्थी दशेतला ‘कूल’ अंदाज गॅब्रियल भाऊंनी काय सोडला नाही.

 २०१४मध्ये चिलीच्या संसदेत भाऊंनी असाच हटके स्वॅग घेऊन एन्ट्री मारली होती. अंगात फेमस बँडचं पोस्टर असलेलं ब्लॅक टि-शर्ट आणि जीन्स टाकून हे भाऊ संसदेत पोहचले होते. भाऊंचा संसदेतील मोहॉक’ हेअरस्टाइलचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. त्यांच्या ‘चाकोरी’ बाहेरच्या  वागण्यानं संसेदतील कन्झरवेटिव्ह चांगलेच खवळले होते. मात्र या परंपरावाद्यांना फाट्यावर मारत गॅब्रियल भाऊंनी आपली हटके स्टाईल कायम ठेवली.

‘अशा लोकांना मी गिणत नसतोय. सामान्य लोकांपेक्षा आम्ही कायतरी भारी आहोत हे दाखवण्यासाठीच हे इलिट लोकं सूट बूट घालण्याची परंपरा आणतात’ असं उत्तर ग्याब्रिएल भाऊंनी परंपरावाद्यांनी केलेल्या टीकेला दिलं आहे. गॅब्रियल भाऊंचे टॅटूही तरुणाईत चांगलेच गाजले. आपल्या मूळ जमातीशी असलेली लिंक दाखवण्यासाठी त्यांनी हे टॅटू काढले होते. 

पण फक्त टॅटू आणि हेअरस्टाइल यामुळंच गॅब्रियल भाऊ इतक्या कमी वयात प्रेसिडेंटच्या खुर्चीत बसले नाहीत. त्यांना देशातील तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. प्रचाराची पद्धतही ही अशीच हटके होती. 

त्यांच्या समर्थकांनी नुसत्या मिम्सनं विरोधकांच्या कॅम्पेनची हवा काढली होती.

गॅब्रियल यांच्या विरोधात असलेल्या होजे अँटानिओ कास्ट हे चिलीचे डिक्टेटर पिनोशेट यांच्या राजवटीचे  समर्थन करत होते. लेफ्टिस्ट असलेल्या गॅब्रियल भाऊ यांनी याचाच फायदा घेत होजे अँटानिओ शेठचा करेक्ट कार्यक्रम केला. 

करोनानंतर चिलीची अर्थव्यवस्था अवघड परिस्थितीतुन जात आहे. त्यात देशात नवीन संविधान बनवायचं काम चालू आहे. देशात सारख्या होणाऱ्या आंदोलनांमुळं देशात आधीच अस्थिरता निर्माण झालेय. ह्या सगळ्यांना गॅब्रियल भाऊंना तोंड द्यायचं आहे. त्यात आता अमेरिका समर्थित उमेदवार पडल्यानं अमेरिकेचा खोडा वेगळाच. त्यामुळं ‘हम क्या चाहते आजादी’ म्हणत सत्तेवर आलेला हा ३५ वर्षाचा सुपरकूल प्रेसिडेंट कसं काम करतो हे येणाऱ्या काळात बघण्यासारखं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.