फक्त ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी देशाची गोपनीय कागदपत्रे विकली गेली होती.

कर्नाटकातल्या मेंगलोरमध्ये राहणारा एडविन डिसुझा. एकदिवस त्याच्या घरी दिल्लीतून पोलीस आली. त्याला त्यांची भाषा येत नाही, पोलिसांना त्याची भाषा येत नाही. एडविन हा एकेकाळचा भुरटा चोर. तरुणपणी छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या होत्या त्याबद्दल आत्ता पोलीस चौकशीला आली आहे आणि तेही थेट दिल्लीवरून?

एडविनला खूप आश्चर्य वाटलं. त्याने आपल्या शेजाऱ्याला बोलावले तोपर्यंत पोलीस निघून गेले होते. पुढे काही दिवसांनी पोलीस परत आले, शेजारी पण सोबत होता. एडविन अंकलच्या चोरीची केस नव्हती.

त्या दिवशी एडविन डिसुझाने जे ऐकल त्यानंतर त्याच्या संपूर्ण बत्त्या गुल झाल्या.

कळायचं बंद झाल. पोलीसांनी जे सांगितल त्याचा एकूण सार म्हणजे, एडविन अंकलची जी आई आहे ती त्याची आई नसून त्याची आजी होती. जिला एडविन बहिण समजत होता ती त्याची खरी आई.

आणि एडविनच्या या आईचा काही काळापूर्वी मृत्यू झाला होता. फक्त ती जाताना १० कोटीची प्रॉपर्टी सोडून गेली होती.

झाला न तुम्ही पण कन्फ्युज. म्हणजे बघा एडविन डिसुझाचे काय हाल झाले असतील.

तर तुम्हाला सगळ सुरवातीपासून सांगतो. या सगळ्याची सुरवात एका माणसापासून होते ज्याच नाव चित्तर वेंकट नारायण उर्फ कुमार नरेन उर्फ कुमार नारायण.

हा मुळचा केरळचा. वडक्कनचेरी हे त्याचं मूळ गाव. अठराव्या वर्षी आर्मीमध्ये पोस्टल सर्व्हिसला जॉईन झाला. पुढे सहाच वर्षात निवृत्ती घेतली. काही काळ देशाच्या वाणिज्य मंत्रालयात काम केले. पण कमी पगाराच्या सरकारी नोकरीत तो खुश नव्हता.

राजीनामा दिला व मुंबईला आला. इथे एस.एल.एम.माणिकलाल नावाच्या कंपनीत रिजनल मॅनेजर झाला. इथेच त्याची ओळख ग्रेटी वाल्डरशी झाली. दोघांनी लग्न केलं, ग्रेटीच नाव गीता झालं.

या ग्रेटीचा पूर्वाश्रमीच्या नवऱ्यापासून झालेला मुलगा म्हणजे एडविन डिसुझा.

न कळत्या वयात झालेली चूक लपवण्यासाठी ग्रेटीने त्याला आपल्या आईकडे सोडले व तो आपला लहान भाऊ आहे अस सांगितल. असो, आपली स्टोरी कुमार नारायणची आहे .

तर या कुमार नारायणची दिल्लीला बदली झाली. ग्रेटी व कुमार निजामुद्दीन भागात राहू लागलेव हेली रोड येथे कुमारने आपल ऑफिस उघडलं. याच काळात माणिकलाल ट्रेडिंग कंपनी सोव्हिएत रशिया व इतर युरोपियन देशांमध्ये आपले हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत होती.

या साठी सरकारी परवानग्या आणणे, अधिकाऱ्यांना खुश ठेवणे या कामासाठी कुमार नारायणला दिल्लीला पाठवलं होतं.

यापूर्वी मंत्रालयात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे नारायण याने ते काम व्यवस्थित पार पाडलं.

त्याची पद्धत सोपी होती. ज्याच्याकडे काम आहे अशा अधिकाऱ्याला संध्याकाळी ड्रिंक साठी बोलवायचं. त्याच्याकडून आपल्याला लागणारी कागदपत्रे घ्यायची. आपल्या शिपाई कम पोऱ्याला ती कागदे झेरोक्स काढायला पाठवायचं.

अगदी शंभर रुपयात हवी ती इन्फोर्मेशन कुमारला मिळू लागली.

कुमारच हे स्कील थोड्याच दिवसात केजीबी सारख्या गुप्तहेर कंपनीला कळाल. माणेकलाल कंपनीला रशियामध्ये वाढायला संधी देण्याच्या बदल्यात वेगवेगळी माहिती काढायची जबाबदारी कुमार नारायणला दिली गेली.

थोडक्यात कुमार स्पाय बनला.

फक्त रशियाच नाही तर त्याची ख्याती तिथल्या अनेक एम्बसीमध्ये पसरली. मग काय त्याच्याकडे फ्रान्स, पोलंड, जर्मनी या देशांची कामे येऊ लागली. कुमारची स्टाईल जुनीच होती. ब्लक लेबलची बॉटल फोडायची आणि ग्लासात अधिकाऱ्याला उतरवून हवी ती माहिती गोळा करायची.

आता फक्त त्याने स्वतःच झेरोक्स मशीन खरेदी केलं होतं.

या नवीन कामात अनेक गोपनीय कागदपत्रे असणार होती त्यामुळे रिस्क घ्यायची नाही असे त्याला सक्त आदेश होते. अनेक मोठमोठे अधिकारी कुमार नारायणच्या ऑफिसमध्ये पाहुणचार घेताना दिसू लागले. त्याच्या पार्ट्यामध्ये ब्लक लेबल व्हिस्की पाण्यासारखी वाहत होती आणि कॉल गर्ल्सचा पुरवठा व्हायचा.

भारताचा आण्विक प्रोग्रम पासून ते अनेक रॉचे डिफेन्स सिक्रेट त्याने फोडले होते.

कुमारचा रेट ठरलेला, १०० पौंड रुपयाला एक कागद !

रॉ ला काही दिवसात शंका आली की पीएमओचे काही अधिकारीसुद्धा यात शामिल आहेत. कुमार नारायणवर पाळत ठेवली जाऊ लागली. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सगळी खबर देण्यात आली.

इंदिरा गांधी प्रचंड चिडल्या मात्र भारताचा दोस्त राष्ट्र असलेल्या रशियाच्या इन्वोल्व्हमेंटमुळे थोडेसे सबुरीने घ्यावे लागणार होते.

नारायणवर फास आवळणार इतक्यात श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली. भारतातले वातावरण स्फोटक बनले. अशातच त्यांचे चिरंजीव राजीव गांधी प्रधानमन्त्री पदी आले. या सगळ्या गोंधळात भारतीय गुप्तचर संघटनेने काही काळासाठी ही मोहीम थांबवली होती.

जवळपास एक वर्षांनी मिशन कुमार नारायण परत हाती घेण्यात आलं.  

१६ जानेवारी १९८५ रोजी पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी पी.सी.अलेक्झांडर यांचा पर्सनल असिस्टंट पुकट गोपालन एका संध्याकाळी कुमार नारायणच्या ऑफिसमध्ये ब्लक लेबल व्हिस्कीचा आनंद घेत गप्पा मारत बसला होता.

तेव्हा अचानक दिल्ली पोलीसची धाड पडली. गोपालनने कुमार नारायणकडे दिलेले संरक्षण खात्यातील टॉप सिक्रेट असलेली तीन कागदे सापडली. दोघांना अटक झाली.

या अटकेमुळे संपर्ण देशात खळबळ उडाली.

पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये काम करणारा एक अधिकारी असा रंगेहाथ सापडतो हे चिंताजनक होतं. त्यांच्या अटकेनंतर पीएमओमधील आणखी दोन अधिकारी, माणेकलाल कंपनीचे मालक योगेश यांना अटक झाली.

पीसी अलेक्झांडर यांनी याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नव्हती अस सांगितल. पण तरीही राजीव गांधी यांनी  त्यांना राजीनामा द्यायला लावला.

फ्रान्स, पोलंड व पूर्व जर्मनी या देशाच्या परराष्ट्र दूतावासावर कारवाई केली गेली.

फ्रेंच एम्बेसी चे मिलिट्री अॅटेची लेफ्टनंट कर्नल एलेन बॉली यांना  भारत देश सोडून जायचा आदेश दिला गेला. एवढच नाही तर त्यांना पोलिसांनी एअरपोर्टवर नेऊन थेट विमानात बसवून फ्रान्सला पाठवून देण्यात आले. त्यांच्या राजदूताला थेट वार्निंग दिली नाही पण एका महिन्यात परत जाण्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले गेले.

पोलंड व जर्मनीच्या अधिकाऱ्यांना देखील भारत सोडून जाण्याचा आदेश राजीव गांधी यांच्या सरकारने दिला होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे केजीबी अथवा रशियाचे नाव या कारवाईमध्ये आले नाही. 

जवळपास १७ वर्षे केस चालली. १२ जणांना अटक झाली. कुमार नारायणकडे पैसे सापडले नाहीत पण त्याने आपले मालक योगेश माणेकलाल यांच्याकडे शेकडो कोटी जमा केले असल्याचं सांगितल. 

२००२ साली या केसचा निकाल लागला. योगेश माणेकलाल यांना सर्वात जास्त म्हणजे १४ वर्षे जन्मठेपेची शिक्षा झाली. बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना १२ वर्षे जन्मठेप झाली. कुमार नारायण यातून सुटला कारण त्याचा २ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता.

त्याच्या सोबत भारताच्या अनेक अधिकाऱ्यांचे राजकारण्यांचे सिक्रेटसुद्धा देवाघरी गेले.

ब्लॅक लेबल व्हिस्की. अनेकांची फेव्हरेट ! ही व्हिस्की मिळत असेल तर एवरेस्ट सुद्धा चढून जातील असे मेम्बर आपल्या बघण्यात आहेत. फक्त काही घोट जरी मिळाले तरी अमृत पिल्याचा आनंद घेणारे पण जगात काही महाभाग आहेत. 

पण फक्त या दारूच्या बॉटल पायी देशाला विकणारे आपण कधी पाहिले नाहीत. कुमार नारायण याने हे करून दाखवलं होतं.

बर आता आपण सुरवात केलेली त्या एडविन डिसुझा अंकल कडे येऊ. कुमार नारायण यांची पत्नी व एडविनची आई ग्रेटी ही त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या पॉश फार्महाऊस मध्ये एकटीच राहायची. एकदा अचानक कोणीतरी तिचा खून केला. तिचा आगापीछा शोधण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला आणि त्यातून दोन चार वर्षांनी एडविन अंकल सापडले.

आयुष्यभर भुरट्या चोऱ्या करत गरिबीत आयुष्य घालवलेल्या एडविन अंकलला १० कोटींची लॉटरी लागली.

संदर्भ- https://indianexpress.com/article/india/spy-and-the-son-coomar-narain-spy-case-5995924/

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.