कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचं काय चाललं आहे ?

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. संक्रमितांच्या  दररोज वाढत्या आकड्यांकडे सर्वांचे लक्ष आहे.  माध्यमही  कोरोनाच्या प्रत्येक परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र,  या दरम्यान दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनावर दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत आहे.

चार महिन्यांपासून सुरु आहे आंदोलन 

केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी कायद्याविरोधात  गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून  देशाच्या राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात १४७ दिवसापासून  हे आंदोलन सुरु आहे. हा म्हणायचं झालं तर , शेतकऱ्यांची संख्या  थोडी कमी झाली असली तरी एक मोठा समूह अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे.

१० मेला सिंघू बोर्डरवर देशपातळीवरच अधिवेशन

यासंदर्भात राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितले कि,  सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरु असल्याने बरेचसे शेतकरी होळीपासून  आपापल्या घरी गेले होते. मात्र,  कालपासून हळू- हळू शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या दरम्यान येत्या १० मेला सिंघू बॉर्डरवर देशपातळीवरच अधिवेशन आयोजित करण्यात आलं  आहे.

माध्यमांतून अफवांना उधाण .. 

ते म्हणाले कि,  माध्यमातून जे पसरवलं जातंय कि, शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत  ऑक्सिजन टँकर  पोहोचविण्यास अडथळा येतोय किंवा इतर काही. तर या सर्व अफवा आहेत. उलट आमचाच मार्ग  दिल्ली पोलिसांनी अडवून ठेवलाय. आम्ही दिल्लीकडे कूच केलेली होती, मात्र दिल्ली पोलिसांनी आमच्या मार्गात अडथळा आणल्याने आम्ही तिथेच बसलो. दरम्यान,  दिल्लीचे इतर मार्ग सुरूच आहेत. त्यामुळे  आम्ही कोणताही  टँकर अडवून ठेवलं नाही.

तर दुसरीकडे आम्ही आमच्याकडून सामान्य जनतेसाठी होईल तितकी मदत आहोत. लॉकडाऊन मुळे जो कामगार वर्ग आहे, गोरगरीब आहेत ज्यांचे खाण्याचे वांदे होतात, त्यांच्यासाठी आमच्याकडे लंगर तर  चालूच आहेत , सोबतच आम्ही फूड पॅकेट्स बनवून वेगवेगळ्या ठिकाणी वाटतोय. ज्यात आनंद विहार, ISBT, राजेंद्र गांधी ट्रान्सपोर्ट नगर या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने फूड पॅकेट्स नेऊन दिल्लीतील जो मजूर वर्ग आहे त्यांच्यासाठी वाटप करत आहोत.

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या संख्येत होणार वाढ.. 

त्यांनी सांगितले कि,  सध्या २० हजार शेतकऱ्यांपैकी ४ ते ५ हजार शेतकरी हे सातत्याने राहणारे आहेत, तर बाकी १० ते १५ जे शेतकरी आहेत ते सीमेलगतच्या आसपासच्या भागात राहणारे असल्याने रोज अप-डाऊन करतात. त्यामुळे सध्या रात्रीची संख्या थोडी असली तरी येणाऱ्या काळात ती वाढणार आहे.  सध्या सिंघू बॉर्डर, टीकरी बॉर्डर, गाझीपूर आणि  ढासा बॉर्डर याठिकाणी शेतकरी आंदोलन करीत आहेत. याशिवाय शाहजाहापूर बॉर्डरवर  धारणे आंदोलन सुरु आहे.

दिल्लीतील  लॉकडाऊनचा शेतकरी आंदोलनावर होणाऱ्या परिणामाविषयी विचारले असता गिड्डे यांनी सांगितल कि, त्यांच्या मते शरीरात प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना कोरोनाची लागण होते आणि शेतकरी मुळातच मातीत राबणारा आणि काबाडकष्ट करणारा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडे अंगभूत प्रतिकारशक्ती असते.

तरी कोरोनाच्या बाबतीत असणारे सर्व नियम आम्ही पाळत आहोत. दुसरी बाब म्हणजे लॉकडाऊनचा हा शेतीसाठी नाही. शेती उद्योग हा लॉकडाऊनमध्येही चालूच होता आणि तो कधीही बंद राहू शकत नाही.

आम्ही नाही तर सरकार आम्हाला शत्रू समजतंय 

ते सांगतात की शेतकऱ्यांनी सरकारला आवाहन केलं होत , लसीकरण मोहीम किंवा सरकारच्या  इतर आरोग्य सिस्टीम त्या आम्हाला बॉर्डरवर उपलब्ध करून द्याव्यात. परंतु सरकार शेतकऱ्यांना अद्यापही पाण्यात बघतंय आणि आम्हाला शत्रू समजतंय. आम्ही आमचा न्याय मागण्यासाठी बॉर्डरवर आहोत, आम्ही सरकारला शत्रू समजत नाही. आम्ही सरकारकडे न्याय मागायचा नाही तर कोणाकडे मागायचा, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

सरकारकडून सध्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष होतंय का ? याबाबत विचारले असता संदीप गिड्डे म्हणाले कि, सरकार हे व्यावसायिक प्रवृत्तीच आहे.

सरकारची प्राथमिकता शेतकरी आणि जनता नसून निवडणुका आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे कि, सरकार हे जनतेकडे दुर्लक्ष करत राहणार. शेतकरी तर सोडाच संपूर्ण देशात महामारीची जी परिस्थिती आहे, ती सोडून जर पंतप्रधान निवडणुकांकडे लक्ष देत असतील तर मग त्यांच्यासाठी शेतकरी ही काय चीज आहे?  एकीकडे ३- ३ लाख  रुग्ण सापडत असताना कोरोनाकडे ज्याचं दुर्लक्ष होतंय , त्यांच्यापुढे आमचा प्रश्न महत्वाचा नाहीचं. त्यांच्यासाठी निवडणुकांचा प्रश्न महत्वाचा आहे.

गिड्डे यांचं म्हणणं कि, या सरकारसाठी शेतकरी ही सर्वात शेवटची प्राथमिकता आहे.

दुसरीकडे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत यांनी सरकारला इशारा देत म्हंटल कि, आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आंदोलन थांबविणार नाही. कोरोनाच्या  नावावर सरकारकडून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, आमचं आंदोलन असंच अविरत सुरू राहील.

शेतकरी आंदोलन म्हणजे काही शाहीनबाग नाही, जे कोविडच्या नावावर संपवता येईल. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी असल्याची त्यांनी म्हंटल.

दरम्यान, १  डिसेंबरपासून सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा सत्र सुरु आहे. एकामागून एक, सरकार आणि सुमारे ४० शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये ११ फेऱ्या झाल्या. मात्र या सर्व बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यात आता तर सरकार कडून शेतकरी आंदोलनाबाबत एक शब्द देखील फुटत नाहीये. चर्चेसाठी आम्ही तयार आहोत असं सरकारपण म्हणतय आहे शेतकरी देखील. मात्र, फायनल उत्तर कोणाकडूनही मिळत नाहीये.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.