राज्यातल्या राजकीय राड्यात कोरोनाचा विसर पडलाय, पण कोव्हिडचं संकट अजून टळलेलं नाही

गेल्या दोन महिन्यापासून राज्यात राजकीय राडा चालू आहे. या राजकीय राड्यात बंडखोर आमदार, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झालीय. मात्र अजूनही या राजकीय राड्याची चर्चा थांबत नाहीये.

आता शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळेल आणि समोरचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल याबद्दलची चर्चा रंगलीय. परंतु या राजकीय राड्यात कोरोनाची चर्चा थांबूनच गेलीय.

चर्चा होत नसली तरी राजकीय राड्यात विसर पडलेल्या कोरोनाचे संकट अजून टळलेलं नाहीय. देशभरात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढायला लागलीय आणि या कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

गेल्या चोवीस तासात देशभरात १६५६१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरात ॲक्टीव रुग्णांची संख्या १,२३ ५३५ वर गेली आहे. तर एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी ४९ रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालाय.

देशात कोरोना रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासात १६७७ रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ॲक्टीव कोरोना रुग्णांची संख्या ११७९० वर पोहोचली आहे. तर गेल्या चोवीस तासात ५ रुग्णांचा मृत्यू झालाय. 

महाराष्ट्रापाठोपाठ दुसऱ्या राज्यात वाढणाऱ्या रुग्णांमुळे सुद्धा चिंता वाढत चाललीय.

महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक राज्यात गेल्या चोवीस तासात १६२४ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर गेल्या चोवीस तासात ६ रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच केरळ राज्यात चोवीस तासात १२१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात १० रुग्णांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देशात सगळ्यात जास्त आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ सह भारतातील सर्वच राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच मृतांचा आकडा सुद्धा वाढत आहे.

भारतातील सर्वाधिक कोरोना मृत्यू महाराष्ट्रातच झाल्या आहेत त्यामुळे भविष्यातील लाटेचा सर्वाधिक धोका राज्यालाच आहे

कोरोनाची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत संपूर्ण देशात ४ कोटी ४२ लाख २३ हजार लोकांना करून झालाय. त्यातील ४ कोटी ३५ लाख ७५ हजार रुग्ण यातून बरे झाले आहेत. तर ५२६९३८ लोकांचा मृत्यू झालाय.

तर याच कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक ८० लाख ६६ हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. त्यातील ७९ लाख ०६ हजार रुग्ण बरे झाले तर १ लाख ४८ हजार १६२ लोकांचा मृत्यू झालाय. तसेच आजही सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रातच आहे. 

गेल्या साडे तीन महिन्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी चढत्या उतरत्या स्वरूपाची राहिली  आहे.

१ मे २०२२ रोजी २४ तासात १६९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यांनतर १ जून रोजी १०८१ रुग्णांची नोंद झाली होती. तसेच १ जुलैला २९७१ रुग्णांची नोंद झाली होती. तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी ८३० रुग्णांची नोंद झाली होती.

१ मे २०२२ ते १ जून २०२२ दरम्यात २६ जुनला सर्वाधिक ६४९३ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र  या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ ऑगस्टला ८३० रुग्णांची नोंद होऊन यात घट झाली होती.

परंतु गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. २ ऑगस्टला १८८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर ११ ऑगस्टला १८७७ रुग्णांची नोंद झालीय. 

कोरोना रुग्णांच्या संख्येसोबत मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.

गेल्या सडे तीन महिन्यात देशभरात कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या सुद्धा वाढतच आहे. १५ मे  २०२२ रोजी देशभरात कोरोनाच्या १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात वाढ होऊन १७ जूनला ३३० करून रुग्णांचा मृत्यू झाला होता.

१७ जूननंतर मृत्यूच्या संख्येत घट व्हायला लागली होती. १ जुलैला २३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु पुन्हा त्यात वाढ होऊन ५ ऑगस्ट रोजी ७० जणांचा मृत्यू झाला होता. तर काल ११ ऑगस्ट रोजी ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशभरात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्रातील संख्या मोठी आहेत. तसेच महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युदर १.८३ टक्के इतका आहे आणि रिकव्हरी दर ९८.१७ टक्के आहे.    

मुंबईतून मोठ्या प्रमाणावर प्रवास केल्या जाणाऱ्या अमेरिकेतही हा धोका मोठा आहे.

कोरोना रुग्णांची संख्या निव्वळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा वाढत आहे. अमेरिकेमध्ये गेल्या २४ तासात १ लाख ५८ हजार ७७८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८ ऑगस्ट २०२२ ला ११६२ रूग्णांचा मृत्यू झालाय.

भारतातून अमेरिकेत जायचे असल्यास मुंबई आणि दिल्लीतून प्रवास केला जातो. विमान प्रवासातूनच भारतात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे अमेरिकेत कोरोना रुग्णांचा वाढल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या रुग्णसंख्येवर याचा परिणाम होऊ शकतो.

 कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतेय तरीही महाराष्ट्रात अजून आरोग्यमंत्री नाही….

मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाकाळात चांगली कामगिरी केली होती असे महाविकास आघाडीच्या बाजूने सांगितले जायचे. मात्र गेल्या दिड महिन्यांपासून कोरोनाचे संकट वाढण्याची स्थिती निर्माण होत असतांना राज्याला आरोग्यमंत्री नाहीय. 

त्यामुळे राजकीय राड्यात सत्ता कुणाची असेल या चर्चेत हरवलेले करोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. अलीकडच्या आकडेवारीवरून करून संकट आणखी गंभीर होईल असे तज्ज्ञ सांगतात. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.