राज्यात सध्या कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्याची जणू स्पर्धाच सुरु झालीय

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने शासन आणि प्रशासन आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने सल्ले देत आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहे. मात्र राज्यात सध्या विचित्र परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने असणारे नियम कसे पायदळी तुडविले जातील याची जणू स्पर्धा सुरु असल्याचे चित्र  दिसून येत आहेत. कोण किती नियम चांगल्या पद्धतीने मोडू शकतो याचे चित्र रोज वृत्तवाहिन्यांवर सुरु आहे. सभा, मोर्चा, आंदोलने आणि मिरवणूका सर्व काही सुरु आहे. यामध्ये एकटा कुणी राजकीय पक्ष किंवा संघटना नसून सगळ्यांचा थोड्या जास्त प्रमाणात सहभाग आहे. जर हे वातावरण असेच राहिले तर भविष्यात मोठी रुग्णवाढ वाढून धोके संभवतात.

आरोग्याच्या दृष्टीने असणाऱ्या नियमांचे पालन होत नसेल तर मोठ्या प्रमाणात आरोग्याची हानी पोहचू शकण्याची शक्यता असून आपण भयंकराच्या दारात उभे आहोत अशीच काहीशी स्थिती सध्या आहे. 

आरोग्य तज्ञ विविध शक्यता वर्तवून साथीच्या आजाराच्या अनुषंगाने कसे वागले पाहिजे याचे रोज धडे देत आहेत. राज्याचे प्रमुख याच विषयाला घेउन वारंवार नागरिकांना त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षांना आणि संघटनांना, मंडळांना आवाहन करत आहेत. काही जण चांगला प्रतिसाद देत आहेत तर काही बिनधास्तपणे नियम धाब्यावर बसवत आहेत. या नियम तोडण्याच्या ‘ स्पर्धेला ‘ वेळीच लागाम लावावा लागणार आहे. निर्बंध लावले कि नागरिक रोष व्यक्त करतात नाही लावले तर साथीच्या आजाराचा संसर्ग बळावण्याची शक्यता वाढणार आहे. 

आरोग्य प्रथम हा विचार करून शासन कठोर नियम करत असतील तर  वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून स्वागतच केले पाहिजे. 

प्रशासनाने नियम बनविले की ते कसे तोडता येतील याकडे हल्ली काहीजणांचा कल आहे. काही ठिकाणच्या गर्दी होण्याला पर्याय दिसत नाही या अशा प्रकारामध्ये रेल्वे आणि बस प्रवास येतात. मात्र तिकडे गर्दी चालते मग आम्ही गर्दी केलेली चालत नाही का ? हा उलटप्रश्न करून आम्ही पण गर्दी करू. कोरोनाच्या आजारात किती जणांचा बळी गेलाय आणि त्या आजराने किती जणांना छळलय याचा ‘ आंखो-देखा ‘  हाल सगळ्यांनीच पाहिलाय.

या आजाराची एवढी दाहकता असल्याचे माहित असूनही नागरीक घाबरत का नसावे हा एक संशोधनाचा प्रश्न आहे. नियम आणि निर्बंध लावण्यामागे प्रशासनाचा काहीतरी महत्तवपूर्ण हेतू असू शकतो, हे ध्यानीच घ्यायचं नाही असं काहीसे ठरविले आहे का ? हा सवाल येथे उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. 

काही ठिकाणच्या सभा, मोर्चा, मिरवणूका पहिल्या तर  नागरिकाचे हे जत्थेच्या जत्थे हिंडत असतात. कोरोना हा साथीचा आजार असून तो टाळण्याकरिता शक्य तेवढं अंतर पाळावे असे कोरोना साथीच्या सुरवातीच्या काळापासून सांगतिले जात आहे. लसीचे दोन डोस घेतले असतील तरी सुद्धा तेच नियम आजतागायत कायम आहेत त्यात कोणताही बदल केलेला नाही. 

राज्यातील वैद्यकीय तज्ञ ज्यांनी सुरुवातीच्या काळापासून नागरिकांना उपचार देऊन घरी पाठविले, जर ते अशा पद्धतीचे नागरिकाचे वर्तन बघत असतील तर त्याच्या मनात काय विचार असतील, साहजिकच त्यांना ह्या गोष्टींचा संताप येत असणार. तरीही ते ज्या ठिकाणी गोष्टी मांडायच्या असतात तेथे ते आपले विचार निर्भीडपणे मांडतच असतात. केरळ राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने वेग पकडला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला परिस्थिती चांगली असली तरी ती परिस्थिती बिघडण्यास जास्त वेळ लागणार नाही हे चित्र आपण दुसऱ्या लाटेच्या वेळी पाहीले आहे. विषाची परीक्षा घेऊ नये अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे, मग का आपणास वैद्यकीय सल्ले तज्ञांनी दिले असताना आपण असे वागत आहोत?

पाश्चिमात्य देशात तिसऱ्या लाटेने डोकं वर काढले आहे. ते देश त्या- त्या परिस्थितीनुसार त्यांनी काही निर्बंध पुन्हा लावण्यास सुरुवात केली आहे. समस्या सोडविण्याकडे ध्येय असणारे आज आपण समस्या जटील होईल या दृष्टीने तर प्रयत्न करीत नाही ना, अशी शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करावेत आवाहन राजकीय पक्ष आणि संघटनाना केले आहे. गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय योजना केल्या जाणार आहेत. त्या संदर्भातील नियमावली लवकरच येण्याची शक्यता आहे. राज्याचे प्रमुख कोरोनाचा वाढता संसर्ग धोक्याचा इशारा आहे असे सांगत असतील तर त्याचे महत्त्व सगळ्यांनीच ओळखून हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 

प्रत्येक नागरिकांच्या मागे पोलिसांना ठेवणे शक्य नाही, नागरिकांनी जबाबदारी ओळखून कोरोना नियमांच्या अनुषंगाने सुरक्षित असे वर्तन ठेवले पाहिजे. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे याकाळात होणाऱ्या गर्दी कशी टाळता यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहेत. अनेक सामाजिक मंडळ आणि संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी उत्सव छोटेखानी ठेवण्यावर भर दिला आहे.            

याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की,

” काही नागरिकांची मानसिकता झाली आहे की आपण लसीचे दोन डोस घेतले आहे त्यामुळे काही होणार नाही. मात्र तो चुकीचा समज आहे. दोन डोस घेतल्यानांतरी काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्याची दाहकता गंभीर नसली तर तो होऊ शकतो हे तितकंच वास्तव आहे. गेल्या महिनाभरात आपण बरे निर्बंध उठविले तरी फार काही संख्या वाढलेली नाही. मात्र या काळात गर्दीत जर कोरोनाचा उपप्रकार (नवीन प्रकार) आला तर मात्र त्यामुळे मोठया प्रमाणात धोके संभवतात. त्यामुळे येत्या काळात लसीकरण मोहिमेवर जोर देऊन लोकांना जागृत राहण्यास सांगणे एवढेच आपल्या हातात आहे. गणपतीच्या नंतर काही बदल होतो का यावर प्रशासनाला बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.”

तर राज्य कोरोना विशेष  कृती दलाचे सदस्य डॉ राहुल पंडित हे मत व्यक्त करतात की,

” कोरोनाच्या या साथीकडे आम्ही वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहतो आणि त्या पद्धतीने  उपाय सुचवत असतो. मात्र या कायदा राबविण्याची जबाबदारी शासनाची आहे, त्यावर मी काही भाष्य करणार आहे. लसीकरण मोहिमेवर अधिक काम करणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर पाळणे गर्दी टाळणे हे केले पाहिजे. गर्दी जर वाढली आणि जर निष्काळजी पणा काही झाला तर रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, एवढंच मी येथे सांगू शकतो.”

नियम पाळण्याचा फायदा हा राज्यातील सर्वच नागरिकांना होणार आहे, आता ते किती जबाबदारीने पाळायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आज राज्यातील परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने बरी आहे. जर ही परिस्थिती अशीच चांगली राहिली तर मुलांचे कॉलेजेस आणि शाळा सुरु होण्याचा मार्ग सुकर होण्यास मदत होऊ शकते. सध्या ती काळाची गरज आहे. गेले दीड वर्ष विद्यार्थी शाळेत गेलेलं नाही यांचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे त्या मुलांच्या भवितव्याकरिता मोठ्यांनी आज शहाण्यासारखे वागणे गरजेचे आहे. आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्ग सगळी परिस्थिती उत्तम रित्या हाताळीत आहेत. त्यांच्या या कार्याला बळ देण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे.

  • संतोष आंधळे 

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.