महाराष्ट्रात कोरोना वाढतोय का? पुन्हा लॉकडाऊन होणार का?

नववर्षाची सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रिवर्स गिअरमध्ये वाटचाल करत होती. त्यामुळे दोन्हीकडच्या सरकारनी पण निर्बंध कमी केले होते. पण पुढच्या १५ दिवसातच महाराष्ट्रात अचानक गिअर बदलला आणि रुग्णसंख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली.

महाराष्ट्रात जानेवारीच्या १८- १९ तारखेला आणि त्या आगोदर १ हजार ८०० ते २ हजार या दरम्यान होत असलेली रुग्ण वाढ २० जानेवारी आणि त्यानंतर २ हजार ७०० ते ३ हजार या घरात गेली. फेब्रुवारीमध्ये तर हा आकडा आणखी वाढला.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन रुग्णांची संख्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत १४ टक्क्यांनी जास्त होती. रविवारी आठवडा संपताना म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी २० हजार २०७ नवीन रुग्ण वाढले होते. त्याच तुलनेत पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ७ फेब्रुवारी या दरम्यान १७ हजार ६७२ रुग्ण आढळले होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हि संख्या १७ हजार २९३ एवढी होती.  

एकूणच मागच्या १५ दिवसांच्या तुलनेत ८ ते १४ फेब्रुवारी या काळात ३ हजारच्या आसपास रुग्ण वाढले आहेत. 

यात सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई, पुण्याचा आजूबाजूच्या भागातील आणि विदर्भातील होते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि अमरावती या भागातील होते.

८ ते १४ फेब्रुवारी या काळात नवीन रुग्णांमध्ये ३ हजार २२८ रुग्णांसह पुण्याचा नंबर पहिला होता. त्या खालोखाल २ हजार ६२८ रुग्णांसह नागपूर होते, तर २ हजार ४२० रुग्णांसह अमरावती. तर मुंबईत २ हजार १९५ आणि ठाण्यात १ हजार ९६० रुग्ण होते.

याच काळात पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी एका दिवसात ६०० पेक्षा जास्त रुग्ण मिळाले आहेत. तर नागपूरमध्ये आठवड्यात २ दिवस ५०० रुग्ण मिळाले होते.

महिन्याभरापूर्वीपर्यंत अमरावती शहरात दिवसाला ७० पेक्षा कमी रुग्ण सापडत होते. १४ फेब्रुवारी हीच संख्या ४०० च्या घरात गेली होती.

ही रुग्णवाढ ग्रामीण भागात पण होत आहे का ?

तर हो. अकोला जिल्ह्याचं उदाहरण घेतल्यास ९ फेब्रुवारीपर्यंत अकोला शहर वगळता इतर भागात दररोज १०-१५ असणाऱ्या रुग्णांची संख्या १४ तारखेला ५० आणि १७ तारखेपर्यंत ८० च्या घरात गेली होती.

तर अमरावतीमध्ये शहर वगळता इतर भागात ९ फेब्रुवारीला ७५ रुग्ण होते. १७ फेब्रुवारीला हा आकडा २०० च्या पार गेला आहे. 

तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात देखील मागच्या १५ दिवसांमध्ये १ हजार ९७ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ८० टक्के रुग्ण हे सातारा शहर वगळता जिल्ह्याच्या इतर भागातील आहेत.

जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी देखील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं म्हंटल आहे. मात्र, विशेषत: ग्रामीण भागातील काही गावांत याचे प्रमाण अधिक आढळून आल्याचं ही त्यांनी सांगितलं.

या रुग्णवाढीची कारण काय असू शकतात? 

या रुग्णवाढीची काही कारण सांगितली जात आहेत. ती म्हणजे निर्बंध कमी झाल्याने नियम न पाळणे, लग्न समारंभाला गर्दी करणे, विकेंडला फिरण्यासाठी बाहेर पडणं. ही कारण तर आहेतच.

पण त्यासोबतच राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांनी abp माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना काही प्रमुख कारण सांगितली आहेत.  

एक तर हवामानातील बदल. मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची लाट आली होती. तापमानात घट झाली होती. हे बदलेल हवामान ट्रान्समिशनच्या वेग वाढीला कारणीभूत आहे.

राज्याच्या ग्रामीण भागामध्ये रुग्ण वाढण्याचं कारण सांगितलं ते म्हणजे नुकत्याच १४ हजार गावांमध्ये पार पडलेलं ग्रामपंचायतीचे मतदान. यात मतदानाची टक्केवारी बघितली तर ती ८० टक्के होती. म्हणजे लोकांचा सहभाग लक्षणीय होता. त्यातून प्रचार, मतदान यासाठी एकत्र येणं, आणि सोबतच शहरातील लोक मतदानासाठी गावाकडे जाणं यातून ग्रामीण भागामध्ये नव्याने रुग्णवाढ होत असल्याचं निरीक्षण डॉ. आवटे यांनी नोंदवलं.

लसीकरण अजून सामान्य लोकांपर्यंत पोहचलेलं नाही, त्यामुळे देखील रुग्णवाढ होत आहे का? असा प्रश्न सध्या सगळीकडे विचारला जात आहे.

त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी ‘बोल भिडू’ शी बोलताना सांगितलं की,

सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लसीकरण सुरु आहे. हे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मानलं जात आहे. त्यामुळे याचे परीक्षण होऊन अजून सर्वसामान्य लोकांपर्यंत लस पोहचण्यासाठी मे, जून महिना उजाडू शकतो. त्यामुळे तो पर्यँत सर्वसामान्य लोकांना स्वतःच काळजी घेणं अनिवार्य आहे.

आणि लसीकरण नाही म्हणून कोरोना पसरत आहे असं पण नाही. लोकांचं बाहेर फिरणं, राजकीय सभा, संमेलन, लग्न यामध्ये ५० ही उपस्थितीची मर्यादा असून देखील ५०० ते अगदी ५ हजार लोकांची गर्दी होते. इथेच लोक एकत्र आल्यामुळे जास्त विषाणू पसरला आहे, असं ही त्यांनी सांगितलं.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? 

राज्यातील अकोला, वर्धा, औरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, वाशिम, भिवंडी, अमरावती, सांगली या जिल्हा प्रशासनांनी काही निर्बंध लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यात शाळा-महाविद्यालय तूर्तास बंदच ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यामधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,

तिथली परिस्थिती गंभीर होत आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा ते ठरवलं जाईल. त्याचवेळी ग्रामीण भाग त्यात घ्यायचा का यावर पण निर्णय घेऊ असं ते म्हणाले.

तर काल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ माध्यमांशी बोलताना म्हणाले,

पुण्यामध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे मात्र त्यावर लॉकडाउन हा काही तातडीचा उपाय नाही. असं म्हणत त्यांनी पुणेकरांना लगेच लॉकडाउनला सामोरं जावं लागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.