भिडू कोरोनाची लस घेतली कि नाही? इथं लस घेणाऱ्याला वॉशिंग मशीन बक्षीस देतायत..

तुम्ही लस घेतली का ? नसेल घेतलात तर घेऊन टाका…कारण ऑफरच असली भारी आहे कि कुणीही नाही म्हणणार नाही. तुम्ही जर लस घेतली तर तुम्हाला त्याबदल्यात भारी भारी बक्षिसं म्हणून फ्रीज. मिक्सर आणि वॉशिंग मशीन अशा वस्तू मिळणार आहेत.

आता तुम्ही असं विचारणार कि, लशीची ऑफर कशी काय असणार ना? इथं मॉल आहे काय ऑफर सांगायला…असो तुम्हांला जर हि ऑफर पाहिजे असेल तर तुम्हाला तामिळनाडू मध्ये जावं लागेल. कारण तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यातलं एक गाव आहे तिथे हि ऑफर चालूये.

मुद्द्यावर येते. कोरोनाच्या २ लाटा येऊन गेल्या तरीही काही नागरिक लसीकरणाबाबत तितके गंभीर नाहीत असं दिसून येतंय. देशातल्या एकूण लसीकरणाच्या मानाने अजून निम्मं देखील लसीकरणाजवळ आपण पोहचू शकलो नाहीत. त्याला कारणीभूत असणाऱ्या बाजू म्हणजे एक तर आपली आरोग्य यंत्रणेची कासवगती आणि दुसरी बाजू म्हणजे नागरिकांची लसीकरण करण्याची उदासीनता.

याच मुद्द्याला धरून तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यात एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. लस घ्या म्हणून नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यात जे जे नागरिक  करोनावरील लस घेतील त्या नागरिकांना वॉशिंग मशीन आणि मिक्सर सारखे मोठ-मोठे गिफ्ट्स देण्यात येत आहेत.

आता काय करणार लोकं जर लसीकरणाला तयार नसतील तर त्यांना असलीच काही आमिष दाखवावी लागणार आहेत. 

तामिळनाडूच्या करूर जिल्हा प्रशासनाने तर अशीचऑफर लोकांना दिलीये कि, लस घ्या अन् वॉशिंग मशीन आणि मिक्सरसारखे बंपर गिफ्ट्स मिळवा. करूर जिल्हा प्रशासन मेगा लसीकरण मोहिम राबवणार आहे. नागरिकांना लस घ्या म्हणत तेथील प्रशासन कोणतीच कसर ठेवत नाहीये तरी देखील नागरिक हा म्हणता लस घेईनात. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी हि ऑफर काढली आहे.

बरं हि पहिलीच नाही तर या अशा मेगा लसीकरण मोहिम याधी देखील आयोजित केल्या गेल्या होत्या.

जिल्ह्यातील प्रशासनाने आयोजित केलेली हि पहिली नाही तर, पाचवी मेगा लसीकरण मोहिम आहे.

१८ वर्षा वरील नागरिकांसाठी हि लसीकरण मोहीम राज्यात आयोजित करण्यात आलीये. पण यासाठी प्रोसेस अशी ठेवलीये कि, लसीकरणाच्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर लकी ड्रॉ घेणार आहेत. तसेच या लकी ड्रॉ मध्ये घरगुती उपकरणांसह इतर मोठ मोठ्या वस्तू बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. हो हे खरंय, करूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी टी. प्रभू शंकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.

या लकी ड्रॉ मध्ये सर्वात पाहिलं आणि मोठं बक्षीस म्हणजे वॉशिंग मशीन आहे, तर दुसरं बक्षीस वेट ग्राइंडर आणि तिसरं बक्षिस मिक्सर ग्राइंडर ठेवण्यात आलं आहे.या शिवाय इतरही २४ मोठ्या वस्तूंचा देखील समावेश आहे. आणखी म्हणजे इतर १०० वस्तू उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. 

करूर जिल्ह्याच्या या अनोख्या ऑफरचं राज्याचे आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम यांनीही कौतुक केलं आहे.

विशेष म्हणजे, २५ पेक्षा जास्त लोकांना जर तुम्ही लसीकरणासाठी मनवलं तर त्या व्यक्तींसाठी एक खास लकी ड्रॉ आहे, अशी माहिती तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

आता तुम्ही विचार कराल राव हे असलं प्रशासन आपल्या जिल्ह्यात का नाहीये ?

थांबा…..

मुळात हा विचार करणं कितपत योग्य कि, तुमच्याच आरोग्याच्या आणि जीवाच्या सुरक्षेसाठी या लसीकरणाचा खटाटोप चालूये ना. मग तुमचा जीव वाचवण्यासाठी सरकारने तुम्हाला का आमिष दाखवावं?

तर मग भिडू जाणार ला तामिळनाडूला ? कुठेही जा कोणत्याही लसीकरण केंद्रावर जा आणि आपलं लसीकरण पूर्ण करून घ्या..

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.