कोणीही आपलं शेत विकलं नाही तरीही हे आहे देशातलं सगळ्यात श्रीमंत खेडेगाव

आपला भारत आज विकासाच्या दिशेनं वाटचाल करतोय, हेच कारण आहे की, त्याचं नाव आज विकसनशील देशांमध्ये यादीत घेतलं जातात.  देशातली हेल्थ सिस्टिम, एज्युकेशन सिस्टीम आधुनिक होत चाललीये.

देशाचा नागरिक जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. इथला काही भाग अजूनही विकासासाठी धडपडत असला तरी काही भाग सुख: सुविधांनी समृद्ध बनत चाललाय.

भारतात असचं एक गाव आहे, ज्याचं नाव आशियातल्या सगळ्यात श्रीमंत गावांच्या  यादीत घेतलं जातं. ते गाव म्हणजे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातलं मधापर. देशातलं सगळ्यात श्रीमंत गाव म्हणून याची ओळख आहे.  जे कोणत्याही पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही.

मधापर गावात 7600 घरे आहेत. प्रत्येक घर पहायला म्हणाल तर एकपेक्षा एक. महत्त्वाचं म्हणजे या गावात 2 – 4  नव्हे तर जवळपास 17 बँकां आहेत.  या बँकांमध्ये मोठ्या रकमा जमा आहेत.

गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील लोकांचं परदेशाशी खास कनेक्शन आहे. कारण इथली निम्म्याहून जास्त लोक  लंडन आणि युरोपात राहतात. हे गाव इतकं समृद्ध आहे की, जगभरातून लोक ते पाहण्यासाठी येतात.

गावात एंट्री मारली की, आपल्याला एखाद्या साऊथ इंडियन फिल्म सारखं वाटेल. कारण इथले  एंट्री गेट, कमानी साऊथच्या  एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेट सारखीच आहेत.

या गावातील लोकांनी परदेशात  आपलाच एक क्लब तयार केलाय.  ज्याचं ऑफिसही आहे.  खरं तर 1968 सालीच लंडनमध्ये ‘मधापर व्हिलेज असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन झालीये. त्याचं कार्यालयही उघडण्यात आलेय, जेणेकरून ब्रिटनमध्ये राहणारे मधापर गावातील सर्व लोक कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यक्रमाच्या बहाण्याने एकमेकांना भेटत राहतील.

त्याचप्रमाणे गावातही असंच एक ऑफिस उघडण्यात आलयं, जेणेकरून लंडनशी थेट कनेक्ट राहता येईल.

या गावात ज्या 17 बँका आहेत, त्या सगळ्या मोठ- मोठ्या बँकांच्या शाखा आहेत. यात 5000 कोटी जमा आहेत. प्रत्येक बँकेत कमीतकमी 100 कोटी रूपये फिक्स डिपॉझिट आहे.

सामान्यपणे छोट्या खेड्यापाड्यातली, गावातली लोक पोटापाण्यासाठी देशातल्या इतर मोठ्या शहरांची वाट धरतात.  पण या गावातली लोकं विमानानं थेट विदेश गाठतात.  भारताच्या इतर शहरांमध्ये जाण्यापेक्षा इथली मंडळी केनिया, लंडन, कॅनडा, अमेरिका, केनिया, युगांडा, मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका आणि टांझानियात गेलेत आणि तिथेच  जाऊन स्थिरावलेत.

मधापर गावातील लोक परदेशात जातात, तिथं पैसे कमवतात आणि गावात जमा करतात. या गावातील प्रत्येक घरातून किमान 02 लोक तरी परदेशात राहतात.

कच्छ जिल्ह्यातील या गावात, प्ले स्कूल ते इंटर कॉलेज पर्यंत हिंदी आणि इंग्रजी मिडीयमचं शिक्षण दिलं जातं. गावात इतर सुख – सुविधा तर आहेच, सोबत गावाचा स्वतःचा शॉपिंग मॉल आहे, जिथे जगभरातील मोठे ब्रँड आहेत. गावात एक तलाव आणि मुलांच्या एंजॉयमेंटसाटी एक जबरदस्त स्वीमिंग पूलही आहे.

महत्त्वाचं म्हणजे या गावातील लोक अजूनही शेती करतात, कोणीही त्यांची शेती विकली नाही. गावात एक अत्याधुनिक गोशाळा देखील आहे. गावात अत्याधुनिक सुविधांसह आरोग्य केंद्र आहे. स्वतःचा कम्युनिटी हॉल आहे. गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये 200 कोटी रुपयांची मुदत ठेव आहे.

गुजरातच्या स्टेट लेवल बँकर्स कमिटी (SLBC) चे माजी समन्वय केसी चिप्पा  यांनी सांगितलं की, मधापर गावात एनआरआय डिपॉझिट देशात सर्वात जास्त आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गावातली लोक जरी  गावाबाहेर गेली असतील, पण त्यांनी गावाकडं कधीच दूर्लक्ष केलं नाही. ते नेहमीच गावाला धरून राहिले. त्यांचा गावाशी संपर्क अजूनही कायम आहे.

हे ही वाचंं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.