राहूल गांधी आणि मोदींमुळे आमच जुळलं… 

राहूल गांधी आणि नरेंद्र मोदी. दोघेही सिंगल. आत्ता दोघांच्या सिंगल असण्याची कारण वेगवेगळी असली तरी दोघे सिंगल आहेत याबद्दल कोणाच दुमत असण्याच कारण नाही. या दोन सिंगल नेत्यांच्या  भांडणामुळे संपुर्ण देश सिंगल राहिलं याची चिंता आम्हा भिडू लोकांना वाटायची. पण झालं अस की मागच्या तुळशीच्या लग्नापासून देशात लग्नाचा मौसम सुरू झाला. 

कोहली, पादुकोन, अंबानी, ठाकरे, चोप्रा पासून ते थेट कालपरवा सिद्धार्थ चांदेकरचं देखील वाजलं. थोडक्यात राजकारणापायी स्वत:च्या आयुष्याची राखरांगोळी करणारी हि पिढी नाही हे प्रत्येकानं सिद्ध केलं. 

आत्ता या लिस्टमध्ये अजून एक यंग्राट मॅटर अॅड झाला आहे. तर मॅटर असा की, राहूल गांधी आणि मोदींमुळे या जोडप्याचं सुत जुळलं. 

तर झाल अस की, 

नुकत्याच झालेल्या ५ राज्यात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दोन्हीकडच्या ट्रोल लोकांना जोरात काम मिळालं. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कमेंटचा रतीब पडू लागला. यात राहूल गांधींनी एक  पोस्ट टाकली, पोस्ट अशी होती की पराभूत झालेल्या सरकारबद्दल चार शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. 

झालं आत्ता कमेंटबॉक्समध्ये धुरळा आणि राडा करण्यासाठी एकामागून एक लोक येवू लागले. पण त्यामध्ये एक अस्सल भिडू होता. हा मुलगा योगायोगाने गुजरातचा होता, त्याचं नाव जय दवे आणि त्यातही तो मोदी भक्त आहे. राहूल गांधीच्या पोस्टमुळे त्या मुलाच्या भावना दुखावल्या. आपल्या नेत्याचा पराभव कसा होवू शकतो म्हणून त्याने राहूल गांधींच्या पोस्टवर कमेंट टाकली. 

झालं, ती कमेंट अचूक वेळी एका अचूक मुलीने लाईक केली. आत्ता इथे एखादा कम्युनिस्ट असता तर त्याने फेक अकाऊंट म्हणून त्यावर संशय घेतला असता. पण इथे गोष्ट वेगळी होती. तो मुलगा तिच्या मॅसेंजर बॉक्समध्ये गेला. जेवण झालं का वगैरे न विचारता त्याने थेट मोदी विषयाला हात घातला. 

वैचारिक पातळीवर त्यांच जुळून आलं. हळुहळु गडी प्रेमात पडला. विशेष म्हणजे तिकडून पण सगळ पॉझिटिव्ह चाललेलं. मग भिडूने हिम्मत केली आणि तिला लग्नासाठी प्रपोज केल.

वहिनींनी ते स्वीकारलं. दोघांचं लग्न झालं. जय ने आपण लग्न केल्याचं ट्विट करून आपण कसे भेटलो आणि आपण लग्न कसं केलं हे सविस्तरपणे सांगितलं. सगळीकडून शुभेच्छा मिळायला लागल्या. काही जण म्हणाले, “राहुल गांधींना आपल्यासाठी जोडीदार शोधता आला नाही पण त्यांच्यामुळे कोणाचं तरी लग्न होतय चांगलं वाटतंय. आता राहुल गांधींनी पण उरकून घ्यावं.

तर काही जण म्हणत होते तुम्ही एकमेकांशी लग्न केलत हे किती बरं झालं त्यामुळे दोन घरांची बरबादी वाचली. तर कॉंग्रेसचे भक्त म्हणाले, त्यांचं लग्न राहुल गांधींच्या फेसबुक पेज वरून झालाय तर त्यांनी त्यांचे जास्त आभार मानले पाहिजेत. बाकी राहिलेल्या भिडू लोकांनी थेट राहूल गांधीच्या पोस्टवर कमेंट करायला सुरवात केली. काय माहिती अज्जून कोणाचा नंबर लागला तर भलच होईल.

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.