चळवळीतले मित्र सांगत होते सिनेमात काम करू नको, पण याच सिनेमाने चळवळीला ऑस्करला नेलं

रान रान रान उठवू सारे रान रे, जाण जाण जहरी दुष्मनाला जाण रे…..

संभाजी भगतांचा भारदस्त पहाडी आवाज एका वेळेला वीराचा स्वतःचा आहे इतका सशक्त अभिनय, गर्द डोळ्यातून भिरकावला गेलेला विद्रोही एल्गार, ना अंगविक्षेप करून केलेला अभिनय, ना पल्लेदार डायलॉग, कोर्ट सिनेमाच्या माध्यमातुन वीरा अगदी प्रत्येकाच्या मनात अगदी रुतून बसला होता. विद्रोही शाहिरांच्या रांगेतला एक उच्चकोटीचा शाहीर आज महाराष्ट्राने गमावलाय.

आंबेडकरी चळवळ जितकी प्रवाही राहिली त्यातूनच वीरा साथीदार सारखा एक निडर आंबेडकरी अभ्यासक आणि  सैनिक उभा राहिला. चळवळीतील अशी माणसं उभी राहायला किती तरी मोठा काळ लागतो. चळवळीतील एक खंदा माणूस महाराष्ट्राने गमावलाय.

कोर्ट सिनेमातील नारायण कांबळे अगदी ऑस्करलासुद्धा धडक मारून आला होता. वीरा साथीदार यांनी साकारलेला नारायण कांबळे लोककलाकार जेव्हा ध्यानीमनी नसताना कोर्टात खेचला जातो तेव्हा त्याचा धुमसणारा अंगार पाहण्याजोगा आहे. आतापर्यंत कधीही कॅमेरासमोर न आलेले चळवळीतील कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी कोर्ट सिनेमात प्रमुख भूमिका रंगवली.

कोर्ट सिनेमाला सुवर्णकमळ हा सर्वोच्च बहुमान मिळाला. राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय असे एकूण तब्बल १८ पुरस्कार पटकावले होते. फक्त एक अभिनेता नाही तर लेखक,कवी, सामाजिक कार्यकर्ता, शाहीर आणि पत्रकार म्हणून ते सर्वश्रुत होते.

वीरा साथीदार यांच्या आईवडिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं होतं. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वीरा साथीदार हे स्वतःच शिक्षणही पूर्ण करू शकले नाही. मात्र बालपणापासून त्यांच्या मनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. पुढे चळवळीत आल्यावर त्यांनी नेटाने आंबेडकरी चळवळी चालवल्या, समाज प्रबोधनासाठी गावच्या गावं पालथी घातली.

जत्रा, उरुसांमध्ये तिथल्या लोककलाकारांची विविध गाणी, कव्वाली ऐकत रात्रभर त्या लोकांसोबत त्यांना कोरस देण्याची वीरा साथीदार यांना आवड होती.

कोर्ट चित्रपटातली भूमिका कशी मिळाली याचा त्यांनी एक सांगितलेला किस्सा :

मुंबई पुण्यात चित्रपट करणारी लोकं जास्तच आहेत, आणि नागपूर या सगळ्या झगमगाटापासून दूरवर आहे. मी कधी कल्पनाही केली नव्हती कि मी चित्रपटात काम करेल, लोकांना पडद्यावर दिसेल वगैरे.कोर्ट चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे हा चित्रपट लिहीत असताना त्यांच्या डोक्यात काही व्यक्तिरेखा होत्या, त्यांच्या एका मित्राच्या ओळखीने त्यांनी मला सिनेमात काम करणार का अशी ऑफर दिली.

सिनेमात काम करायला मिळणार म्हणून मी खुश झालो होतो पण माझे चळवळीतील काही विश्वासू मित्र मला म्हणाले कि तू सिनेमात काम करायचं नाहीस. आपल्याला इथं बरेच कामं आहेत, संघटनेची काम आहेत, मॅगझीन काढायचं आहे. यावर त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं कि कथा सामाजिक असेल किंवा आपल्या कामाविषयीची असेल तर आपण ती पडद्यावर नेऊन जगभरात आपली गोष्ट नेऊ शकतो, आपलं कामही दूरवर पोहचेल. अशा प्रकारे त्यांच्या सगळ्या मित्रांनी सर्वानुमते त्यांना चित्रपटात काम करण्याची मुभा दिली.

बराच काळ उलटून गेला, त्यांना फोन काही आला नाही. तेही चित्रपटाबद्दल विसरून चळवळीतील कामात मग्न झाले होते. एक दिवस चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला कि तुम्ही मुंबईला या, वीरा साथीदार यांनीही चळवळीतील कामांमुळे मला तिकडे यायला वेळ नाही असं सांगितलं. मग मुंबईला फोटो पाठवा म्हणून त्यांना सांगण्यात आलं. दोन वेगवेगळ्या वेषभूषेतले त्यांचे फोटो बघून दिग्दर्शकही अवाक झाले. पुढे त्यांनीच चित्रपटात शाहिराची भूमिका करावी यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि त्यांनी होकार कळवला.

वीरा साथीदार यांच्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीचा बराच प्रभाव होता, बऱ्याच चळवळींमध्ये त्यांनी अण्णाभाऊंच्या लेखणीतून अवतरलेली अनेक गाणी गेली. महाकवी वामनदादा कर्डक, विलास जोगळेकर यांची गाणीही त्यांना प्रचंड आवडायची.

आंबेडकरी चळवळीतून निर्माण झालेली गाणी समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतात, अण्णाभाऊ आणि वामनदादा यांनी समाजातील जातव्यवस्था ज्या प्रकारे मांडली आहे तस फार थोड्या लोकांना जमतं असं त्यांचं मत होतं.

अशा सगळ्या शाहिरांचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि हि भूमिका ते योग्य पार पाडतील असाही त्यांना विश्वास होता. आपल्यातला शाहीर जागा करण्याची आपल्याला संधी मिळते आहेत तर आपण हा चित्रपट केला पाहिजे असं त्यांना वाटलं, हि भूमिका पुढे अजरामर झाली.

याच सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सुवर्णकमळ देखील जिंकलं होतं. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी कित्येक पुरस्कार मिळवले, अगदी ऑस्करला देखील धडक दिली.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अभिनंदन करताना एका मित्राला त्यांनी सांगितलं होतं कि ,

हे आपण नाही रे, पुरस्कार वगैरेने काही बदलणार नाही, आपल्याला बरंच काम करावा लागणार आहे.

 

करोनाच्या संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून ते आजारी होती. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.