कोरोनाची लस वाया जाते म्हणजे काय होते ते समजून घ्या…

लसीचा तुटवडा या गोष्टीवरून मागच्या ४ दिवसांपासून महाराष्ट्र आणि केंद्रात वाद सुरु आहे. अशातच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील या वादात उडी घेतली. त्यांनी ट्विट करतं महाराष्ट्र सरकारनं लसीकरणावरुन राजकारण न करण्याचा सल्ला दिला. सोबतचं, लसीची आकडेवारी देत राज्यानं जवळपास ६ टक्के म्हणजे तब्बल ५ लिटर कोरोना लस वाया गेली असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर देत महाराष्ट्र शासन राजकारण करतं नसून, याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवत असल्याची टीका जावडेकारांवर केली. तसचं आपल्या राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

हा सगळा वाद होतं असताना दुसऱ्या बाजूला काही चौकस भिडूंना प्रश्न पडायला लागला की, वाद वगैरे ठीक आहे पण हे लस वाया जातं म्हणजे नेमकं काय होतं? आणि ५ लिटर वाया गेली म्हणजे ते नेमकं काय झालयं? हे जरा विस्कटून सांगा. तर त्यासाठीच हा लेख.

लस वाया जाती म्हणजे नेमकं काय होतं?

बेसिक पासून सुरुवात करायची म्हंटलं तर लस वाया जाण्याचे ६ प्रकार असतात. यातील पहिला प्रकार म्हणजे ती लस एक्सपायरी डेट पर्यंत पोहचली असेल तर. दुसरा प्रकार म्हणजे ते एका विशिष्ट तापमानात साठवणूक न झाल्यास. तिसरा प्रकार म्हणजे ती लस गोठल्यानंतर. चौथा लसीची बाटली फुटल्यानंतर. पाचवा प्रकार म्हणजे लस हरवली किंवा चोरी झाली तर.

आणि सहावा आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे व्हायलमधून वाया जाणं.

यातील आता प्रत्येक प्रकार काय ते सविस्तर बघूया.

तर भारतीय लसींची सेल्फ लाइफ ६ महिन्यांची असते. म्हणजे काय तर लस तयार झाल्याच्या ६ महिन्यांच्या आत वापरली जावी. जर तेवढ्या कालावधीत वापरली गेली नाही तर ती लस वाया जाते.

दुसरा आणि तिसरा प्रकार म्हणजे विशिष्ट तापमानाच्या बाहेर साठवणूक झाल्यास किंवा गोठल्यानंतर. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी सांगितल्या नुसार,

दोन्ही भारतीय लसी या २ अंश ते ८ अंश सेल्सियस तापमानातच साठवल्या जाव्यात. त्याचं पद्धतीनं त्या विकसित झाल्या आहेत.

आता जर या तापमानाच्या खाली किंवा वर गेलं तर त्या वाया जातात. फायजर आणि मॉडर्ना या लसींना मायनस ७० अंश सेल्सियस तापमान आवश्यक असते.

चौथा आणि पाचव्या प्रकारात मानवी चुकीमुळे खराब होतात, म्हणजे वाहतूक करताना वाहतुक दाराकडून किंवा लस देताना देणाऱ्याकडून व्हायल फुटणे. किंवा चोरी होणे. पण अशा कारणामुळे लस वाया गेल्याचे प्रकार अगदी कमी प्रमाणात आहे.

सगळ्यात जास्त लस वाया जाण्याचं कारण हे सहावं आहे. 

कोणतीही लस व्हायल (बॉटल) मध्ये ५ किंवा १० डोसेस मध्ये बनते. काही लसी या लसीकरण सत्र संपल्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरता येत नाहीत. अश्या उघडलेल्या व्हायल मधील लसीचे उरलेले डोस सत्र संपल्यावर नष्ट करावे लागतात.

काही लाईव्ह लसी जसं गोवरवरील लसीची वाया जाण्याची टक्केवारी जास्त असते.

तर काही लसी जस धनुर्वाताची लस एका डोसची असेल तर वाया जात नाही. DPT ची उरलेली लस दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरता येते म्हणून पुन्हा साठवली जाते. त्यामुळे ती वाया जाण्याचं प्रमाण कमी असते.

कोरोनाची लस ही पहिल्या गटात मोडते. म्हणजेच लसीकरणाचं सत्र संपल्यानंतर उरलेले डोस साठवता येत नाहीत त्यामुळे ते नष्टच करावे लागतात.

भारतातील कोवॅक्सीनच्या एका व्हायल (बॉटल) मध्ये २० डोस असतात तर कोविशील्डच्या एका व्हायलमध्ये १० डोस असतात. एका व्यक्तीला ०.५ मिली लस दिली जाते.

तर एका व्हायल (बॉटल)चं आयुर्मान हे जास्तीत ४ तास असते. म्हणजेच हे व्हायल (बॉटल) फोडल्यानंतर ती ४ तासाच्या आता संपवणं बंधनकारक असते. जर समजा चार तासात ४ जणांनीच लस घेतली तर उर्वरित पूर्ण व्हायल वाया जाते. त्यामुळे काही प्रमाणामध्ये लस वाया जाणं हे नैसर्गिक असल्याचं डॉक्टर सांगतात. 

आकडेवारी काय सांगते?  

१६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत आता पर्यंत देशात बघितलं तर कोविशील्ड वाया जाण्याचं प्रमाण ६.३ टक्के आहे. म्हणजे १००० पैकी ६३ डोस वाया जातं आहेत. तर कोवॅक्सीनचं प्रमाण २५.८ टक्के आहे. म्हणजे १००० पैकी २५८ डोस वाया जातं आहेत.

जर एकूण लस वाया जाण्यात राज्याची आकडेवारी विचारात घ्यायची म्हंटले तर इंडियन एक्सप्रेसच्या आकडेवारीनुसार, तेलंगणामध्ये १७.६ टक्के लस वाया जाते. त्या खालोखाल आंध्रामध्ये ११.६ टक्के लस वाया जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.२ टक्के आहे. 

तर एकूण देशात ६.५ टक्के लस वाया जाते.

त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी लस वाया न जाऊ देण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं.

लस वाया जाण्यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?

तर वर सांगितलेल्या पहिल्या पाच प्रकारामध्ये मानवी चूक असते. कारण ६ महिन्यांच्या आत ती वापरणे याची जबाबदारी त्या आरोग्य सेवकारावर असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात देखील ठरवून दिलेल्या तापमान साठवल्या नाहीत तर ती चूक साठवणूक करणाऱ्या व्यक्तीची असते.

चौथ्या आणि पाचव्या प्रकारात लसीच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित आरोग्य वर्ग आवश्यक असतो. जर तो नसेल तर फुटणे आणि चोरीला जाणे असे प्रकार होत असतात.

तर व्हायल (बॉटल) मधून लस वाया जाणं हे अगदी नैसर्गिक असल्याचं डॉक्टर सांगतात. कारण सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरणाबद्दल संकोच / भीती असल्याने कित्येक लसीकरण केंद्र पूर्ण क्षमतेनं कार्यरत नव्हती. 

सोबतच एका वेळी जर १० लोकांनाच द्यायची म्हंटलं तर लसीकरण केंद्रामध्ये इतर ५ ते ६ लोक दुरून आलेले असतील तर त्यांना लसीविना परत जावं लागेल. असे करणे चुकीचं असल्यानं सरकारनं असा कोणताही नियम बनवला नाही. त्यामुळे कोणीही लस घेतल्याशिवाय परत गेलं नाही.

आता जर या प्रकारातून लस वाया जाऊ द्यायची नसेल तर ते मुख्यत: जनतेच्याच हातात आहे. त्यासाठी एका वेळी कमीत कमी १० लोकांनी तरी लसीकरणासाठी उपस्थित राहायला हवं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.