त्या कोविड वॉररूममध्ये असं काय घडलं कि, तेजस्वी सूर्याला माफी मागावी लागली..

भाजपच्या बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सुर्या ६ मे रोजी बंगळुरू दक्षिण च्या covid-19 वॉर रूम मध्ये जातात आणि तिथे काम करणाऱ्या 200 कर्मचाऱ्यांची हात जोडून माफी मागतात.

या अगोदरही ४ मे रोजी सूर्या त्याच कोविड वॉर रूम मध्ये पोहोचतात आणि तेथे काम करणाऱ्या १७ मुस्लिम कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन त्यांच्यावर कोविड बेड ब्लॉकिंग घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप लावतात.

वॉररूम मधील केवळ मुस्लिम कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी का घेतली असावी? हा नेमका बेड घोटाळा काय आहे? असे सगळेच प्रश्न तुम्हाला पडले असतील…

तेजस्वी सूर्या यांनी या कर्मचार्‍यांवर आरोप लावल्यापासून तेथील कर्मचाऱ्यांना मानसिक छळाला, आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तसेच त्या आरोप लावलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि त्यांचे फोन नंबर सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहेत.

त्यादिवशी नेमकं झालं काय?

४ मे मंगळवार रोजी, पत्रकार परिषद घेण्यापूर्वी तेजस्वी सूर्या दक्षिण बंगळुरूच्या covid-19 वॉर रूमला पाहणीसाठी पोहोचले आणि हातातल्या कागदावरच्या 17 लोकांची नावं त्यांनी वाचली. ही सगळीच्या सगळेच कर्मचारी मुस्लिम होते. आणि त्यांना बेड घोटाळ्यामध्ये सामील असल्याचा आरोप लावला. त्यांनी दावा केला की त्यात कोविड सेंटरमध्ये बेड बुक केल्यानंतर पैसे घेऊन ते इतरांना देण्यात येत आहेत.

सूर्या यांनी त्या १७ लोकांची पात्रता विचारली. त्यांची तिथे नियुक्ती कशी झाली? कुणा मार्फत झाली इत्यादी प्रक्रिया विचारतात. तेव्हा एका कर्मचाऱ्याने उत्तर दिले की, “बसवगुडीतील एक एजन्सीमार्फत ही नियुक्ती केली जाते”. तेव्हा सूर्या यांच्यासोबत आलेले आमदार रवी सुब्रमण्यम त्या कर्मचाऱ्याला उत्तर देतात की,

“तुम्ही मदरशातून नियुक्ती करता की महापालिकेतून?”

त्यानंतर कचरा प्रशासनाचे जॉईंट कमिशनर सरफराज खान यांच्यावर देखील या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप लावला गेला होता.

त्यानंतर सर्फराज खान यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट लिहिली,

“माझ्यावर कथित घोटाळ्याचे आरोप लावत, मी त्या १७ कर्मचाऱ्यांची मदत केली आहे असा आरोप माझ्यावर केला गेला.

कोविड सेंटर मधील अधिकारी आणि कर्मचारी लोकांचा किमती जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत, त्यांना दहशतवादी संबोधलं जात आहे. आणि माझंही यात नाव गुंतवून याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे. हे बघून खूप दुःख होत आहे”.

आणि त्यावर सूर्या यांनी प्रतिक्रियाही दिली होती, तसेच त्यांनी सर्फराज खान यांना फोन करून म्हटलं की, त्यांनी त्यांचं नाव कधीच घेतलं नव्हतं त्यांच्या सुरक्षिततेसाठी सूर्या नेहमीच पुढे येतील. खान यांच्या कामाचा आपण आदर करत असल्याचेही सूर्या यांनी म्हटलं आहे.

आता तेजस्वी सूर्या यांचं काय म्हणणं?

पुन्हा त्याच कोविड वॉर रूममध्ये जाऊन तेजस्वी सूर्याने सर्व कर्मचाऱ्यांची माफी मागितली. आणि सांगितले की त्यांच्याकडून चूक झाली त्यांना देण्यात आलेल्या यादीत ती सर्व नावे होती ज्यांचा घोटाळ्यामध्ये समावेश असू शकतो. आणि ह्या चुकीमुळे ते कोविड सेंटर आणि तेथील कर्मचाऱ्यांना त्याचा परिणामाला तोंड द्यावं लागलं.

तेजस्वी सुर्या यांनी सांगितले की त्यांचा उद्देश या घटनेला धार्मिक रंग देण्याचा मुळीच नव्हता, ती १७ ही नावे मुस्लिम असल्याचं त्यांच्या लक्षातही आले नव्हते.

‘मी नाही बघितलं की ते नावे हिंदू आहेत का मुस्लिम’.

दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी या प्रकरणाची, तसेच तेजस्वी सूर्य आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सूत्रांच्या नुसार, मुख्यमंत्री खासदार तेजस्वी सुर्या आणि संबंधित आमदार सतीश रेड्डी, सुब्रमण्यम यांच्यावर नाराज असल्याचे कळले आहे.

बोम्मनाहल्ली चे आमदार सतीश रेड्डी हे येदियुरप्पा यांचे जवळचे मानले जातात. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात होणाऱ्या या राजकारणामुळे, सतीश रेड्डी यांना हाताशी धरून, तेजस्वी सुर्या यांच्याकडून माफी मागून घेतली असावी अशीही शक्यता आहे.

एका विशिष्ट समाजाचे कर्मचारीच कसे नियुक्त करण्यात आले असा प्रश्न येथील व्यवस्थापनाला विचारल्याचा, आणि वाद घातलेला व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेजस्वी सूर्या यांच्यावर सोशल मीडिया वर टीका केली जात आहे.

पण ही काही पहिली गोष्ट नाही, यापूर्वी तेजस्वी सुर्या यांचे काही ट्विट ते पाहून तुम्हालाही वाटेल की भाजप अशा व्यक्तीला प्रमोट का करत असतो,

१. ‘दिल्लीतील शाहीन बागेतील आंदोलन बघता देशातील बहुसंख्यांकांनी सतर्क राहायला हवे. कारण दिल्लीत मुघल राज येण्यास वेळ लागणार नाही.’

२. ‘जुन्या जखमा भरल्याशिवाय न्यू इंडियाची निर्मिती होऊ शकत नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागररिकत्त्व देणं म्हणजे सीएए. विरोधकही सीएएचे महत्त्व जाणून आहेत, तरीही विरोधाला विरोध म्हणून ते आंदोलन करत आहेत.’

३. ‘गेल्या शंभर वर्षांत ९५ टक्के अरब महिलांना ऑर्गाज्म नाही मिळाला. तेथील प्रत्येक आईने प्रेमाऐवजी लैंगिक संबंधातून मुले जन्मास घातली आहेत.’

४. “प्रिय हिंदू बांधवांनो… सर्वात महत्वाचा धडा हा आहे की राज्यात सत्तेवर नियंत्रण असेल तरच धर्माचा अंकुश कायम राहतो. त्यासाठी सत्ता हाती असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याकडे राज्याचे नियंत्रण नव्हते तेव्हा आपण आपले मंदिर गमावले. जेव्हा आपण (सत्तेत) परत आलो तेव्हा पुन:निर्माण केलं. सन २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३, पंतप्रधान मोदींमुळे हे शक्य झालं आहे,”

५. “द्रमुक या ठिकाणी अतिशय वाईट आणि धोकादायक विचारधारेचं प्रतिनिधीत्व करते. त्यांची विचारधारा हिंदू विरोधी आहे. प्रत्येक तमिळ व्यक्ती हा हिंदू आहे. ही अशी पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी देशातील सर्वाधिक मंदिरं आहेत. तमिळनाडूची इंच न इंच जमिन ही पवित्र आहे. परंतु द्रमुक हा हिंदू विरोधी पक्ष आहे. आपल्याला त्यांचा पराभव करावाच लागेल,”

हे ट्विट वाचल्यानंतर एकंदरीत तेजस्वी सुर्यांची विचार करण्याची मानसिकता तुमच्याही लक्षात येईल.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.