चेष्टा वाटेल पण धोनीच्या जागी मकरंद देशपांडे भारताचा विकेटकीपर झाला असता..

नाटकासाठी आयुष्य वाहणारे अनेक कलाकार आपल्या सर्वांना माहीत आहेत. अगदी डॉ. श्रीराम लागू यांच्यापासून सध्याच्या काळात असलेल्या प्रशांत दामले पर्यंत एक मोठी पिढी रंगभूमीवर आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. हे कलाकार मध्येच कोणत्यातरी सिनेमात पाहायला मिळतात. पण तरीही त्यांचं पहिलं प्रेम हे नाटक.

असाच एक नाटकवेडा माणूस या रंगभूमीवर सक्रिय आहे. त्याची नाटकं पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. हा माणूस म्हणजे मकरंद देशपांडे.

मकरंद देशपांडे आणि पृथ्वी थिएटर हे एक अनोखं समीकरण झालं आहे.

पृथ्वी थिएटरच्या नाटकवेड्या माहोलमध्ये मकरंद देशपांडे यांचं नाटक पाहायला सुमित व्यास, स्वानंद किरकिरे यांच्यासारखे मोठे सेलिब्रिटी शांतपणे प्रेक्षकांमध्ये बसलेले असतात. खूपदा असंही होतं, की मकरंद देशपांडे यांचं नाटक सुरू होण्याची आपण सर्व वाट बघत असतो.

आणि अचानक ‘नमस्कार’ असा जोरदार आवाज ऐकू येतो.

एक एक पायरी उतरत मकरंद देशपांडे प्रेक्षकांमधून एन्ट्री घेतात. आणि हळूहळू आपल्या सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे केंद्रित होतं. अशा आगळ्यावेगळ्या आणि काहीशा संमोहित करणाऱ्या वातावरणात नाटकाचा प्रयोग सुरू होतो.

मकरंद देशपांडे यांची मुलाखत बघा, किंवा त्यांचा कोणाशी सुरू असलेला संवाद ऐका. हा माणूस काहीसा वेगळाच भासतो.

जणू काही सतत त्याच्या डोक्यात नाटकाचे विचार असतात. आणि त्या दुनियेतले प्रत्येक क्षण मकरंद देशपांडे जगत असतात. हा माणूस नाटकात जितका रमतो, तितका सिनेमांमध्ये सुद्धा उल्लेखनीय काम करतो. म्हणुनच ‘स्वदेस’ सिनेमात त्यांनी शाहरुख सोबत साकारलेली भटक्या फकिराची छोटीशी भूमिका सुद्धा लक्षात राहते.

हिंदी सिनेमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख जपणारे मकरंद देशपांडे यांनी नाटकाच्या वेडापायी दोन मोठे सिनेमे सोडले होते.

त्याआधी मकरंद देशपांडे यांच्या सुरुवातीच्या आयुष्याकडे छोटीशी नजर. शाळेत असताना क्रिकेट खेळायची त्यांना प्रचंड आवड. अगदी धोनी सारखे मकरंद विकेटकिपर – फलंदाज होते.

एकदा आंतरशालेय स्पर्धेत मकरंदने इतकी जबरदस्त फिल्डींग केली की त्यावर्षी पहिल्यांदा एका फिल्डरला मॅच झाल्यानंतर पुरस्कार देण्यात आला.

ही मॅच झाल्यावर मकरंद पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळले.

काही दिवसांनी पेपरमध्ये मकरंदचा फोटो आला. त्याची मुंबई संघात निवड झाली होती. पण मकरंद लहानपणापासूनच काहीसा स्वच्छंदी आणि लहरी स्वभावाचा. मुंबई संघात निवड झाल्यावर एखाद्या मुलाला आनंद झाला असता. पण मकरंद यांनी विचार केला,

“क्रिकेट खेळायला गेलो तर कधी ना कधी रिटायर व्हावं लागणार. मला असं काहीतरी करायचं आहे की ज्यातून मी कधीच रिटायर होणार नाही.”

आणि त्याच क्षणी आयती चालून आलेली संधी मकरंदने सोडली.

हळूहळू अभिनयाचं वेड अंगात भिनत होतं. रंगभूमीकडे मकरंदचा ओढा जास्त होता.

तरीही नाटकं करता करता मकरंदने ‘सत्या’ मधला वकील मुळीक रंगवला. ही गोष्ट यानंतरची… आशुतोष गोवारीकर ‘लगान’ची तयारी करत होते. मकरंद देशपांडे यांनी सिनेमात काम करावं याची गोवारीकर यांना खूप इच्छा होती. मकरंदने सुद्धा सिनेमात काम करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पण… जेव्हा आशुतोष यांनी तारखा सांगितल्या तेव्हा मात्र मकरंद गडबडले. ‘लगान’साठी त्यांना ६ महिने शूटिंगसाठी द्यावे लागणार होते.

हे समजल्यावर मकरंद यांनी ‘लगान’मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.

गोवारीकर यांनी कारण विचारलं. तेव्हा मकरंद म्हणाले,

“यार आशू ! सहा महिने नाटकांपासून दूर राहावं लागणार. मला शक्य नाही.”

गोवारीकर यांना मकरंदचं नाटकवेड माहीत होतं. ते म्हणाले,

“हे बघ. मी तुझ्यासाठी हवंतर वेगळी रुम बनवतो. तिथे तू मनसोक्त तुझी नाटकं लिही. आणि मध्येमध्ये माझं शूटिंग कर.”

पण तरीही मकरंद यांच्या मनाची तयारी नव्हती. हे प्रकरण आमिर खान पर्यंत गेलं. आमिर आणि मकरंद चांगले मित्र. तसेच मकरंद पूर्वी क्रिकेट खेळला आहे, हे आमीरला ठाऊक होतं. त्यामुळे आमीरने सुद्धा मकरंदला समजवायचा प्रयत्न केला. परंतु तरीही मकरंदने आपली अडचण आमीरला सुद्धा सांगितली.

शेवटी सर्वांनी त्याच्या भावनेचा आदर केला आणि मकरंदने ‘लगान’ सोडला.

असंच काहीसं झालं, ‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस.’ च्या बाबतीत. आधी या सिनेमात शाहरुख खान असणार होता. आणि मकरंदला सर्किटची भूमिका ऑफर झाली. पुढे काही कारणास्तव शाहरुखने सिनेमा सोडला आणि संजू बाबाची निवड झाली. मकरंद आणि संजय दत्त यांची जोडी. सिनेमाच्या एका गाण्याचं सुद्धा शूटिंग करण्यात आलं. आणि एके दिवशी सर्व कलाकारांना तारखा देण्यात आल्या. ते पाहून मकरंद पुन्हा गोंधळात पडला. त्याला सिनेमासाठी जवळपास ६० दिवस द्यावे लागणार होते. पुन्हा ‘लगान’ सारखी मनस्थिती मकरंदची झाली. आणि मकरंदने मुन्नाभाई सुद्धा सोडला.

मग मकरंदच्या जागी अर्शद वारसीची सर्किट साठी निवड झाली.

नाटकाच्या प्रेमापोटी मकरंदने या दोन मोठ्या सिनेमांमध्ये काम करण्यास नकार दिला. पण याचं मकरंदला दुःख नाही.

उलट सर्किटच्या भूमिकेत अर्शद वारसीने उत्तम काम केलं आहे, असं ते मनापासून म्हणतात.

स्टेज, लाईट्स, विंगेतली लगबग, समोरून मिळणारी प्रेक्षकांची दाद या चौकटीत वावरताना मकरंद देशपांडे यांना आनंद मिळतो. आणि याच वातावरणात ते समाधानी आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.