एकदा तर क्रिकेट मॅचच्या तिकीटामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत खडाजंगी झाली होती…

गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदारांनी आखाडा मांडला होता. तालिका सभापतींचे माईक पिरगाळले गेले, शिवीगाळ झाली. तब्बल १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. रागारागात विधिमंडळाच्या बाहेर विरोधकांनी प्रति विधानसभा भरवली.

यंदाचं पावसाळी अधिवेशन आजवरचं सर्वात नाट्यमय अधिवेशन झालं होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण विधानसभेसाठी अशा घटना काही आजकालच्या नाहीत. यापूर्वी देखील असं बरच काय काय घडून गेलं. सांगता येण्यासारखं न सांगता येण्यासारखं देखील.

असाच एक किस्सा महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या वादाचा. तो हि क्रिकेट मॅचच्या तिकिटावरून झालेल्या वादाचा.

ऐकून धक्का बसला ना. विधानसभेत जास्तीत जास्त निवडणुकीच्या तिकिटावरून भांडणं झाली पाहिजेत, क्रिकेट तिकिटाचा सामना विधानसभेत रंगला असेल हे आपल्याला काय पटत नाही. पण खरंच असं घडलेलं.

घटना खूप जुनी नाही. फक्त दहा वर्षांपूर्वीची. योग पण तसाच होता. साल २०११, भारतात वर्ल्डकप मॅचेस सुरु होते. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर फायनल मॅच होणार होती. ती मॅच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यान होणार होती.

तस बघायला गेलं तर जगाच्या पाठीवरची निम्मी लोकसंख्या हा सामना बघण्यासाठी काहीही करायला तयार झाली होती. भारत आपल्या दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या एवढ्या जवळ आला होता, सचिन तेंडुलकरच्या हातात विश्वकप सोपवण्याची धोनीची सेने सज्ज झाली होती.

हे सगळं वानखेडे स्टेडियमवर घडणार होतं म्हणजे आपल्या विधिमंडळाच्या एक गल्ली पलीकडे. आता सगळ्या जनतेबरोबर आमदारांना सुद्धा मॅच बघावंसं वाटणे गैर नाही. 

इथून विषय सुरु झाला. आमदारांचा म्हणणं होतं आपण राज्याचे प्रतिनिधी आहोत मग आपल्याला फायनल मॅचची तिकिटं मिळालीच पाहिजेत. तेव्हा राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं. मॅचला काही दिवस बाकी होते. सर्वप्रथम तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी ही मागणी विधानसभेत मांडली. विधान परिषदेत तर सत्ताधारी पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे आमदार सुभाष चव्हाण यांनी ही मागणी लावून धरली होती. 

हा प्रश्न उठल्यावर तत्कालीन क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी हे उत्तर द्यायला उभे राहिले. त्यांनी सारवासारव केली कि,

 सदस्यांना तिकिटे मिळावीत अशी आमचीही इच्छा आहे. क्रिकेट बोर्डाकडे आम्ही तिकिटांची मागणी केली आहे .

क्रीडा मंत्र्यांनी तात्पुरती वेळ मारून नेली पण दुसऱ्या दिवशी मात्र सरकारला उत्तर देणे अवघड झाले.  कारण सरकारने या सामन्याची ५०० तिकिटे बीसीसीआयकडे मागितली होती. मात्र क्रिकेट बोर्डाने केवळ 250 तिकिटे दिली. आता तुटपुंजी तिकीटे सदस्यांना कशी वाटणार असा प्रश्न सरकारला पडला. मात्र सदस्यांनी मात्र तिकिटासाठी सभागृह डोक्यावर घेतलं. 

कधी नव्हे ते शिवसेना भाजप मनसे आणि काँग्रेस एकत्र झाले होते. एरव्ही सभागृहात दणाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज मात्र शांत झाला होता. यालाही एक कारण होतं. ते कारण म्हणजे शरद पवार.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते.  तिकिटासाठी हंमागा करणे म्हणजे थेट साहेबांच्या विरोधात हंगामा केल्यासारखे ठरू शकते हे शहाणपण डोक्यात असल्याने इतर आमदार तिकिटासाठी सभाग्रृह डोक्यावर घेत असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी डोके शांत ठेवले होते.

विधानसभेत क्रीडाविषयक चर्चा सुरू असताना काँग्रेसचे आमदार नीलेश पारवेकर यांनी आमदारांना तिकिटे मिळत नसल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,

‘‘वानखेडेची जागा सरकारची आहे. सरकारने क्रीडाविषयक उपक्रमांसाठी ती क्रिकेट क्लब दिलेली आहे. मात्र क्रीडाविषयक उपक्रमांप्रमाणेच व्यावसायिक उपक्रमांसाठीही या जागेचा वापर केला जातो. सरकार या जागेचे मालक असताना सरकारलाच तिकिटे कशी नाकारण्यात येतात ?”

पारवेकर यांच्या मागणीला शिवसेना, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार समर्थन दिले. सरकारची बाजू मांडताना क्रीडामंत्री वळवी यांनी ही जागा केवळ 50 वर्षासाठी लीजवर दिलेली असल्याचे सांगितले. या जागेचा उपयोग व्यावसायिक उपक्रमांसाठी केला जात असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र क्रिकेट बोर्डाकडून केवळ अडीचशेच तिकिटे मिळाल्याने सर्व सदस्यांना तिकिटे देण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली.

विधान परिषदेत तर क्रिकेटच्या तिकिटांवरून चक्क खंडाजंगी झाली. 

काँग्रेसचे आमदार सुभाष चव्हाण यांनी पुन्हा तिकिटांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की,

 तिकिटे मर्यादित आलेली असल्यामुळे ती केवळ मंत्र्यांना देण्यात येतील. टीव्हीवर मॅच पाहून आपण वानखेडेवर पाहात असल्याचे समाधान मानावे,

तेव्हा काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी विचारलं की मंत्र्यांना तिकिटे मिळत असतील आमदारांना का मिळू नयेत?

त्यावर जयंत पाटलांनी टोला मारला की,

मंत्री होण्यासाठी काही दिवस घालावावे लागतात, अनेक गोष्टी कराव्या लागतात. तेवढय़ा तुम्ही करा, मंत्री व्हा, मग तुम्हालाही तिकिट देऊ.

एकूण, सामना वानखेडेवर होणार असला तरी सभागृहात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध इतर सर्व असा सामना तिकिटांवरून रंगल्याचे चित्र दिसले. 

खरोखर मॅचला कोणाकोणाला जायला मिळालं हे मात्र शेवटी कळू शकलं नाही. भारताने मॅच जिंकली, धोनी ने वर्ल्डकप उचलला, सगळं शेवट गोड झाला हे नक्की. 

संदर्भ – http://rahibhide.blogspot.com

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.