फक्त मोदीच नाही तर या नेत्यांच्या नावानं देशभर क्रिकेटची स्टेडियम आहेत.

आज गुजरातमध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम अशी ओळख मिळवलेल्या मोटेरा अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियमचं उदघाटन करण्यात आलं. मात्र यानंतर एकच चर्चा चालू झाली ती म्हणजे यापूर्वी सरदार पटेल यांचं नाव असलेल्या स्टेडियमला मोदींच नाव देण्यावरून.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्घाटनावेळी मोदींच नाव का दिलं, याच कारण वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण देशात एखाद्या राज्यकर्त्याच्या नावानं स्टेडियम असणारे नरेंद्र मोदी हे पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी देखील देशात नेत्यांची नाव असलेली स्टेडियम उभी आहेत.

१. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैद्राबाद : 

२००३ मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या काळात या मैदानाला मंजुरी मिळून बांधकामाला सुरवात झाली. उप्पलमध्ये त्यासाठी सरकारकडून जागा उपलब्ध करून दिली. २००४ मध्ये जेव्हा स्टेडियम बांधून पूर्ण झालं तेव्हा नायडू यांनी याच नामकरण विसाखा क्रिकेट स्टेडियम केलं.

२००५ मध्ये इथं जेव्हा आंतरराष्ट्रीय सामन्यांची सुरुवात झाली तेव्हा आंध्रप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीमध्ये या स्टेडियमच नामांतर ‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हैद्राबाद’ असं केलं

२. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून :

नोव्हेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी या स्टेडियमचा पाया रचला. तब्ब्ल २३७ कोटी रुपये खर्चून पुढच्या ४ वर्षात मोठं स्टेडियम उभं राहील. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या उपस्थित उदघाटन सोहळा पार पडला.

या मैदानाला देखील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं आहे.

३. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, लखनऊ :

उत्तरप्रदेशमधील लखनऊ स्थित इकाना क्रिकेट स्टेडियम हे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावानं ओळखलं जात आहे. २०१७ साली पूर्ण झालेल्या या मैदानात २०१८ पासून आंतराष्ट्रीय सामन्यांना सुरूवात झाली आहे.

४. वाय. एस. आर. रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम:

२००३ मध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याच काळात या मैदानच बांधकाम सुरु झालं. बांधकाम सुरु असतानाच वैशिष्ट्य म्हणजे यावरच गवत कॅरेबियन देशांमधून मागवलं आहे. २००५ मध्ये जेव्हा इथं आंतराष्ट्रीय मॅचेस सुरु झाल्या तेव्हा महेंद्रसिंग धोनीने आपली वन-डे मधील पहिली सेंच्युरी इथचं मारली होती.

२००९ मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ या मैदानच नामांतर वाय. एस. आर. रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम असं केलं गेलं.

५. अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दिल्ली :

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला परिसरातील मैदान स्टेडियमला फिरोजशाह कोटला यांचं नाव देण्यात आलं होतं. १८८३ साली याची उभारणी झाली. हे मैदान भारतातील इडन गार्डन नंतर दुसरे सर्वात जुने मैदान म्हणून ओळखलं जात.

पुढे २०१९ मध्ये भारताचे माजी अर्थमंत्री आणि जेष्ठ भाजपचे नेते यांचं दिल्ली क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन या स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

६. वानखेडे स्टेडियम, मुंबई : 

महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष बॅ. शेषराव वानखेडे यांच्या भगीरथ प्रयत्नांतून १९७४ साली मुंबईत टुमदार स्टेडियम उभं राहिलं आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमला पर्याय म्हणून आणि मराठी माणसाच्या अपमानाचा बदला म्हणून बॅ. वानखेडेंनी हे स्टेडियम उभारलं. त्यावेळी ते मुंबई क्रिकेट संघाचे अध्यक्ष देखील होते.

त्यामुळे या स्टेडीयमला वानखेडे स्टेडियम असं नाव दिलेलं आहे.

हे पाच आणि आज नरेंद्र मोदी यांच नाव असलेलं मोटेरा स्टेडियम अशी ६ स्टेडियम राजकारण्यांच्या नावानं उभी आहेत. एका रिपोर्टनुसार देशात जवळपास २१ स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वापरली जात आहेत. त्यातील एकही स्टेडियम हे खेळाडूंच्या नावानं नाही.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. RUPESH GHORPADE says

    पण फक्त नरेंद्र मोदी हे एकटं राजकारणी व्यक्ती आहे ,ज्यानं आपल्या जिवंत पणीच एखाद्या वास्तूला स्वतःच नाव दिलं, बहुदा त्यांना आता याची जाणीव झालीय की आपल्या मृत्यूनंतर कदाचित कोणी आपलं नाव काढणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.