पार्थिव पटेलचं क्रिकेट करिअर, आपण लहानपणी बघायचो तशा स्वप्नांसारखं होतं…
अगदी शाळकरी पोरांचा असतो असा चेहरा, उंची पण दहावीतल्या पोरा एवढीच, चेहऱ्यावर निरागसता आणि कायम आपण इथं नवीनच आलोय असे भाव, विकेटकिपींगचे लहान ग्लोव्ह्स हे एवढं सगळं बघून वाटलेलं याला टीममध्ये घेतलंच कसं? त्यात टीव्हीवर रणजी ट्रॉफी स्पर्धेतलं रेकॉर्डही दाखवेनात, मग कळलं गडी रणजी क्रिकेट न खेळताच भारतीय संघात आलाय. त्या दिवशी पहिल्यांदा त्याचं नाव वाचलं आणि पुढं तो आवडता प्लेअर झाला तो कायमचाच.
पार्थिव पटेल हा माझा आवडता प्लेअर आहे, असं सांगणारे फार कमी भिडू तुम्हाला भेटतील. कारण बऱ्याचदा आपले आवडते खेळाडू ग्लॅमरस असतात, त्यांच्या नावामागं भले मोठे रेकॉर्ड्स असतात, त्यांची स्टाईल, त्यांचा ट्रेडमार्क शॉट अशा गोष्टी आपण फॉलो करत असतो. म्हणायला गेलं तर पार्थिव पटेल ग्लॅमरस नाही, त्याच्या नावावर लई रेकॉर्ड्स पण नाहीत, त्याचा एखादा शॉट किंवा हेअरस्टाईलही पॉप्युलर नाही… मग तरीही पार्थिव पटेल आवडता आहे कारण त्याचा प्रवास आणि त्याचं डेडिकेशन.
गल्लीत किंवा माळावर खेळताना हातात बॅट घेतली की, गावसकर, कपिल, तेंडुलकर व्हावं असं वाटायचं. आपली मजल फारफार तर शाळेकडून, क्लबकडून किंवा जिल्ह्याकडून खेळण्यापर्यंत गेली. आपला गल्ली क्रिकेटमधला खेळ बघून आपल्याला भारतीय संघात संधी मिळावी आणि आपण लहानवयातच रात्रीत सुपरस्टार व्हावं, हे तर आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे…
पार्थिव पटेलचं स्वप्न आपल्याला अचानक पूर्ण झालेलं दिसलं, पण त्यामागेही स्ट्रगल होता आणि १५ मिनिट आधी मिळालेला धक्काही…
पार्थिव अहमदाबादच्या धना सुथर्नी पोल या भागातला. या भागाला हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास आणि पार्थिवच्या बालपणातला वर्तमानही. एका मुलाखतीत तो सांगतो, ‘मी सात आठ वर्षांचा होतो तेव्हापासूनचा सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. आमच्या जुन्या घरावर गोळीबार व्हायचा, दगड, खिळे, पेट्रोल बॉम्ब यांचाही मारा व्हायचा.’ अशा परिस्थितीत पार्थिवनं क्रिकेटची वाट धरली. नवव्या वर्षी त्याला क्रिकेटची गोडी लागली, १२ व्या वर्षी तो शाळेकडून खेळू लागला आणि मग स्टेट ज्युनिअर टीम, त्यानंतर भारताचा अंडर-१९ वर्ल्डकप आणि मग भारतीय संघ… असा अगदी स्वप्नवत प्रवास त्यानं केला. नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याची कामगिरी इतकी भारी होती, की त्याला स्कॉलरशिप देऊन ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं होतं.
भारतीय मॅनेजमेंट तेव्हा विकेटकिपर्स ट्राय करुन बघत होतं, अजय रात्रा, नयन मोंगिया, विजय दहिया अशा लांबत जाणाऱ्या लिस्टमध्ये पार्थिव पटेलचंही नाव दाखल झालं. २००२ मध्ये भारताची टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर होती, अजय रात्रा टीमचा विकेटकिपर होता. त्याला ऐन वेळेस दुखापत झाली आणि पार्थिवला १५ मिनिटं आधी ‘तू खेळतोय’ असं सांगण्यात आलं. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इंग्लंडचा कॅप्टन नासीर हुसेनला पार्थिवचं वय फक्त १२ वर्ष वाटलं होतं. त्या टेस्टमध्ये फलंदाज पार्थिव पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला, पण दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र त्यानं ६० बॉल्स खेळत १९ रन्स केले आणि मॅच ड्रॉ करण्यात महत्त्वाचा रोल बजावला.
तिथून पुढं काही महिने पार्थिव टेस्ट आणि वनडे संघात भारताचा रेग्युलर किपर झाला. त्याच्या बॅटिंगमध्ये अगदीच जादू नसली, तरी टीमचा डोलारा सांभाळण्याची शक्ती नक्कीच होती. आता कुठं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दमदार पावलं पडत होती आणि तेवढ्यात पार्थिवचा फॉर्म गंडला आणि त्याच वेळेस संघात एंट्री झाली महेंद्रसिंह धोनीची. फर्स्ट चॉईस विकेटकिपर असणारा पार्थिव आता सेकंड चॉईस किपर बनला, आता संघात निवड व्हायची ती एकतर धोनीला दुखापत झालेली असताना किंवा फक्त फलंदाज म्हणून.
इथे सुरू होते स्टोरीमधली स्टोरी…
झालं असं की धोनी बॅटिंग, किपींग आणि कॅप्टन्सी या सगळ्याच गोष्टीत वस्ताद निघाला. साहजिकच पार्थिवची संघात परत जागा तयार होणं अवघड होतं, पण गडी डोमेस्टीक क्रिकेट खेळत राहिला. बरेच जण रेसमध्ये मागं पडल्यावर, रेसच सोडून देतात. पण पार्थिवनं तसं केलं नाही. त्याला स्वतःवर खात्री होती.
२००४ नंतर पार्थिव टेस्ट खेळला नव्हता, पण २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यानं कमबॅक केलं. त्यानंतर पार्थिव पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसला ते थेट आठ वर्षांनी २०१६ मध्ये. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध तो खेळला आणि साऊथ आफ्रिका दौऱ्यातही त्याची वर्णी लागली. साहा पहिल्या टेस्टमध्ये फेल गेल्यानंतर पार्थिवला संधी मिळाली मात्र त्यालाही अपयश आलं. २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीही पार्थिव संघात होता, मात्र त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. जे कसोटीच्या बाबतीत झालं, तेच वनडेच्या बाबतीतही.
कधी संधीची वाट पाहावी लागायची, तर कधी संधी मिळाल्यावर परफॉर्मन्स व्हायचा नाही. पण तरी भावानं मेहनत करणं तेवढं सोडलं नाही. दुसऱ्या बाजूला आयपीएल सुरू होती, तिथं पार्थिवच्या किटबॅगनं सहा ड्रेसिंग रुम्सचा प्रवास केला. त्याची टीम आणि बॅटिंग पार्टनर्स बदलत राहिले, पण भावाचा स्पार्क चमकायचा आणि हा गडी अजून कसं काय एवढं बाप खेळतोय असा प्रश्न लोकांना पडायचा.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, वयाच्या अठराव्या वर्षी त्यानं स्टीव्ह वॉला स्लेज केलं (त्याच्या शिव्याही खाल्ल्या हा वेगळा विषय), वयाच्या चौत्तीसाव्या वर्षापर्यंत तो क्रिकेट खेळत राहिला पण त्याची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय असेल, तर त्यानं गुजरातच्या टीमचं बदललेलं रुप.
मुंबई, कर्नाटक, तमिळनाडू, विदर्भ, दिल्ली या टीम्सचा भारताच्या डोमेस्टिक टीममध्ये बोलबाला असताना त्यानं गुजरातच्या टीमला वजन प्राप्त करुन दिलं. २०१५-१६ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याच्याकडे गुजरातचं नेतृत्व सोपवण्यात आलं. त्यावर्षी गुजरात फायनल पर्यंत पोहोचलं आणि फायनलमध्ये कॅप्टन पार्थिव पटेलनं कडकडीत सेंच्युरी मारली, जिच्या जोरावर गुजरात पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकलं.
आता पार्थिव पटेल मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत काम करतो, त्यानं खेळणं सोडलं असलं, तरी क्रिकेटशी संबंध सुटलेला नाही.
आपल्यालाही वाटत असतं की लहान वयात मोठं यश मिळवावं, ज्यांना हिरो म्हणून फक्त टीव्हीवर बघत आलोय त्यांच्यासोबत खेळावं, जी गोष्ट मनापासून आवडते ती टीकेचा, यशाचा विचार न करता आयुष्यभर करावी आणि जिथं वाढलो त्या जागेचं नाव मोठं करावं… पार्थिव पटेलनं हेच केलं आणि म्हणूनच तो आवडता क्रिकेटर ठरतो… सिग्नेचर शॉट आणि स्टाईल नसली तरी…
हे ही वाच भिडू:
- वर्ल्डकपमध्ये एकही मॅच न खेळता पार्थिव पटेलला लाखो रुपये मिळाले होते….
- स्लेजिंग करणाऱ्या पार्थिव पटेलची स्टीव्ह वॉने पार इज्जत काढली होती..
- “मौका सभी को मिलता है” हे दाखवलं सत्त्या पिक्चरनं पण शिकवलं ४१ वर्षांच्या प्रवीण तांबेनं…