IAS अधिकाऱ्याच्या मुलाला बाहुबली खासदाराच्या मुलानं जिवंत जाळलं कारण…

नितीश कटारा वय वर्ष २५. वडील IAS अधिकारी. कुटूंबातले अनेकजण UPSC तू अधिकारी पदावर गेलेले. कौटुंबिक पार्श्वभूमीचं अधिकाऱ्यांची. त्यामुळे घरात पहिल्यापासूनच शिस्तीचं वातावरण. नितीश कटाराची आई देखील नोकरी करायची. वेळात वेळ काढून मुलाचा अभ्यास घ्यायची. 

पण नितीश कटाराचा इंटरेस्ट UPSC मध्ये नव्हता. त्याला नव्याने येणारं खाजगी सेक्टर खुणावत होतं. MBA करायच्या तो विचारात होता. ठरल्याप्रमाणे चांगले मार्क मिळवून नितीशने गाजियाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये MBA ला ॲडमिशन मिळवलं.. 

MBA च्या वर्गात त्याची मैत्री झाली ती भारती यादव सोबत.

भारती बड्या घरची पोरगी होती. भारतीचे वडिल धरमपाल यादव अर्थात डिपी यादव प्रस्थापित व्यक्ती होते. अगदी सैराटच्या कुणाच्या बुडाखाली किती अंधाराय वाल्या आर्चीच्या वडलांसारख्या १०० माणसांना खिश्यात घेवून फिरण्यासारखे. डिपी यादवांची एकुलती एक पोरगी म्हणजे भारती यादव. 

MBA च्या कॉलेजमध्ये भारती आणि नितीशची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. भारतीच्या घरचं वातावरणं जुन्या पद्धतीचं होतं. याउलट नितीशच्या घरचं वातावरण बरच पुढारलेलं होतं. 

नितीशने आपली आई निलमला भारतीबद्दल सांगितलं.

सुरवातीला नितीशच्या आईला या गोष्टीत विशेष काही वाटलं नाही. तिला भारतीचे वडील किती मोठ्ठे आहेत याची पण कल्पना नव्हती. हळुहळु नितीशच्या घरी गिफ्ट येवू लागले. भारती महागातले गिफ्ट नितीशला पाठवायची. ते गिफ्ट पाहून नितीशच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली.. 

Screenshot 2022 03 30 at 7.21.51 PM

नितीशचा महिन्याचा पगार आहे त्याहून अधिक किमतीचे गिफ्ट भारती एका वेळी पाठवायची. महिन्यातून असे पाच-दहा गिफ्ट घरात यायचे. नितीशच्या आईने नितीशला न राहवून विचारलच, 

ही मुलगी खूप मोठ्या घरातली आहे, इतकी महागडी गिफ्ट ती पाठवते. तू तिला खरच संभाळू शकतोस का? 

यावर नितीशचं उत्तर होतं, 

भारती आजवर तिच्या घरातल्यांसोबत कधी एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा गेलेली नाही. तिला पैशापेक्षा एक कुटूंब हवय. तिला फक्त मी नकोय तर आई वडिल म्हणून तुम्ही देखील हवाय. 

आईने लग्नाला विषय काढताच नितीश म्हणाला, भारतीचा भाऊ परदेशात शिकायला जाणार आहे. तो गेला की भारती घरात विषय काढेल मग लग्न ठरेल..  

१६ फेब्रुवारी २००२ 

या दिवशी डिपी यादवांच्या नातेवाईकांचं लग्न होतं. अगदी घरचं लग्न म्हणून डिपी यादवांच संपूर्ण कुटूंब या लग्नात आलेल. दूसरीकडे नितीश कटारा यांच्या कुटूंबाला देखील आमंत्रण होतं. त्यांचेही जवळचे नातलग होते. दोन्ही बाजूचे कुटूंब या लग्नात सहभागी झालेले. 

या लग्नात डीपी यादव यांच्यासोबतच त्यांचा मुलगा विकास, पुतण्या विशाल आणि भारती देखील आले होते. भारतीच्या आणि नितीशच्या प्रकरणाचा अंदाज डिपी यादव आणि त्यांच्या मुलाला आलेलाच होता. 

Screenshot 2022 03 30 at 7.21.45 PM

पण सगळं कस चांगल चांगल चालू होतं. नितीश आणि डीपी यादवांचा मुलगा आणि भारतीचा भाऊ विकास यांची ओळख झाली. विशाल, विकास आणि नितीश एकत्रच लग्नात थांबले. 

तिथून दारू प्यायला जाण्याचा प्लॅन ठरला. तिघांनी भरपूर दारू पिली. दारू पिवून झाल्यानंतर  विकासने नितीशला आपल्या टाटा सफारीत बसवलं. नितीश गाडीत बसताच विकास आणि विशालने त्याच्यावर हल्ला केला.

गाडी गाजियाबादपासून ८० किलोमीटर दूर असणाऱ्या बुलंदशहर जवळच्या खुर्जा गावात नेण्यात आली. तिथे नितीशला गाडीतून बाहेर काढण्यात आलं. गाडीतील स्टेपनीने त्याला मारण्यात आलं व जिवंत असतानाच त्याच्यावर पेट्रोल टाकून दोघांनी मिळून त्याला जाळलं… 

इकडे नितीशची आई नितीशची वाट पहात होती. वेळ झाला तरी नितीश घरी न आल्याने तिने भारतीला फोन केला. नितीश अजून घरी पोहचला नाही हे कळताच भारतीला आपल्या वडिलांवर आणि भावावर शंका आली. भारतीने नितीशच्या आईला लगेच जावून पोलीस केस करायला सांगितलं.. 

१७ फेब्रुवारी २००२ 

सकाळी नितीशचं गायब होणं व त्यामागे डिपी यादव व त्याच्या मुलावर संशय असल्याची केस गाझियाबाद पोलीस स्टेशनमध्ये नितीशच्या आईने दिली. डिपी यादवांवर केस झाल्याने साहजिक बातम्या सुरू झाल्या. नितीशच्या शोधासाठी पोलींसांनी मोहिम राबवली.. 

तीन दिवसानंतर खुर्जा गावात एक अर्धवट जळालेली बॉडी सापडली. आईने हे प्रेत नितीशचं असल्याचं सांगितलं. पण ओळख पटवण्यासारखी ती बॉडी नसल्याने DNA चाचणी घेण्यात आली व ते प्रेत नितीशचंच असल्याचं स्पष्ट झालं.  

ज्या दिवशी प्रेत सापडलं त्याचं दिवशी भारती यादवला घरातल्यांनी लंडनला पाठवलं.. 

विशाल आणि विकास यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. ते दोघे घटनेच्या दिवसापासून फरारी होते. २३ फेब्रुवारीला मध्यप्रदेशातून या दोघांना अटक करण्यात आलं. पोलीस रिमांडमध्ये दोघांनी मिळून नितीशची हत्या केल्याची कबुली दिली मात्र कोर्टापुढे गेल्यानंतर त्यांनी पटली मारली.. 

आत्ता सुरू झाल्या त्या कोर्टाच्या वाऱ्या 

केस सुरू झाली ती गाजियाबाद कोर्टात. इथे होल्ड डिपी यादवचा होता. पोलीसांच्या चार्जशीटमध्ये चुका होत्या. छोट्या छोट्या कारणांवरून विकास आणि विशालला जामिन मंजूर होत होता. पहिल्या दोन वर्षातच कोर्टाने एकूण ६६ वेळा विकास आणि विशालला जामिन मंजूर केला.. 

Screenshot 2022 03 30 at 7.23.01 PM

पण नितीशची आई हारणाऱ्यातली नव्हती. नितीशच्या आईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही केस युपीच्या बाहेर चालवण्याची विनंती केली. त्यांच म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आणि ही केसं दिल्लीच्या पटियाला कोर्टाकडे ट्रान्सफर केली.. 

डीपी यादवांनी भारती यादवला लंडनला पाठवलेलं.. 

भारती यादवची साक्ष महत्वाची होती. पण भारती लंडनला रहात होती. अखेर कोर्टानेच भारती हजर झाली नाही तर तिचा पासपोर्ट जप्त करुन लंडनमध्ये अटक करून तिला हजर करण्याचे आदेश पोलीसांना देण्यात येतील अस सांगितलं. तेव्हा भारती कोर्टात हजर झाली. तिची साक्ष नोंदवण्यात आली. 

३० मे २००८ 

सहा वर्षानंतर केसचा निकाल लागला. विकास आणि विशाल यांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याविरोधात डिपी यादव दिल्ली हायकोर्टात गेले. २०१४ साली दिल्लीच्या हायकोर्टाने खालच्या कोर्टातला निकाल कायम ठेवला. 

पण निलम कटारांच्या मते या दोघांना फासीची शिक्षा व्हायला हवी होती. त्यासाठी त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या तिथे या दोघांच्या शिक्षेत वाढ झाली. २५ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना दिली. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.