अफगाणिस्तानचा हा शेवटचा इंटरनॅशनल सामना ठरू शकतोय भिडू

कधी आयुष्यात दुसऱ्या कुठल्या टीमला केला नसेल, इतका सपोर्ट भारतीय चाहते सध्या अफगाणिस्तानच्या टीमला करतायत. या मागचं कारणही तसंच आहे. भारताची टीम सेमीफायनलला जाणार की नाही? याच्या नाड्या सध्या अफगाणिस्तानच्या हातात आहेत. त्यांनी जर न्यूझीलंडला हरवलं, तर भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळायची शक्यता निर्माण होणाराय.

अफगाणिस्तानच्या टीमचा विषय गंभीर असण्याचं कारण म्हणजे, न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा त्यांचा शेवटचा इंटरनॅशनल सामना ठरू शकतोय.

अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानची राजवट आहे. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान’ असं केलं. सोबतच देशाचा झेंडाही बदलला. त्यामुळं, टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या आधी अफगाणिस्तानच्या समावेशावर मळभ जमा झालं होतं. जर त्यांचं नाव आणि झेंडा बदलला तर आयसीसी त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नाकारेल अशी शक्यता होती. मात्र तालिबानकडून संघावर तशी सक्ती केली गेली नाही.

आता देशाचं नाव बदलल्यावरही टीम ‘अफगाणिस्तान’ या नावानंच कशी काय खेळली?

देशाचं नाव बदललं असलं, तरी अफगाणिस्तानमधलं क्रिकेट सांभाळणाऱ्या बोर्डाचं नाव अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड असंच कायम आहे. बोर्डाचं नाव बदलण्याबद्दल आयसीसीकडे कोणताही प्रस्ताव गेलेला नाही. त्यामुळं अफगाणिस्तानची टीम यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळली.

क्रिकेट बोर्डांविषयी आयसीसीचा नियम काय सांगतो?

जगभरातल्या क्रिकेटचा समन्वय साधणारं इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसी, विविध देशांच्या क्रिकेट बोर्डांना सदस्यत्वाचा दर्जा देते. फुल मेंबर असा दर्जा मिळालेल्या टीम टेस्ट क्रिकेट खेळताना दिसतात. इतर टीम्ससाठी आयसीसी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतं, ज्याद्वारे त्यांना वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धांच्या पात्रता फेरीत खेळता येतं.

आयसीसीच्या सदस्यत्वासाठी अर्ज करताना, ‘बोर्डाकडे योग्य रचना, मान्यता आणि जबाबदार प्राथमिक प्रशासकीय संस्था असणं आवश्यक आहे. देशात पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटचं प्रशासन, व्यवस्थापन आणि विकासासाठी ही संस्था कटिबद्ध असायला हवी. महिला क्रिकेटला पुरेसं पाठबळ द्यायला हवं सोबतच. राष्ट्रीय स्तरावर खेळायला तयार होतील अशा वरिष्ठ पुरुष, अंडर-१९ आणि महिला खेळाडूंना तयार करण्यासाठी योग्य ती रचनाही असायला हवी. नियमांचं उल्लंघन होत असेल, तर सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकारही आयसीसीकडे आहे.’

थोडक्यात सांगायचं झालं, तर क्रिकेट खेळणाऱ्या वेगवेगळ्या टीम्स या त्यांच्या बोर्डांच्या असतात. मात्र हे बोर्ड देशाचं प्रतिनिधित्व करतात. सोबतच खेळाडूही देशाच्या झेंड्याखालीच खेळतात. देशातली अस्थिरता किंवा टोकाला गेलेला वर्णद्वेष यावरूनही आयसीसी एखाद्या देशाचं सदस्यत्व रद्द करू शकते. त्यामुळंच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय भारतातलं क्रिकेट मॅनेज करत असली, तरी आंतरराष्ट्रीय टीमला ‘टीम इंडिया’ म्हणूनच ओळखलं जातं.

आता पुन्हा अफगाणिस्तानच्या प्रश्नाकडे येऊ-

तालिबान सत्तेत आल्यावर त्यांनी क्रिकेटच्या चाव्याही आपल्या हातात घेतल्या. तालिबानचा क्रिकेटला पाठिंबा आहे, याचं  कारण म्हणजे क्रिकेट खेळाडू गुडघे झाकणारे कपडे घालतात, सोबतच क्रिकेटमध्ये कमीत कमी शारीरिक स्पर्श होतो. तालिबाननं पुरुषांच्या खेळावर बंदी घातलेली नाही.

मात्र अफगाणी टीमचा नियोजित पाकिस्तान आणि श्रीलंका दौरा रद्द झाला, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी टेस्ट मॅचही पुढे ढकलण्यात आली आहे. तालिबानचं नाव संघावर लादलं गेलं, तर अनेक देश त्यांच्याशी क्रिकेट खेळण्यास राजी होणार नाहीत असं चित्र आहे.

सोबतच तालिबाननं महिलांच्या क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार महिला क्रिकेट सुरू नसेल, तर आयसीसी सदस्यत्वाचा दर्जा रद्द होऊ शकतो. अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेट सुरू होईल अशी धूसर शक्यताही नाही.

त्यामुळं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा दर्जा असाही धोक्यात आहेच. आयसीसीनं आपल्या नियमांना फाटा देत, विशेष परवानगी दिली तर अफगाणिस्तानची गाडी पुढं सरकू शकते. तसं झालं नाही, तर वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध होणारा सामना अफगाणिस्तानच अखेरचा इंटरनॅशनल सामना ठरू शकतो.   

राशिद खान, मोहम्मद नबी, असगर अफगाण, मुजीब उर रेहमान असे अनेक खेळाडू जगभर लोकप्रिय आहेत. त्यांच्या खेळानं वेळोवेळी जगाला आनंद दिलाय. रेफ्युजी कॅम्पपासून सुरुवात करत त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत झेप घेतली आहे.

त्यामुळं ही टीम पुन्हा एकदा मैदानात दिसावी असंच प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वाटत असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.