मौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना दिली आहेत

२००७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करतांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटलं होतं. सोनिया गांधी यांच्या या टीकेनंतर भाजपने काँग्रेसच्या विरोधात रणकंदन माजवलं होतं. यामुळेच गुजरात तत्कालीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता.  

त्याचप्रमाणे आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना केली आहे. 

ते म्हणाले की,

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांना त्यांचं काम करायचं आहे, पण मोदी ते काम सोडून निवडणुकीत प्रचार करत असतात. नगरपालिकेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या प्रचारात नरेंद्र मोदींचाच चेहरा समोर असतो, त्यांना काय रावणासारखे १०० तोंड आहेत का? मला काहीच कळत नाही.”   

मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर पलटवार सुरु केला आहे. त्यांनी पंतप्रधानांवर इतक्या खालच्या पातळीवरची टीका योग्य नाही म्हणण्यापासून, २००७ च्या निवडणुकीतील सोनिया गांधी यांच्या ‘मौत का सौदागर’ या टीकेची सुद्धा आठवण करून दिलीय.

परंतु काँग्रेस नेत्यांनी नरेंद्र मोदींना दिलेली नावं इतक्यापुरतीच मर्यादित नाहीत, त्या नावांची लिस्ट बरीच मोठी आहे.

१) रावण 

हे नाव आज मल्लिकार्जुन खरगे यांच्यामुळे चर्चेत असलं तरी मोदींना रावण म्हणणारे ते पहिले नेते नाहीत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे नरेंद्र मोदींना रावण म्हणाले होते. गुजरातमधील भाजप नेते संजय जोशी यांच्या सीडी प्रकरणानंतर त्यांनी भाजप सोडली होती. तेव्हा दिग्विजय सिंह यांनी मोदींवर टीका केली होती.

ते म्हणाले की,

“रावणाला पाहिलं तर त्याचा विकासाचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड होता. त्याने सोन्याची लंका बनवली होती, परंतु शेवटी अहंकार आणि गर्वामुळे त्याचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे.”

असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी मोदींना अहंकार आणि गर्व सोडून देण्याचा सल्ला दिला होता. या टिकेपासून सुरुवात करणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी आजपर्यंत अनेकदा मोदींवर टीका केलीय. मोदींसाठी वापरण्यात येणार फेकू हा शब्द सुद्धा सगळ्यात प्रथम दिग्विजय सिंग यांनीच वापरला असल्याचे सांगितलं जातं. २०१२ मध्ये गुजरात निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मोदींना फेंकू म्हटलं होतं. 

२) भस्मासुर

महादेवाच्या वरदानामुळे भस्मासुर ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा तो जागीच भस्म व्हायचा. २०१३ मध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींची तुलना भस्मासुराशी केली होती.

ते म्हणाले होते की,

 “मोदी भस्मासुर आहेत, ते लोकांना भस्म करतील. ज्यांनी मोदींना बनवलं त्या लालकृष्ण अडवाणी यांना मोदींनी भस्म केलं. २००२ च्या दंगलीचं नियोजन करण्यात ज्या तोगडियांनी मोदींची मदत केली, त्यांना सुद्धा मोदींनी भस्म केलं. मोदी बाकी काही नाही तर भस्मासुर आहेत.”

३) दुर्योधन, कायर 

रावण आणि भस्मासुरानंतर मोदींची तुलना झालेलं आणखी एक पौराणिक पात्र म्हणजे दुर्योधन. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली होती.

त्या म्हणाल्या होत्याकी,

“देशातील मुद्दे भटकवले जात आहेत, परंतु देशाने अहंकाराला कधीच माफ केलं नाही. महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्ण दुर्योधनाला समजवायला गेले होते मात्र त्याने कृष्णालाच बंदी बनवण्याचे प्रयत्न केले होते.”

प्रियांका गांधींनी या विधानानंतर राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मीरथी’ कवितेच्या काही ओळी वाचून दाखवल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये प्रचार करतांना त्यांनी नरेंद्र मोदींना कायर सुद्धा म्हटलं होतं.

“इनसे बडा कायर और कमजोर प्रधानमंत्री मैने अपने जीवन में नहीं देखा.”

प्रियंका गांधी यांच्या या विधानानंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात आले होते.

४) गंगू तेली

मोदींसाठी गंगू तेली हे बरंच चर्चेत राहिलं आहे. सगळ्यात आधी गुलाम नबी आझाद यांनी २०१३ मध्ये मोदींना गंगू तेली म्हटलं होतं, तर २०१९ च्या निवडणुकीत अशोक गहलोत यांनी नेहरू आणि मोदींची तुलना राजा भोज आणि गंगू तेली यांच्याबरोबर केली होती.

तेव्हा मोदींना गंगू तेली म्हणणे हे जातीवाचक आहे, असा आक्षेप भाजपने घेतला होता.

५) नपुंसक, कुए का मेंढक 

काँग्रेस नेते आणि तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका केली होती.  गुजरातमधील २००२ च्या दंग्यांचा उल्लेख करून जो लोकांना मारण्यापासून वाचवू शकला नाही तो नपुंसक असं म्हणत खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली होती.

तर मोदी हे विहिरीतील बेडूक आहे, काँग्रेस त्यांना गंभीरतेने घेत नाही असं सुद्धा खुर्शीद यांनी म्हटलंय. त्यांच्या नपुंसक या टीकेमुळे राहुल गांधी यांनी सुद्धा खुर्शीद यांच्यावर नाराज झाले होते.

६) मौत का सौदागर ते जहर बोने वाला 

२००७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी २००२ च्या गुजरातच्या दंगलींचा उल्लेख करत मोदींना मौत का सौदागर म्हटलं होतं. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसला गुजरातमध्ये बराच मोठा फटका बसला होता. 

त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या गुलबर्गा येथे प्रचार करतांना सोनिया गांधींनी मोदींना जाहीर बोने वाला म्हटलं होतं. 

“मुझे पुरा भरोसा है की, आप लोग ऐसे लोगो को मंजूर नहीं करेंगे जो जहर बोते हैं.”  

७) गंदा आदमी, नीच आदमी ते साप, विंचू  

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींवर टीका करतांना सगळ्यात जास्त शब्द वापरले असाच म्हणावं लागेल. कारण त्यांनी २०१२ च्या गुजरात निवडणुकीपासून नरेंद्र मोदींवर एकापेक्षा एक वाईट शब्द वापरून टीका केली होती. त्यांनी २०१२ च्या निवडणुकीत मोदींना ‘लहू पुरुष’, ‘पानी पुरुष’, ‘असत्य का सौदागर’ म्हटलं होतं. तर २०१३ मध्ये मोदींची तुलना साप, विंचवासोबत केली होती. 

मोदींसाठी ‘गंदा आदमी’ आणि ‘नीच आदमी’ हे शब्द सुद्धा अय्यर यांनीच वापरले होते.

२०१७ मध्ये मणिशंकर अय्यर म्हणाले होते की,

 “मला वाटतं की हा व्यक्ती अतिशयच नीच पातळीचा माणूस आहे, याच्यात कोणतेच संस्कार नाहीत.”

मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या शब्दांवर भाजपकडून अनेकदा आक्षेप घेण्यात आले होते.

८) पागल कुत्ता

काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी २०१३ उत्तर प्रदेशमधील एका प्रचारात मोदी यांना पागल कुत्ता म्हटलं होतं. वर्मा यांनी म्हटलं होतं की,

“मोदी हा पिसाळलेला कुत्रा आहे, त्याच्यामुळे हिंदू-मुसलमान भारत मातेला कलंकित होऊ देणार नाहीत. मोदी हे संकुचित मानसिकतेचे आहेत, ते मतांचे सौदागर आहेत.”

९) गंदी नाली का किडा

मोदींवर आजवर विरोधकांनी केलेल्या टीकांमध्ये ‘गंदी नाली का किडा’ ही टीका सगळ्यात जास्त हिणकस मानली जाते. काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनी २००९ मध्ये मोदींवर टीका करतांना या वाक्याचा वापर केला होता. त्यांच्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेकदा या वाक्याचा वापर करून मोदींवर टीका केली होती.

१०) व्हायरस 

मल्लिकार्जुन खरगे यांच्या रावणाच्या विधानावरून टीका होत असतांना काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी या खरगेंची पाठराखण करण्यासाठी समोर आल्या आहेत. रेणुका चौधरी यांनी संसदेतील एक किस्सा समोर आणला आहे, ज्यात नरेंद्र मोदींनी त्यांची तुलना शुर्पनखेबरोबर केली होती.

परंतु रेणुका चौधरी यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यांनी २०१३ मध्ये मोदींवर टीका करतांना त्यांना व्हायरस म्हटलं होतं. 

” मोदी हे न्यूमोनियाच्या व्हायरस सारखे आहेत, ज्याचं नाव आहे नमोनिटीस.” 

काँग्रेस नेत्यांनी या शब्दांबरोबरच नरेंद्र मोदींसाठी आणखी अनेक शब्द वापरले आहेत. यात फेंकू, निकम्मा, नशेडी, हिटरल, मुसोलिनी, तानशाह, चौकीदार, जावानो के खून का सौदागर, कातिल, अनपढ, गवार, नमक हराम, नालायक बेटा, नाकारा बेटा, नटवर लाल, तुघलक, चुहा असे अनेक शब्द वापरून काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका केलीय.

या सर्व टीकांचा उल्लेख करून अनेकदा मोदींनी काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली आहे, तर अनेक ठिकाणी ते या शब्दांचा उल्लेख करून भावनिक सुद्धा झाले आहेत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.