बोलभिडू स्पेशल : महाराष्ट्रातील पहिल्या व एकमेव पुस्तकांच्या गावाची रद्दी होऊ लागलेय..

इंग्लंडमधील ‘‘हे ऑन वाय’ या बुक व्हिलेजच्या धरतीवर आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतुन ‘भिलार’ येथे ‘पुस्तकाचं गाव’ या प्रकल्पाचा जन्म झाला.

देशातील पहिलं पुस्तकांचं गावं म्हणून ओळख मिळवलेलं हे गावं सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आणि महाबळेश्वरच्या थंड हवेच्या गारवाऱ्यात वसलेलं आहे.

पाचगणीवरुन महाबळेश्वरला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरुन भोसे गावापासून डाव्या बाजूने पाच किलोमिटर आत गेलं की ‘भिलार’ तुमचं स्वागतं करतं.गावची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार. साधारण साडेपाचशे उंबऱ्यांचं हे गाव.

मे २०१७ मध्ये राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ‘भिलार’ नव्यानं उदयास आलं.

कल्पना तशी साधी, पण अनोखी. इथं या, पुस्तकं हाताळा, चाळा, वाचा…. ते ही अगधी मोफत.

कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, लोकसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारातील थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४५ हजार पुस्तके.

गावातील ३५ ठिकाणं ही सर्व पुस्तकं ठेवण्यासाठी निवडण्यात आली. या प्रकल्पामध्ये तेवीस घरं, सहा लॉज, तीन मंदिरं, दोन शाळा अन् एक खासगी कार्यालय असे सामील झाले आहेत. जिथं आपण घराचा एक कोपरा कोणासाठी देत नाही तिथं भिलारवासियांनी एक अखंड मजला, एक पुर्ण रुम या प्रकल्पासाठी दान केली.

ज्या वास्तुमध्ये ज्या प्रकारची पुस्तकं तिथं बाहेर त्या प्रकारच्या कॅलिओग्राफीनं सुशोभिकरण करण्यात आलं आहे. असं सोप आणि सुटसुटीत गणित.

तत्कालिन मंत्री विनोद तावडे यांनी या प्रकल्पाला भरभरुन प्रेम दिल्याचं गावाच्या सरपंच वंदना प्रविण भिलारे सांगतात.

भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांनी ‘बोल भिडू’सोबत बोलताना सांगितलं की,

तसेच या प्रकल्पामुळं गावच्या विकासाला ही हातभार लागला. पुर्वीपेक्षा गाव आता बदलतं आहे. डांबरी असलेले रस्ते आता सिमेंटचे झाले. शौचालयापासूनच्या बेसिक सगळ्या सोयीसुविधा दिल्या. स्वच्छतेच्या बाबतीत जाणीवपुर्वक काळजी घेतली जाते. घरांवर विविध रंगांची सजावट, विविध लेखकांची चित्र काढून गावाचं सुशोभिकरण झालं, तीन कम्युनिटी हॉल बांधून दिले.

प्रकल्प चालू झाल्यापासून ते कोरोनाच्या आधी म्हणजे २३ मार्च २०२० पर्यंत तीन वर्षामध्ये जवळपास ४ लाख पर्यटकांनी आमच्या या प्रकल्पाला भेट दिली. यामध्ये सेलिब्रेटींपासून ते राजकारण्यांपर्यंत तसेच शाळा, कॉलेजच्या सहलींपासून ते वाचन प्रेमी लोक, वाचन कट्ट्यावरचे सदस्यांपर्यंत अनेकांचा समावेश होता. वर्षाला सरासरी १ लाख ३० हजार ते दिड लाखांपर्यंत ही पर्यटकांची संख्या असते.

गावातील नागरिक शशिकांत भिलारे गावला झालेल्या फायद्यांबद्दल सांगताना म्हणाले,

पर्यटकांच्या वाढीसोबतचं गावाल आणखी एक फायदा झाला तो म्हणजे गावातील तरुणांना गावातच रोजगार निर्मीतीच्या संधी मिळाल्या. त्यामुळे पुर्वीच्या रोजगारापेक्षा ३० टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी जेवणाच्या उद्देशाने हॉटेलची आणि राहण्याच्या उद्देशाने रुम्स भाड्याने देणं अशा व्यवसायांचा समावेश आहे. सोबतचं स्ट्रॉबेरी उत्पादकांना विक्रीसाठी त्यांच्या गावातच बाजारपेठ मिळाली.

तर वंदना भिलारे म्हणतात, 

लॉकडाऊनपासून या महत्वकांक्षी प्रकल्पाला पर्यटकांअभावी पुर्ण थांबा मिळाला आहे. सर्वच अर्थचक्र थांबले आहे. आमच्या गावात निसर्गच्या आकर्षणापेक्षा पुस्तक वाचणाऱ्यांची गर्दी जास्त असायची आणि हा आजार मुख्यतः स्पर्शातुन पसरत असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या पुस्तक हातळणीतुन हा आजार पसरण्याचा धोका वाढतो. या सगळ्याचा परिणाम गावावरती झाला.

गावातील छोट्या उद्योगांवर परिणाम :

गावातचं घरगुती खानावळ चालवणाऱ्या नारायण वाडकर यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितलं,

२०१७ पुर्वी आम्ही केवळ शेतीवर अवलंबून होतो. मात्र पुस्तकाचे गाव जाहिर झाल्यापासून आम्ही आमच्या घरातील हॉल ‘लोकसाहित्य’ या प्रकारच्या पुस्तकांसाठी देवू केला. त्याचवेळी हे पाहायला येणाऱ्या शाळा-कॉलेजच्या सहली, पर्यटक वाचक हे लांबून आल्यानंतर चहा – नाष्टा, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची ऑर्डर देवू लागले.

त्यातुन आम्ही घरगुती खानावळ सुरु केली. हळू हळू आमच्या पुर्ण ९ जणांच्या कुटुंबाचा हाच मुख्य व्यवसाय बनला. सगळा खर्च निघून चांगला इन्कम होता. मात्र कोरोनामुळं हे सगळचं बंद झालं. एक एकर शेतीवर आता पुन्हा सगळे अवलंबून झालो आहोत.

रुम भाड्यानं देण्याऱ्या गणपत पार्टे यांनी सांगितलं,

माझ्या दहा रुम्स आहेत. सुट्टीच्या दिवशी, सिझनमध्ये येणारे दोन – तीन दिवस वेळ काढून येणारे वाचक आणि महाबळेश्वरमध्ये हॉटेलच्या रुम न परवडणारे पर्यटक इथं मुक्कामसाठी येत असतं. प्रतिव्यक्ती ५०० रुपये याप्रणाणं दोन माणसांसाठी एक रुम असते. आठवड्याला त्यातुन १० हजार रुपये मिळायचे. कधी सहा रुम भरायच्या तर कधी आठ तर कधी पाच. पण घर खर्च जावून चांगले पैसे शिल्लक राहत होते.

स्ट्रॉबेरीच अतोनात नुकसान :

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी सुनिल भिलारे यांची दोन एकर शेती आहे. ते सांगतात, महाबळेश्वर तालुक्यात जवळपास अडीच हजार एकरावर स्ट्रॉबेरीच उत्पन्न घेतलं जातं. तर आमच्या मुख्य भिलार गावात ९५ टक्के शेतकरी स्ट्रॉबेरीचं पिकं घेतातं. आमचा सिझन जरी डिसेंबर पासून सुरु होत असला तरीही मुख्य हंगाम हा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तीन महिन्यांचा असतो. याकाळात प्रतिकिलो अगदी २०० रुपये पासून ७० रुपये किलो पर्यंतही दर मिळतो.

मात्र याच काळात लॉकडाऊन झाले आणि पुणे, मुंबईच्या मुख्य बाजारसमित्या बंद झाल्या न् ही सर्व स्ट्रॉबेरी फेकून द्यावी लागली. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे एकरी दिड ते २ लाख रुपयांच नुकसान झालं असून माझं वैयक्तिक साडे तीन ते ४ लाखांच नुकसानं झालं आहे.

ग्रामपंचायतीच्या करवसुलीवर परिणाम :

ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्च महिना हा करवसुलीचा महत्वाचा महिना असतो. आणि नेमकं याच काळात लॉकडाऊन झालं. साधारण आमची १ कोटी रुपयांची करवसुली होणे अद्याप बाकी आहे. मागील वर्षीपेक्षा साधारण ६० टक्क्यांनी ही वसुली कमी आहे.

ही वेळ अशी आहे की वसुलीसाठी आम्ही कोणाकडे तगादा देखील लावू शकत नाही. लोकांचे उद्योग – व्यवसाय मागील ५ महिन्यांपासून बंद होते. गावकऱ्यांच स्ट्रॉबेरीच्या शेतमध्येही नुकसान झालं आहे. आता जरी सुरु झालं तरी आता ग्रामपंचायतीचे है पैसे कधी येतील सांगता येत नाही. असं ही सरपंच भिलारे यांनी सांगितलं.

पुस्तकाचे गावं ‘भिलार’साठी सरकार सकारात्मक :

तत्कालिन शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगतात,

“भिलार या गावातच पुस्तकांचे गाव करण्यामागे एक फार जबाबदारीने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्राच्या सीमाभागाचे संघर्ष, संस्कृतीचा अभिमान व अस्मिता या वादांपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत अतिशय निवांतपणे पहुडलेले भिलार हे गाव.

आज महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक फिरायला येतात. त्यात पाचगणी, वाई ही ठिकाणं परिचित झाली आहेत. पण त्याच्या बाजूलाच असलेले हे गाव मात्र अजूनही पर्यटकांच्या हाकेपासून दूर होता. त्यांच्यापर्यंत विकास, योजना आणि समृद्धी पोहोचावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.

मात्र डिसेंबर २०१९ मध्ये “पुस्तकांचं गाव’ प्रकल्प राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांकडून बासनात गुंडाळण्याची योजना असल्याच्या बातम्या आल्या.

तशा प्रकारच्या हालचाली देखील होवू लागल्या. येथील काही कर्मचार्यांना तीन महिने पगार देवू केला नाही. तसेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना तोंडी निरोपावरून कामावर न येण्याच्या सूचना दिल्या.

कार्यालयाला विनाकारण माहिती मागवणे, देयके थकवणे, नव्या कार्यक्रमांचे प्रस्ताव अडवणे हे प्रकार मंत्रालयीन पातळीवर होवू लागले. ग्रामस्थांनी यासंबंधी मराठी भाषेची जबाबदारी असलेले मंत्री सुभाष देसाई आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. मंत्री देसाई यांनी या प्रकरणामध्ये तत्काळ लक्ष घालून संबंधित सचिवांची बदली केली. असे प्रविण भिलारे यांनी सांगितले.

महाबळेश्वर आणि त्या भागातील बहूतांश गावं ही पर्यटनावरती अवलंबून आहेत. येणारे पर्यटक हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत. आणि त्यातही एप्रिल ते जून हे इथले वर्दळीचे आणि पैसे कमविण्याचे दिवस. परंतु कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे इथल्या अर्थचक्राला घरघर लागली. छोट्यातील छोट्या उद्योगांनाही याची झळ बसली आहे.

त्यामुळे डिजीटलच्या जमान्यात वाचन संस्कृती जपण्यासाठी धडपडत असणाऱ्या भिलार गाव अडगळीत गेलेल्या रद्दीप्रमाणे होऊ नये याची भिती वाटते. लवकरात लवकर पुस्तकांच्या गावांचा हा प्रकल्प पुन्हा झेप घ्यावा अशीच इच्छा.

  •  ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.