सीआरपीएफ जवानांना नवीन टास्क, नक्षल भागात सेंद्रिय शेती शिकवणार

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकां बद्दल आपल्याला नेहमीच आदर आणि सन्मान वाटतो. देशाच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी, मग ती सीमेवरची असो किंवा सीमेच्या आतली आपल्या जिवाची पर्वा न करता हे जवान नेहमीच आपल्या नवनवीन टास्कसोबत सुरक्षेच्या मोर्च्यावर असतात. 

दरम्यान, आता आपले हे जवान सुरक्षेच्या मोर्च्याबरोबर नव्या भूमिकेसाठी देखील तयार होतायेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ३० जवानांना ऑरगॅनिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात येतेय. हे प्रशिक्षण छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात दिले जातेय. 

महत्त्वाचं म्हणजे यामागचा उद्देश सूद्धा तितकाच खास आहे. तो म्हणजे या सीआरपीएफ जवानांची ज्या कोणत्या ठिकाणी पोस्टिंग होईल, तिथल्या शेतकऱ्यांना ते ऑरगॅनिक शेतीचे धडे देतील आणि कीटकांच्या प्रादुर्भावाच्या वेळी त्यांची मदत करतील.

याचा फायदा अंतर्गत क्षेत्रात, विशेषत: छत्तीसगड सारख्या नक्षलग्रस्त भागात जिथे कृषी शास्त्रज्ञ पोहोचू शकत नाहीत, अशा भागात हे जवान शेतकऱ्यांसाठी चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांना प्रगतशील शेतकरी बनवतील. 

विशेष म्हणजे याचा सीआरपीएफ जवानना डबल फायदा होईल. म्हणजे कसं आपल्या रिटायरमेंट नंतर हे जवान शेतात घाम गाळून शेती क्षेत्रात योगदान देऊ शकतील.

या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या काही जवानांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, प्रशिक्षणादरम्यान त्यांना भात, डाळी, तेलबिया, भाजीपाला लागवड, छतावरील बागकाम, नको असलेल्या गवतापासून रोपांचे संरक्षण, कीटकां – पतंगापासून संरक्षण आणि फळांची रोप लावण्याची नवीन टेक्निक या सगळ्यांची डिटेल माहिती देण्यात आली. आणि हे नवीन कौशल्य शिकण्यासाठी ते उत्साहित आहेत.  

या जवानांनी शेण, झाडांची पाने, प्राण्यांची विष्ठा आणि मूत्र इत्यादी मिसळून सेंद्रिय खत कसे बनवायचे हे सुद्धा शिकून घेतलयं. यासोबतच कीटकनाशकांची फवारणी करण्याची पद्धत, सिंचनाची योग्य वेळ, चांगली बियाणे ओळखून आणि ते बनवण्याची माहिती देखील घेतलीये.

इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. गौतम रॉय यांनी सांगितले की, या सीआरपीएफ जवानांना माहिती देण्याबरोबरच त्यांना शेतात नेऊन प्रायोगिकपणे शिकवले गेले. त्यांनी एक चांगले विद्यार्थी म्हणून प्रशिक्षणादरम्यान सर्व माहिती मिळवली.

सीआरपीएफ रायपूर विभागाचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) बलराम बेहेरा यांनी सांगितलं की, तैनात ठिकाणी शेतकऱ्यांची पिके नष्ट होत असताना पाहून जवानांना वाईट वाटायचं. आपण कोणतीही मदत देऊ शकत नाही, अशी खंत त्यांना होती. त्यामुळेचं या जवानांना ट्रेनिंग देण्याचा विचार डोक्यात आला. 

या संदर्भात इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूरला एक पत्र लिहिले, जे व्यवस्थापनाने स्वीकारले देखील.

माहितीनुसार प्रशिक्षणाची ही प्रक्रिया पुढे देखील सुरू राहील. फळ – फूल लागवड, त्यांची काळजी घेणं, फळे आणि भाज्यांसाठी पोषक घटक, फळांचे रोग, कीटक आणि तण व्यवस्थापन, सेंद्रिय खते बनवणे यासह शेतीशी संबंधित इतर अनेक गोष्टींची ट्रेनिंग सीआरपीएफ जवानांना देण्यात येतेय. महत्त्वाचं म्हणजे जवानांना देखील यात रस असून सर्व सैनिकांना या ट्रेनिंगची प्रमाणपत्रेही देण्यात आलीत.

सीआरपीएफ चव्हाण यांच्या या नव्या मोर्चामुळे भारत सरकारकडून चालवलं जाणारं सेंद्रिय शेती अभियान पुढे नेण्यास मदत होईल.

ही वाचा भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.