अमिताभ बच्चनला देखील गंडवणारं बिटकॉईन नेमक आहे तरी काय??

नरेंद्र मोदी सरकार २. ० परत सत्तेत आल्या बरोबर बाह्या मागं करून कामाला लागलय. सरकारने ‘बॅनिंग ऑफ क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल २०१९’ या नावाचा क्रिप्टोकरन्सी बाबतचा प्रस्ताव आणलाय.

यात म्हणल्याप्रमाणे जर कोणीही व्यक्ती आभासी चलनाची निर्मिती करील, जवळ बाळगेल, त्याची विक्री करील, नष्ट करण्याचा प्रयत्न करील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यवहार करील त्याला देशात गुन्हेगार समजण्यात येणार आणि अश्या आरोपीला १० वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रस्तावामुळे देशात आभासी चलनाला मान्यता मिळण्याची शक्यता तर सरकारने संपुष्टात आणलीच आणि त्याचबरोबर चोरीछुपे आभासी चलनाचा व्यवहार करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुध्दा केली आहे .

चलनव्यवस्थेचा इतिहास पहिला तर अस दिसत कि हजारो वर्षांपासून आपण देवाणघेवाणीची पद्धत मागे टाकत चलनाचा स्वीकार केला.

आज चलन म्हणल की आपल्या डोळ्यासमोर येते शंभर रुपयाची कडक हरीपत्ती! अमेरिकी डॉलर किंवा ब्रिटिश पौंड..  युरोपचा युरो..जपानी येन..अशीही नाव आपण ऐकलेली असतात. या चलनांना त्या त्या देशाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संदर्भ तर असतात त्याचबरोबर त्या देशांची अस्मिता त्याच्या चलनाशी जोडलेली असते.

सगळ्या युरोपने युरो हे चलन स्वीकारलं, पण इंग्लंडने आपला पौंड सोडला नाही. याच कारण ही अस्मिताच होत. सगळ्या आशियाचं एक चलन असावं ही कल्पनाही म्हणूनच अजून प्रत्यक्षात आली नाही.

पण याच काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, जागतिकारणाच्या रेट्यामुळे,इंटरनेटच्या संपर्कक्रांतीमुळे यापूर्वी कधीही आलं नव्हत एवढय़ा वेगाने जग जवळ आलं. या सगळ्या सोबतच काही समांतर घडामोडी घडत गेल्या. त्यातलीच एक घडामोड म्हणजे बिटकॉइनचा आभासी चलन म्हणून झालेला उदय !!

काय असत हे बिटकॉइन? कस काम चालत याच ?

२००८ साली साकोशी नावाच्या एका भिडूने एक पेपर तयार केला. त्यानुसार एक किचकट संगणकीय प्रोग्राम मांडून तो नेटवर्कमध्ये वितरित करण्यात आला. हा प्रोग्राम रन करताना त्यातील संगणकिय गणिती प्रणाली सोडविण्याच्या प्रक्रियेस “मायनिंग “हे नाव पडल . प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मायनर्स म्हणून ओळख मिळाली.

प्रथम प्रश्न सोडविणाऱ्यास २५ बिटकॉइन्स मिळतात. ही सारी प्रक्रिया अतिशय किचकट असते पुढच्या टप्प्याकडे जाताना ती आणखीन किचकट होत जाते. दर चार वर्षांनी आधीच्या टप्प्याच्या निम्मे बिटकॉइन्स तयार होतील याची काळजी घेतली जाते.

ब्लॅकमनीचा व्यवहार करणार्यांना या व्यवस्थेचा फायदा कसा होतो?

बिटकॉइन्सच्या माध्यमातून केला जाणाऱ्या व्यवहारात व्यक्तीचे नाव, गाव, आधार कार्ड कशाचीही चौकशी केली जात नाही. सर्व व्यवहार गुप्त लॉगीन पासवर्डद्वारे केला जातो. यामुळे अवैध व्यवसायातील व्यवहार कोणत्याही बँकिंगप्रणालीच्या नजरेत येत नाहीत आणि सगळे आर्थिक व्यवहार बिनबोभाट पार पडतात .

या आभासी चलनाच वर्णन करताना अर्थतज्ञ असं म्हणतात,

“आकाशात उडत जाणारा हैड्रोजन चा फुगा आणि हवा कमी झाल्यावर खाली येणार फुगा म्हणजे याची पद्धत”

पण हे चलन आभासी असलं तरी आज ते एक वास्तवदेखील आहे हे विसरता येणार नाही . सध्याच्या काळात जगभरात निर्मात्या द्वारे बिटकॉइन्सच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन एक्स्चेंज उघडण्यात आली आहेत.

या सेंटर मध्ये मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर बिटकॉइनची किंमत ठरते . या सर्वातून एक वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत. आता एखाद्या देशाने बिटकॉइन्स बंद करायचं ठरविलं तरी शक्य होणार नाही, इतक्या मोठय़ा प्रमाणात ही व्यवस्था वास्तवात फोफावली आहे.

त्यामुळेच हे चलन आभासी असलं तरी वास्तवातील त्याचं अस्तित्व हे अपरिहार्यच राहणार आहे .

एकदा का मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण अंगीकारलं, की अशा प्रकारच्या आर्थिक घडामोडीना सामोरं जावंच लागणार. बिटकॉइनचे अस्तित्व हे येणाऱ्या काळात नाकारता येणार नाही याच एक ताज उदाहरण म्हणजे व्हेनेझूएलाची सध्याची खराब आर्थिक स्थिती यातून बाहेर पडण्यासाठी स्वीकारलेला बिटकॉइन चा मार्ग !

व्हेनेझुएलाचे सध्याचे चलन आहे ‘बोलिवर्स’. मागील काही काळात व्हेनेझुएलामध्ये बोलिवर्स या चलनाची पत इतकी खाली गेली की,’ दोन वर्षांपूर्वी ज्या किमतीत व्हेनेझुएलामध्ये सदनिका विकत घेता येत असे, त्या किमतीत आता फक्त एक कप कॉफी मिळू लागला.’

यातून बाहेर येण्यासाठी क्रूड तेलाच्या साठयावर (पन्नास लाख पिंप) आधारित व त्या देशाकडे असणाऱ्या सोन्याच्या साठ्यावर आधारित बिटकॉइनच्या धरतीवर अशी दोन आभासी चलने (पेट्रो  आणि पेट्रो गोल्ड) बाजारात आणली.

ही आभासी चलने लोकप्रिय करण्यासाठी त्या देशाचे  राष्ट्रध्यक्ष निकोलस यांनी वेगवेगळे मार्ग शोधले. कच्च्या तेलाचा मुबलक साठा बाळगणाऱ्या व्हेनेझुएलाने अरब देशांच्या तुलनेत ३० टक्के कमी दराने कच्चे तेल देण्याचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला. मात्र, त्यासाठी एक अट ठेवण्यात आली.कच्या  तेलाच्या बदल्यात देण्यात येणारी रक्कम केंद्र सरकारने ‘पेट्रो’ या व्हेनेझुएलाच्या आभासी चलनात दिली तरच ही सवलत मिळणार.

कोणत्याही देशाकडून असा  अधिकृत दर्जा देण्यात आलेले  ‘पेट्रो’ हे पहिले आभासी चलन ठरले आहे. आता भारत देश या प्रस्तावच काय करणार या बाबत काही ठरलेलं नाहीये. जगभरात आभासी चलन वापरण्याची व्यवस्था इतकी जोर धरत असताना भारतात काही लोकांना याचा वापर करून गंडा घातल्याची उदाहरण मागील काही काळात समोर येत आहेत !!!

असाच एक किस्सा आहे आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या अमित लखनपाल या कार्यकर्त्याचा!!

त्याने ठाणे आणि विक्रोळीमध्ये फलिनस्टोन ग्रूप कंपनीची कार्यालये उघडली. आपण अर्थ मंत्रालयाचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे लोकांना सांगितले. सप्टेंबर, २०१७ मध्ये या चलनाचा आयसीओ बाजारात आणला त्याचे नाव “एमटीसी” ठेवले.

एका ‘एमटीसी’चा दर ३ डॉलर वरून २५०० डॉलरपर्यंत पोहोचेल, असा प्रचार तो करत असे नंतर हा दर ६ हजार डॉलरपर्यंत पोहोचल्याचे त्याने जाहीर केले.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या देशी, परदेशी मासिकांमध्ये इतकेच नव्हे, तर फोर्ब्स मासिकातही त्याची मुलाखत आणि क्रिप्टोकरन्सीच्या व्यवसायाबाबत माहिती छापून आणली. फिल्मस्टार, राजकीय नेतेमंडळी यांच्यासोबतचे त्याचे फोटोही या मासिकात आहेत.

with Salman

मात्र परतावा न मिळाल्याने नवी दिल्लीतील एका गुंतवणूकदाराने तक्रार केल्यानंतर  फसवणुकीचा उलगडा झाला. याच एका कार्यकर्त्याने अडीच हजार गुंतवणूकदारांना ५०० कोटी रुपयांचा गंडा घातला. असे फसवणुकीचे अनेक किस्से मागील काही काळात पाहायला मिळाले.

अमिताभ बच्चन ला सुद्धा या बिटकॉइन चा चांगलाच फटका बसल्याच उदाहरण अगदी ताज आहे. याच बिटकॉइन मधील गुंतवणुकीमुळं बीग बी ची ६४० कोटी पर्यंत पोहचलेली कमाई  ४ कोटी ७० लाखावर आली होती.

आता येणाऱ्या काळात भारतात आभासी चलनाची बंदी ही  बातमी आली तशी आणखी एक बातमी समोर आली येणाऱ्या काळात फेसबुकच सुद्धा आभासी चलन येणार?

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक ‘क्रिप्टो करन्सी’ सादर करण्यासाठी गांभीर्याने विचार करीत आहे.

मध्यंतरी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतनही आभासी चलनाच्या माध्यमातून देणार असल्याचे वृत्त होते. जून  महिन्याच्या अखेरीस फेसबुकचे आभासी चलन सादर होण्याची शक्यता आहे. नियमित चलनाबरोबरच या आभासी चलनाचा उपयोग मेसेंजर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून गुंतवणूक , व्यापार आणि विनिमयासाठीही करता येणार आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे आभासी चलन प्राप्त करण्यासाठी एटीएमही उघडली जाणार आहेत. 

एका अहवालानुसार ‘फेसबुक’च्या या आभासी चलनाचे नाव ‘ग्लोबलकॉइन’ असे असून, त्याची चाचणी चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. २ अब्जांहून अधिक यूजर ‘असणाऱ्या फेसबुक’च्या  योजनेनुसार २०२०च्या पहिल्या तिमाहीपर्यंत डझनभर देशांमध्ये या आभासी चलनाच्या मदतीने डिजिटल पेमेंट सुरू करण्यात येणार आहे.’

आता या फेसबुक च्या धोरणासाठी भारत सरकारच्या मध्यवर्ती बँक आर.बी.आयच काय धोरण काय असणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.