पटणार नाही पण टिंबा एवढा क्युबा देश तब्बल ५ लसींवर काम करत आहे….

जगभरातील अनेक देशात कोरोनाने आपले पाय पसरले आहे. अनेकांना दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावरही जोर दिला जात असून नवनवीन लसींवर काम केले जात आहे. मात्र हे सगळे प्रयत्न भारत, अमेरिका, रशिया, चीन या काही प्रमुख देशांमध्येच होतं असल्याचं दिसून आलं होतं, मात्र या लस स्पर्धेत टिंबा एवढा क्युबा देश पण उतरला आहे.

एकीकडे राजकीय अस्थिरता असूनही कॅरिबियन समुद्रातील बेटावरील क्युबा १-२ नव्हे तर ५ लसींवर  काम करत आहे. ज्यातील दोन लसी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आणि जर तिसरी चाचणी यशस्वी झाली तर हा स्वदेशी लस देणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरणार आहे.

क्युबाचा वैद्यकीय इतिहास सांगायचं झाला तर गेल्या वर्षी अर्थात मार्च २०२० मध्ये युरोपियन देशांत कोरोनान रौद्र रूप धारण केल होतं. तिथलं मृत्युचं तांडव पाहून जगभरातील सर्व तज्ञ या ठिकाणी जायला घाबरत होते. अश्या वेळी क्युबासारख्या छोट्याशा देशाने आपली डॉक्टरांची टीम युरोप, व्हेनेझुएला, निकाराग्वा, जमैका आणि सुरिनाम येथे पाठवली होती.

इथल्या डॉक्टरांची खासियत

जेव्हा क्यूबाचे डॉक्टर त्यांची डिग्री मिळवतात, तेव्हा त्यांना अश्या देशात पाठवलं जात जिथं संसर्गजन्य रोग आहे किंवा इतर काही आवश्यकता आहे. संक्रमित ठिकाणी जाण्यापूर्वी रुग्णालयांकडून त्यांना ट्रेनिंग दिली जाते. ज्यामध्ये वैयक्तिक सुरक्षिततेची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. जिथे ते १-२ वर्षे काम करतात.  त्यांना त्या देशाची भाषा, अन्न आणि संस्कृतीचे मूलभूत ज्ञान देखील मिळते.

सुमारे १.१५ कोटी लोकसंख्या असलेल्या या छोट्या देशाची आरोग्य व्यवस्था जगभरात नावाजली जाते. जागतिक आरोग्य संघटनेचा विश्वास आहे की, सर्व देश इथल्या आरोग्य सुविधांकडून शिकू शकतात. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या ६० देशांमध्ये क्यूबाचे ३० हजार डॉक्टर आहेत. क्युबामधील प्रत्येक १५५ लोकांसाठी १ डॉक्टर उपलब्ध आहे. जे अमेरिका आणि इटलीपेक्षा चांगले आहे. सर्वोत्तम तज्ञांमुळे क्युबा बर्‍याच काळापासून जगभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण देत आहे.

आतापर्यंत १२३ देशांच्या डॉक्टरांनी घेतलंय प्रशिक्षण 

इथल्या लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसिन (ELAM ) येथे डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाते. १९९८ पासून १२३ देशांमधील डॉक्टर येथे प्रशिक्षण घेत आहेत. यूएनचे माजी सरचिटणीस बान की मून यांच्या मते, क्युबामधील मेडिसिन स्कूल ELAM जगातील सर्वात आधुनिक मेडिकल स्कूल आहे. यामुळेच क्युबाच्या वैद्यकीय सुविधा जगात क्यूबन मॉडेल म्हणून ओळखल्या जातात.

जगातील सर्वात मोठा डॉक्टर निर्यात करणारा देश

या देशात जाणकार डॉक्टर आहेत पण आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना बाहेर  पाठविणे क्युबाच्या अर्थव्यवस्थेस अनेक प्रकारे मदत करते. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटचे तज्ज्ञ मार्क केलर सांगतात की, १९९८ मध्ये व्हेनेझुएलामध्ये अंतर्गत क्रांती झाली तेव्हा व्हेनेझुएला आणि क्युबाने एकमेकांना मदत करण्यास सुरवात केली. तेलामध्ये बळकट व्हेनेझुएला क्युबाला पैसे आणि तेल देऊन मदत करीत असे, तर बदल्यात क्युबा त्यांना डॉक्टर आणि क्रीडा प्रशिक्षक पाठवत असे.

सध्या क्युबामध्ये कोरोना विषाणूचे दररोज १००० रुग्ण समोर येत आहेत. काल एका दिवसात ९३८ प्रकरण समोर आली. यासह संक्रमितांचा आकडा १,०४,४४८ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे. अर्थात क्युबामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे.

यावर मात करण्यासाठी क्यूबानचे शास्त्रज्ञ एकाच वेळी ५  लसींवर काम करत आहेत. यातील दोन लसी अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना स्पॅनिश नाव सोबेराना देण्यात आले. क्यूबानच्या क्रांतिकारक जोस मॅट्रीच्या नावावर आणखी एक लस ठेवण्यात आली. याव्यतिरिक्त, ज्यांनी स्पेनमधून क्युबाचे स्वातंत्र्य जिंकले त्यांच्यासाठी दोन लसी समर्पित केल्या आहेत.

दरम्यान या लसींवर काम करण्याबरोबरच क्युबाचे शास्त्रज्ञ लसीचा तिसरा डोस आवश्यक आहे का? यावर अभ्यास करत आहेत. तसेच दोन आठवड्यांच्या अंतराने दोन्ही डोस देणे पुरेसे आहे होईल का? आणि ही लस सामान्य रेफ्रिजरेटर तापमानावरही काम करू शकते का? यावरही अभ्यास करत आहेत. या चाचणीचा निकाल मेच्या सुरूवातीस येणे अपेक्षित आहे.

या सगळ्यात देशातील १,२४,००० आरोग्य कर्मचार्‍यांना अब्डाला नावाच्या क्यूबातच तयार केलेल्या लशीचे डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सोबेराना २ नावाच्या लसीच्या तिसर्‍या टप्प्यात ४४ हजाराहून अधिक लोकांनी भाग घेतला. याचे निकाल योग्य आल्यास, ते सेंटर फॉर स्टेट कंट्रोल ऑफ मेडिसिन्स, इक्युपमेंट व मेडिकल  डिव्हायस (CECMED) येथे पाठविले जाईल, जेथे मंजुरीनंतर रुग्णालयात वापरासाठी परवानगी देण्यात येईल. इराण आणि व्हेनेझुएला या लसीचे ट्रायल चालू आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे त्रस्त असूनही, क्युबा जगातील अशा देशांमध्ये आहे, ज्याने अद्याप विदेशी लस टोचविली नाही.

या देशांनी क्युबाची लस घेण्याची दाखवली तयारी

क्यूबान सरकारने दावा केला की, अनेक देशांनी त्यांच्याकडून १०० दशलक्ष डोस घेण्याविषयी बोलले आहे. पाश्चात्य देशांकडून महागड्या लस घेण्यास असमर्थ असणारे बरेच गरीब देश आशेने क्युबाकडे पहात आहेत. कम्युनिस्ट देश व्हेनेझुएलाने  येथे तयार केलेल्या अब्डाला लसीचे उत्पादनही सुरू केले आहे.

लस न खरेदी करण्यामागील राजकीय कारणे

दरम्यान, क्यूबाने स्वतःची लस विकसित करण्यामागे आणि अमेरिका किंवा त्याच्या मित्र देशांनी ही लस न घेण्यामागचे कारण क्युबा आणि अमेरिकेतील तणाव असल्याचे समजते. दुसर्‍या महायुद्धानंतर जेव्हा जग दोन शक्तिशाली भागात विभागला गेला तेव्हा क्युबाने अमेरिकेकडे कानाडोळा करत रशियाची बाजू घेतली आणि हीच गोष्ट अमेरिकेला खटकली आणि त्याने क्युबावर बरेच निर्बंधही लादले. ज्याचा परिणाम म्हणून अजूनही दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

हे ही वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.