मिशनरी म्हणून भारतात आलेल्या फादर दलरींनी पंढरीच्या विठोबाला फ्रान्सला पोहचवलं..

शेकडो वर्ष झाली विठुरायाच्या दर्शनासाठी अखंड वाहणारी वारी. यात गरीब नसतो श्रीमंत जातीपातीचा भेदभाव नसतो. सगळे माऊलीच्या ओढीनं टाळ मृदूंगाच्या गजरात पंढरीला मार्गक्रमण करत असतात. अशाच एका वारीत काही परदेशी पाहुणे देखील उत्सुकतेने सामील झाले होते.

माऊलींच्या, तुकोबांच्या पालखीबरोबर लाखो लोक चालतात. शेंकडो दिंड्या त्यात सहभागी होतात. हे सर्व न थकता, प्रसन्न मुद्रेने चालत असतात. हे सर्व फार शिकलेली नसूनही, त्यांच्यात एवढी शिस्त कशी, असा प्रश्न या विदेशी अभ्यासकांना पडला होता.

दिंडीतील शिस्तीने ते अवाक् झाले.

ही वारी म्हणजे आहे तरी काय? यांच्या पायात चपला नाहीत, हे लोक काही शिकलेले नाहीत, कुठेही गावागावात मुक्काम, तेथेच जेवण चाललेय. हे सर्व त्यांनी पाहिले. त्यातील एकाला शंका आली.

त्यांच्या सोबत एसपी कॉलेजचे प्राचार्य व हभप महाराज सोनोपंत दांडेकर होते. मामासाहेब दांडेकरांच्या शेजारी एक त्यांचा एक फ्रेंच शिष्य देखील होता. वारी पाहायला आलेल्या परदेशी पाहुण्याने त्यांना विचारले,

“ही जी सगळी लक्षावधी माणसे चालली आहेत, ती भिकारी आहेत का हो?”

हा प्रश्न ऐकल्यानंतर मामासाहेब दांडेकरांना एक क्षणभर थोडेसे वाईट वाटले. मात्र त्यांचा तो फ्रेंच शिष्य पुढे आला अन त्याने एका क्षणात उत्तर दिले,

‘हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हे भिकारीच आहेत, पण ते स्वत:साठी भीक मागायला निघालेले नसून पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जगाच्या कल्याणाकरिता, जगाच्या शांततेकरिता, जगाच्या प्रेमाकरिता, जगाच्या बंधुत्वाकरिता, मानवतेकरिता भीक मागायला निघालेले आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला, तुमच्या माझ्याकरिता भीक मागायला ते निघालेत.’

तो फ्रेंच शिष्य म्हणजे भागवत संप्रदायांचे महान अभ्यासक फादर डॉ. दलरी.

गाय अल्बर्ट दलरी यांचा जन्म फ्रान्समध्ये १९२२ साली झाला. ते एक ख्रिस्ती मिशनरी होते. मात्र जगभरातल्या निरनिराळ्या संस्कृतीबद्दल त्यांना उत्सुकता होती. फ्रान्समध्ये असतानाच त्यांच्यावर फ्रेंच संस्कृत विद्वान प्रा. सिल्व्ह लेवी यांच्या कार्याची छाप पडली.
संस्कृत ग्रंथ समजावून घेण्याची इच्छा झाली तेव्हा कोणीतरी त्यांना पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटला जाण्याचा सल्ला दिला.

पुण्यात आल्यावर त्यांना संस्कृतचा अभ्यास करताना  भागवत संप्रदायातील आणि वारकरी संप्रदायातील वाङ्मयाचा, त्यातही जगतगुरू संत तुकारामांच्या गाथेचा प्रभाव पडला. पुढे ते चार वर्षे पुण्यात राहिले.

इंग्रजीच्या माध्यमातून प्रयत्न करून, एस. पी. कॉलेजचे प्राचार्य व हभप मामासाहेब दांडेकरांकडून चार वर्षांमध्ये ते उत्तम मराठी शिकले.

मामासाहेबांच्या सल्ल्याने निवडलेल्या १०१ अभंगांचे त्यांनी फ्रेंचमध्ये भाषांतर केले. त्याचे पुस्तक तयार करून ते १९५६ साली पॅरीसला जाऊन प्रकाशित केले. तुकोबांच्या अभंगांचे फ्रेंच भाषेतील निरूपण, त्याचा अर्थ तेथील लोकांना खूप भावला. जगतगुरू संत तुकाराम महाराजांची विश्वव्यापक अशा वैश्विक धर्माचे, वैश्विक मानवतेचे, वैश्विक देवाचे व्यापक तत्त्वज्ञान त्यात मांडलेले आहे.

 जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या फ्रेंच भाषेत फादर दलरी यांनी केलेल्या भाषांतरामुळे फ्रेंच नागरिक प्रभावित झाले.

इतकेच नाही तरी त्यांनी भारतातील अभ्यासावर ‘इंडिया रिबेल कॉन्टीनेंट’, ‘महात्मा गांधी’, ‘तुकाराम’, ‘महाराष्ट्र संस्कृत’ असे ग्रंथ लिहिले. १९४३ ते १९७३मध्ये ते भारतात वास्तव्याला होते. १९६० साली त्यांनी विठ्ठल संप्रदायावर पीएच.डी. संशोधन करण्याचे ठरवले. त्यांनी म्हटले आहे,

‘‘महायुद्धामुळे घडलेल्या मानव संहारामुळे मनाला उद्विग्नता आली. भारताची हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा मी ख्रिश्‍चन असूनही मला खेचू लागली. पुण्यात आल्यावर मी वारकरी समाजाकडे खेचलो गेलो.

१९५१ त्यांना कै. मामासाहेब दांडेकरांच्या दिंडीतून पायी वारी केली आणि नंतर पुढे आठ वर्षे पंढरपूर श्रीविठ्ठल यांचा अभ्यास सुरू केला. डेक्कन कॉलेजचे डॉ. एस.एम. कात्रे आणि डॉ. ह.धी. सांकालिया यांनी मला प्रोत्साहन दिले.’’

वारकरी संप्रदाय, क्षेत्र पंढरपूर, विठ्ठलदेवता या सर्वांचा इतिहास, भूगोल, मूर्तिविज्ञान इत्यादी विषयांवर संशोधनात्मक छायाचित्रे, नकाशे यांच्यासहित क्षेत्राभ्यास करून ‘कल्ट ऑफ विठोबा’ नावाचा ग्रंथ तयार केला. त्याला मूर्तिविज्ञानाची जोड दिली. ग्रंथ अलौकिक झाला. फ्रान्स आणि भारत दोन्ही देशात गाजला. पुणे विद्यापीठाच्या अनुदानातून तो प्रसिद्ध झाला आणि आता नुकतीच त्याची दुसरी आवृत्ती निघाली.

संत तुकारामांच्या अभंगाचे फ्रेंच भाषांतर डॉ. दलरींच्या आग्रहाखातर फ्रान्सच्या रेडिओवर प्रसारितही झाले.

नंतरच्या काळात जगभरातील आणि भारतातील अनेक अभ्यासकांसाठी कल्ट ऑफ विठोबा हा ग्रंथ पथदर्शक ठरला.

अर्थात संशोधनाच्या क्षेत्रात कुठलाही शब्द अंतिम नसतो. त्यानुसार दलरी यांनी केलेली काही मांडणी नंतरच्या काळात काही अभ्यासकांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा श्री. विठ्ठलाच्या अभ्यासामध्ये दलरी यांच्या या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आज इतक्या वर्षांनंतरही फादर दलरींचा ‘कल्ट ऑफ विठोबा’ अभ्यासल्याखेरीज देशी-विदेशी, वारकरी संप्रदाय, विठ्ठल दैवत, पंढरपूर यांच्या अभ्यासकांना पुढे जाता येणार नाही. फक्त ग्रंथ म्हणूनच नाही तर भागवत संप्रदायाचा अभ्यासक म्हणून अनादी अनंत काळापासून पंढरीच्या विटेवर उभ्या असलेल्या विठोबाला सातासमुद्रापार नेण्याचं श्रेय फादर दलरी याना नक्कीच जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.