बोलभिडू स्पेशल : जोतिबा डोंगरावरचं अर्थकारण पार संपून गेल वो…

जोतिबा म्हटलं की,

गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगभलंचा गजर

जोतिबा म्हटलं की,

नवीन लग्न झालेल्या जोडप्याची वावरजत्रा

आणि जोतिबा म्हटलं की,

मग पन्हाळा, कोल्हापूरचा रंकाळा सगळं आठवायला लागतं

महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र (आणि आता तेलंगणा), गोव्यातील लाखो कुटुंबांचा जोतिबा कुलस्वामीलग्न झाल्यावर सगळ्या घरादारानं जोतिबाला जायचं. वावरजत्रा करायची. वावरजत्रा म्हणजे दुसरं तिसरं काय नसतंयजोडीनं देवाला नमस्कार आणि नैवेद्य. पण त्याला लय महत्व. लांबलांबून जोडपी येतात. वावरजत्रा केली मग संसार सुरू

कोल्हापूरपासून 16 किलोमीटरवर जोतिबाचा डोंगर. पलिकडे पन्हाळा आणि मध्ये वारणेचं हिरवंगार खोरं. कोल्हापूरची अंबाबाई कोल्हासूर राक्षसाशी युद्ध करत असताना देवीने जोतिबाला मदतीसाठी हाक मारली

उत्तरेचा देव दक्षिणी आला

बद्रीकेदार म्हणजेच जोतिबा अंबाबाईच्या मदतीला धावून आला आणि त्याने रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. युद्ध संपलं. देवीने जोतिबाला कोल्हापूरच्या जवळपासच राहण्याची विनंती केली आणि मग जोतिबा इथेच राहिला अशी अख्यायिका सांगितली जाते.

रविवार, पोर्णिमेच्या दिवशी डोंगरावर बख्खळ गर्दी. चैत्र यात्रेला तर डोंगरावर पाय ठेवायला जागा नसते. सगळा डोंगर गुलालानं माखलेला. मग संध्याकाळी थोडावेळ का होईना पाउस येतोच येतो. का? तर गुलाल धुवून काढायला. अशी जाणती माणसं सांगतात

जोतिबा म्हणजे वाडी रत्नागिरी. गावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास. गावात प्रामुख्याने गुरव समाज. जोतिबाची पूर्जाअर्चा, भाविकांचे नैवेद्य यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर या समाजाचा चरितार्थ.

95 टक्के गावकऱ्यांचे पोट जोतिबामुळेच भरते

कोरोनाला दूर ठेवण्यात जोतिबा डोंगरवासियांना यश आले असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेकारीची कुऱ्हाड मात्र गावकऱ्यांच्या चांगलीच वर्मी बसली आहे. चार महिन्यांपासून लॉकडावून आणि मंदिर बंद असल्याने जगायचं कसं हा प्रश्न आता गुरव समाजासमोर उभा राहिला आहे

कसं चालतं या गावाचं अर्थकारण?

जोतिबावरील गुरव समाजाचे सगळे अर्थकारण जोतिबाभोवतीच फिरते. देवाची पूर्जा अर्चा करण्याचा मान प्रत्येक घराण्याकडे वर्षातील काही दिवस येतो. काही घराण्यांकडे हा मान वर्षातून दोनवेळा तर काही घराण्यांकडे हा मान तीन वर्षातून एकदा येतो. असं का? याचं काही ठोस कारण कळत नाही. पण पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणंच सगळे व्यवहार इथं चालतात

ज्या घराण्याकडं आठ दिवसांसाठी पूजेचा मान येतो त्याला आठवडा म्हणतात.

म्हणजे या आठ दिवसात या घराण्यातील कुटुंबांनी मिळून देवाची सेवा करायची. या काळात देवाला अर्पण केलेल्या दक्षिणेवरच या कुटुंबांचा चरितार्थ चालतो. त्याशिवाय रविवार, पोर्णिमा या दिवशी अनेक भाविक जोतिबाला नैवेद्य करतात

पुरणपोळी, गुळवणी, यळवण्याची आमटी, बटाट्याची भाजी, भात, कुरुड्या हा नैवैद्य जोतिबाला प्रिय मानला जातो. प्रत्येक भाविकाचा नैवेद्य करणारा गुरव पिढ्यानपिढ्या ठरलेला आहे. त्यामुळे रविवारी जोतिबाला जायचं, नैवेद्यासाठी नेलेला शिधा आपल्या नेहमीच्या पुजाऱ्याच्या घरी सोपवायचा, चहा घ्यायचा आणि दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं हा इथला रिवाज. दर्शन घेवून येईपर्यंत नैवेद्य तयार असतो. नैवेद्य घ्यायचा, इच्छेनं दक्षिणा द्यायची आणि परतीच्या वाटेला लागायचं

गुरव समाजाचे अभ्यासक दाजी शिंगे सांगतात, 

कोरोनामुळं सगळंच ठप्प झालंय. मंदीर बंद आहे. आर्थिक चक्र थंडावलंय. गुरव समाजाची अवस्था हलाखीची बनली आहे. पावसाळ्यापूर्वीच शिधा स्वरुपात मिळालेलं धान्य संपलय. रोख रक्कमही नाही. त्यामुळे अनेकांना पोटापाण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागत आहेत. 

जोतिबावर नेहमीच गर्दी असते. पावसाळ्यातही लांबलांबून भाविक येतात. पण पाच महिन्यांपासून सगळं थांबलंय. त्यामुळे रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झालाय. अनेकांनी भाडेकराराने जागा घेवून दुकाने थाटली आहेत. मोठ्या प्रमाणात साहित्य भरले आहे.

पण कोरोनामुळे देवूळबंद आहे. भाविकांना येण्यासही मनाई आहे. त्यामुळे व्यवसाय नाही. साहजिकच जागेचं भाडं कसं भरायचं? कर्ज काढून साहित्य आणलेय. व्यवसाय नाही तर कर्ज कसं फेडायचं असे अनेक प्रश्न आहेत. 

साधारण गावांमध्ये परस्पर संबंध असतात, शेती असते. एका गावात नाही तर दूसऱ्या गावातून का होईना अर्थचक्र चालू राहते पण डोंगरावरच्या गावांच अर्थशास्त्र वेगळं असतं. खासकरून जोतिबाच्या डोंगरावर असणारे गावकरी प्रामुख्याने देवस्थान व पर्यटनावरच अवलंबुन असतात. डोंगरावर एकच गाव असल्याने इतर गावांशी व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अर्थगाड्याशी त्यांचा व्यवहार येत नाही. कोरोनामुळे फक्त एक समाजच नाही तर एक गाव देखील संकटात सापडलं आहे हेच खरं.

जोतिबा संगळ्यांचं चांगलं भलं करतो. म्हणून त्याचे नामस्मरण करताना चांगभलंचा गजर केला जातो. पण कोरोनामुळे आमच्यावर वाईट वेळ आली आहे. या संकटातूनही जोतिबा सगळ्या जगाला बाहेर काढेल आणि डोंगर पुन्हा एकदा भाविकांनी फुलेल, गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि चांगभलंचा गजर होईल या आशेवरच गुरव समाज आहे.

  • समरजीत भोसले 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.