बोलभिडू स्पेशल : मागच्या वर्षी ७५ हजारांची सुपारी होती यावर्षी ७५ रुपये देखील मिळाले नाहीत

मागच्या दोन वर्षापूर्वी इस्लामपूरवरुन चिपुळणला वाजवायला गेलो होतो . ७५ हजारांची सुपारी होती, आमची आजवरची म्हणजे ५५ वर्षातील सर्वात मोठी सुपारी वाजवली होती ती. पण यंदा ७५ रुपये देखील वाजवून मिळाले नाहीयेत. सहा महिने फक्त उसनवारीत दिवस ढकलेले आहेत…

हे नाही संपलं तर अवघड आहे पुढचं….

भिडूंनो, ही आपबिती आहे इस्लामपूरच्या माने बॅन्ड कंपनीत गाणं म्हणणाऱ्या किसन माने यांची. पुढे ते म्हणतात,

वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी इथं गाणं म्हणण्याच काम करतोय. आज पंचवीस वर्ष झाली, लेडीज आणि जेन्टस अशा दोन्ही आवाजात मी गाणं म्हणतो. त्यातुनच घरखर्च चालतो. पण मागच्या आठवड्यात सगळेच पैसे संपले होते, मालकानं तीन हजार रुपयाची मदत केली तेव्हा घरी गौरी-गणपती बसले.

‘माने बॅन्ड कंपनी’ ही इस्लामपूरमधील सगळ्यात जुन्या बॅन्ड कंपन्यांपैकी एक. या बॅन्ड कंपनीचे मालक विजय माने सांगतात, आज माझ्या रुपाने आमची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. माझ्या आजोबांनी जवळपास ५५ वर्षांपुर्वी याची सुरवात केली होती. पुढे वडिलांनी हा व्यवसाय वाढवला. भागातील वेगवेगळ्या गावची माणसं ताफ्यात आणली. त्या-त्या गावच्या सुपाऱ्या मिळाव्यात हा त्यामागचा उद्देश होता.

बॅन्ड कंपन्यांचे अर्थशास्त्र कसे असते?

लग्न, गावातील बेंदुर, शिराळची नागपंचमी, गणपती, नवरात्री हे आमचे सिझनचे दिवस. मागील काही वर्षामध्ये सुपाऱ्यांच्या संख्येमध्ये आणि पैश्यांमध्येही वाढ झाली. आम्ही मागील वर्षापर्यंत सिझनला ७ हजार रुपयांपासून ७५ हजार रुपयांच्या जवळपास ४५-५० सुपाऱ्या वाजवल्या होत्या. यातुन सरासरी पैसे १२ ते १३ लाख रुपये दरवर्षी मिळतात.

पण त्यात ही वाजवणाऱ्या माणसांची संख्या, किती वेळ वाजवायचे आणि किती अंतर लांब वाजवायला जायचे आहे यावर सुपारीचा दर ठरतो. जितकी माणसं, वेळ आणि अंतर जास्त तितका सुपारीचा दर जास्त आणि तितकाच नफा जास्त. फुल सुपारी असेल तर प्रत्येकी साधारण १५०० रुपये मिळतात. असं ही विजय माने सांगत होते.

दहा महिन्यांच्या काळात केवळ चार सुपारी

यावर्षी मात्र मेन सिझन चालू होण्यापुर्वी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात अवघ्या चार ठिकाणी कार्यक्रम केले होते. त्यानंतर मात्र पुढच्या सात महिन्यांमध्ये एकही सुपारी मिळाली नाही. लॉकडाऊनच्या काळात जे शिल्लक ते पैसे पुरवून वापरले. पण ‘मे’ मध्ये ते ही संपले. हात थांबले तरी पोट थांबत नाही. सगळे बंद होते तेव्हा पाण्याविना मासा तडफडतो तसे कधी-कधी भुकेने व्याकुळ झालो होतो.

बॅन्ड व्यतिरिक्त दुसरे काय करता ?

अखेरीस सगळं हळू हळू सुरु झाल्यावर आमच्या कार्यक्रमांना परवानगी मिळेल या आशेवर होतो. पण जून संपला तरी परवानगी मिळाली नाही. शेवटी चार पत्रे ठोकून नाष्ट्यासाठी एक छोटस हॉटेल सुरु केलं आहे. तिथं ही जागेवर खायची परवानगी नसल्यामुळे पार्सल थोडसचं जातं. असं बॅन्ड कंपनीचे मालक विजय माने सांगत होते.

तर जे गावाकडे आहेत ते शेतातील कामावर जातात, काही खड्डे काढायला तर काही जण हमाली करायला जातात. अनेक वर्ष बॅन्डमध्येच काम केल्यामुळे दुसरे कोणते स्किल शिकलो नाही.

त्यामुळे आत्ताच्या दिवसांमध्ये पैसे उनसे घेवून दुसरा कोणता व्यवसाय चालू करण्याचीही भिती वाटते. परत ते पण पैसे माथी बसणार, अशी व्यथा किसन माने यांनी बोलून दाखवली.

साथ रोग पसरत असल्यामुळे सरकारचही बरोबर आहे. पण आमच्या सारख्यांचा विचार करायला हवा, हातावर पोट असणाऱ्या आम्हाला कलाकार म्हणून मानधन मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत पण अजूनही विचार होत नाहीये अशी ही खंत माने यांनी व्यक्त केली.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.