टिपू सुलतानाचे वंशज आज रिक्षा चालवतात..

भारताचा इतिहास राजा-महाराजांच्या घराण्यांनी समृद्ध आहे. मोठमोठ्या आणि महापराक्रमी राजांनी भारतावर राज्य केलं. त्यांच्या शौर्याच्या गाथा आजही गायल्या जातात. राजे गेले पण त्यांच्या अनेक पाऊलखुणा मागे ठेवून गेले. यात त्यांच्या वंशाचा देखील समावेश होतो. अनेक राजांचे वशंज आजही ताठ मानाने समाजातील त्यांचा हुद्दा धरून आहेत.

मात्र काही राजांचे वंशज काळाच्या ओघात नाहीसे झाले तर काहींचे वंशज हयात असूनही ‘हे राजकीय घराण्याचे लोक आहेत?’ असं विचारण्यासारखी त्यांची स्थिती झाली आहे.

यातीलच एक म्हणजे टिपू सुलतानाचे वंशज.

म्हैसूर घराण्यातील अत्यंत प्रसिद्ध राजपुत्र म्हणजे फतेह अली शाह टिपू सुलतान. ‘म्हैसूरचा टायगर’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. टिपू सुलतानने आपल्या लष्करी बुद्धिमत्तेच्या आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर कीर्ती मिळविली. १७९९ मध्ये सेरिंगपट्टणम इथे ब्रिटीशांशी लढताना त्यांना वीरमरण आलं, हे त्यांचं शौर्य आपल्याला दाखवतं.

मात्र याच टिपू सुलतानाच्या वंशजांची आज अत्यंत बिकट अवस्था झाली असून ही वंशावळ नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कुणी जण रिक्षा चालवतोय, कुणाकडे रॉकेलची डिलरशीप आहे, तर कुणी कपड्यांचं दुकान सांभाळतोय…. किरकोळ नोकऱ्या करून भाड्याच्या घरात राहून जगण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. अगदी सामान्य कुटुंबासारखी त्यांची स्थिती झालीये.

मात्र खरं तर हे लोक देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत मुस्लिम ट्रस्टपैकी एक असलेल्या प्रिन्स गुलाम मोहम्मद ट्रस्टचे वारसदार आहेत. कोलकात्यातील टॉलीगंज क्लब आणि रॉयल कलकत्ता गोल्फ क्लबसारख्या रियल इस्टेटचे ते मालक आहेत.

मग अशी परिस्थिती त्यांच्यावर का ओढावली?

टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी त्यांच्या वारसदारांनी कोलकत्याच्या टॉलीगंजला हकालपट्टी केली. कारण पराभूत राज्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी राज्यापासून दूर ठेवलं तर ते परत राज्य जिंकतील याचा धोका कमी असतो, अशी इंग्रजांची धारणा होती.

असे टिपू सुलतानाचे जवळपास २,८९७ वारसदार म्हैसूरहून कोलकत्याला आले. त्यांना बांग्ला ही स्थानिक भाषा समजत नव्हती आणि बोलताही येत नव्हती. तरी कसंतरी तग धरायचा प्रयत्न ते करत होते…

१९४७ पर्यंत बऱ्यापैकी चांगलं चालू होतं पण त्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती अचानक ढासळली. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेकांनी कोलकाता सोडलं. ते कुठे गेले, कोणालाच माहीत नाही! परिणामी आता कोलकात्यात केवळ ४५ वारसदार सापडतात.

टिपू सुलतानला एकूण १२ मुलं होती. त्यातील ७ जणांना वारसदार नाही. इतर ५ पैकी मुनीरुद्दीन आणि गुलाम मोहम्मद या दोनच जणांचे वंशज सापडतात. मुनीरुद्दीनचे वंशज लहान-मोठे व्यापारी म्हणून उदरनिर्वाह करत आहेत तर गुलाम मोहम्मद यांचे वंशज नाल्याजवळ एका छोट्या घरात कसबसं आयुष्य काढतायेत.

मकबूल आलम नावाचे वंशज प्रिन्स अन्वर शाह रोडवरील पडायला आलेल्या लाल विटांच्या घरात राहतायत. हातावरचं पोट आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हॉल, लाकडी जिन्याच्या खालची जागा आणि घराभोवतीचा मोकळा परिसर मोटार मेकॅनिक्सला भाड्याने दिलाय.

“कशीही परिस्थिती असो, आम्हाला फक्त जगायचं आहे,”

असं मकबूल आलम म्हणतात.

मुनीरुद्दीन यांचे वंशज मोहम्मद हुसेन शाह यांनी सुरुवातीला रॉकेल डीलरशिप मिळवली. पुढे त्यांनी आपल्या घराच्या समोरील बाजूस मोटार गॅरेज सुरू केलं. त्याचा धाकटा भाऊ कपड्यांचं दुकान सांभाळतो.

मोहम्मद हुसेन शाह यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं होतं …

“टिपू सुलतानचे वंशज म्हणून त्यांची काही संपत्ती परत मिळवण्यासाठी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि न्यायालयाच्या खूप चकरा मारल्या होत्या. मात्र काहीच प्राप्त झालं नाही. उलट त्यांची तब्येत बिघडली. खटला चालवणं हे खर्चिक होतं आणि त्यात वेळ देखील जात होता. इथे खायचा प्रश्न असल्याने खटल्यासाठी खर्च करणं आणि तितका वेळ देणं शक्य नव्हतं. अखेर मी लढाई सोडली.”

गुलाम मोहम्मद यांनी १८७२ मध्ये प्रिन्स गुलाम मोहम्मद ट्रस्टची स्थापना केली होती. मात्र कितीही खटले आणि दावे दाखल केले तरी या ट्रस्टकडून टिपू सुलतान यांच्या सध्याच्या वंशजांना कोणतीही मदत मिळालेली नाही, असं मोहम्मद हुसेन शाह सांगतात.

सर्वात श्रीमंत मुस्लिम ट्रस्टपैकी एक मानल्या जाणाऱ्या या ट्रस्टच्या मालमत्तांमध्ये टॉलीगंज क्लब, टिपू सुलतान मशीद, रॉयल कलकत्ता गोल्फ क्लब, टॉलीगंज रेसकोर्स, शॉ वॉलेस इमारत, शाही मशीद, दोन दफनभूमी आणि जमिनीचे छोटे तुकडे यांचा समावेश आहे.

गुलाम मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर राजघराण्यातील सदस्यांनी वारसदार असल्याचा दावा करत लढा दिला होता. त्यानुसार १९४४ मध्येच कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमीर अली यांनी ट्रस्टचा कारभार सांभाळण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली होती. त्यावेळी गुलाम मोहम्मद यांचे पाचवे वारसदार हैदर अली यांना ट्रस्टचे पहिले प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं.

१९८३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत ते या पदावर होते.

ट्रस्टचा कारभार चालवण्यासाठी समिती स्थापन झाल्याने राजघराण्याचं महत्त्व कमी झालं. ट्रस्टचे प्रमुख देखील नाममात्र राहिले. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांवर त्यांचा ठोस अधिकार राहिला नाही. ट्रस्टचा दैनंदिन कारभार उच्च न्यायालयाने नेमलेल्या ट्रस्टीच्या हातात गेला. समिती सदस्यांमध्ये वाद झाला तर अशावेळी न्यायालयाकडे ट्रस्टचे अधिकार जायचं ठरलं.

हैदर अली यांच्यानंतर त्यांचा मुलगा आसिफ अली ट्रस्ट प्रमुख बनला. मात्र त्याने ट्रस्ट प्रमुख या नात्याने ट्रस्टची आर्थिक भरभराट करण्याची जबाबदारी नाकारली. त्याने जबाबदारी नाकारल्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे ट्रस्टवर मोहम्मद मोबीनुद्दीन या ट्रस्टीचा अधिकार वाढला आणि दुसरं म्हणजे आसिफ अलीच्या दोन सावत्र आई आणि त्यांच्या पाच मुलांची परिस्थिती दयनीय झाली.

हैदर अली यांच्या दोन्ही पत्नी झाहिदा बेगम आणि हमिदा बेगम यांना ट्रस्टकडून महिन्याला २५० ते ३०० रुपये मिळायचे, ते मिळणं बंद झालं. दुसरं काम त्या करू शकत नव्हत्या कारण ते ‘नवाब हैदर’ यांच्या पत्नी म्हणून शानच्या विरुद्ध होतं. ट्रस्टकडून मिळणारे पैसे हा त्यांच्या कमाईचा एकमेव स्रोत होता. 

दारिद्र्यामुळे त्यांना घरातील मौल्यवान वस्तू विकाव्या लागल्या. इतकंच काय त्यांच्या मुलांना शिक्षण देखील सोडावं लागलं कारण शाळेची फीस भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते.

हमिदा बेगम यांचा मोठा मुलगा अन्वर अली जेव्हा ट्रस्टी मोहम्मद मोबीनुद्दीन यांच्याकडे पैसे मागायला गेला तेव्हा त्याला हाकललं गेलं, मारहाण केली गेली, असं हमीदा बेगमने सांगितलं होतं.

मोहम्मद मोबीनुद्दीन यांचं म्हणणं होतं…

गुलाम मोहम्मद यांच्या विलमध्ये असं म्हटलं आहे की, पैसे ट्रस्ट प्रमुखाला मिळतील. त्यानुसार आसिफ अली यांना पैसे दिले जातात. १९८६ मध्ये १२०० वरून १८०० रुपयांची बढती करण्यात आली आहे. आता या महिला आणि त्यांच्या मुलांकडे बघण्याची जबाबदारी आसिफ अलीची आहे, ट्रस्टची नाही.  

त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे ट्रस्ट देखील कशी तरी टिकाव धरून आहे. ट्रस्टच्या सर्व मालमत्ता फार पूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी भाड्याने देण्यात आल्या होत्या. आधी ट्रस्टचं वार्षिक उत्पन्न केवळ ६५ हजार रुपये होतं, जे १९८६ मध्ये ३.७५ लाख झालं. मात्र उत्पन्न वाढल्याने धार्मिक आणि सामाजिक कामं देखील वाढवावी लागणार आहेत. कारण तसंच विलमध्ये नमूद आहे, असं मोहम्मद मोबीनुद्दीन यांनी सांगितलं.

अशाप्रकारे टिपू सुलतानचे सातवे वंशज प्रिन्स अन्वर अली सध्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात. काही पैसे वाचवून स्वतःची रिक्षा विकत घेणं त्यांचं स्वप्न आहे. कारण “मी दुसरं काहीही करू शकत नाही. कदाचित माझा धाकटा भाऊ, यालाही रिक्षा चालवावी लागेल” असं त्यांचं म्हणणं आहे.

भारतातील सर्वात प्रतिष्ठित राजघराण्यांपैकी एक असलेल्या टिपू सुलतानच्या घराण्याची ही अवस्था क्लेशकारक वाटते. पण हेच सत्य आहे, हे या वंशजांनी मान्य केलं आहे!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.