मराठवाड्याला नेमका काय शाप आहे?

राजीव सातव यांना श्रद्धांजली एकच असू शकते. मराठवाड्यातील नेत्यांनी भानावर येणे.

कॉंग्रेस पक्षाचे तरुण आणि अभ्यासू नेते राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकले. राजीव सातव यांचे दिल्लीतही वजन असल्याने देशभर त्यांच्या निधनाने ह्ळहळ व्यक्त होतेय.

मराठवाडा पोरका झाला असा सगळ्याच लोकांचा सूर आहे.

मराठवाड्यातलं एखादं नेतृत्व चमक दाखवत असतानाच नियतीने हिरावून नेण्याची ही पाचवी सहावी घटना. त्यातली ठळक माणसं म्हणजे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख. या तिघांच्या निधनाने मराठवाड्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातही अगदी मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचं निधन हे मराठवाड्यासाठी जास्त नुकसानकारक होतं.

कारण या दोन्ही नेत्यांच राजकारण हे नेहमी मराठवाड्याच्या हितासाठी होतं. त्यांच्यानंतरच्या पिढीत राजीव सातव यांच्यासारखी मंडळी होती. राजीव सातव सातत्याने दिल्लीत रमलेले असले तरी त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. मोदी लाटेत निवडून येणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. ती त्यांनी साध्य केली होती. राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांची ख्याती होती.

पत्रकार, कार्यकर्ते आणी नेते यांच्या सहजपणे आणि साधेपणाने सम्पर्कात असणारे नेते ही त्यांची ओळख होती. आणि एक दिवस दिल्लीत हा माणूस खूप महत्वाच्या पदावर असणार याची विरोधकांनाही खात्री होती. पण आता असं काही होणार नाही. आणखी एक मराठवाडी नेता डाव अर्ध्यावर टाकून गेला.

ही सगळी उदाहरण झाली ती नियतीने हिरावून नेलेल्या लोकांची. त्यात त्यांचा दोष नाही. पण मराठवाड्याला फक्त एवढाच शाप नाही. 

मराठवाड्याला संधी मिळाली तरी सोनं करता आलेलं नाही. एकट्या मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पाण्यासाठी केलेलं काम पुन्हा कुणाला करता आलेलं नाही यातच सगळं आलं. अगदी राजीव सातव दिल्लीत राजकारण करत असले तरी मराठवाड्यातल्या तरुण कार्यकर्त्यांच्या ते सम्पर्कात होते. त्यांना भेटता येणं शक्य होतं.

पण याआधी दिल्लीत राजकारण करणारे किती मराठवाड्यातले लोक असे जनसंपर्क राखून होते? शिवराज पाटील चाकूरकर यांनी देशाचं गृहमंत्रीपदही सांभाळलं. पण त्याचा मराठवाड्याला कितपत फायदा झाला? दिल्लीतल्या एवढ्या वजनदार नेत्याचा मतदारसंघाला किती फायदा झाला? 

शिवाजीराव पाटील निलंगेकरसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री होते. अंकुशराव टोपे, केशरकाकू क्षीरसागर, सूर्यकांता पाटील, बाळासाहेब पवार, साहेबराव पाटील डोणगावकर यांच्याकडे महत्वाची पदं होती. पण त्यांना आपल्या मतदारसंघाबाहेर प्रभाव निर्माण करता आला नाही.

अशाच खूप आमदार खासदारांची मोठी यादी आहे. त्यातही खूप लोकांची कामगिरी तर त्यांचा एक कारखाना आहे किंवा होता अशीच राहिली. 

मराठवाड्यातल्या नेतृत्वापैकी सध्या सगळ्यात जास्त संधी मिळालेले नेतृत्व म्हणजे अशोक चव्हाण. पण अशोक चव्हाण नाराज आहेत अशीच एकूण अवस्था असते. भले त्यांची पक्ष नेतृत्वावर नाराजी असेल किंवा आणखी काही असेल. पण महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या या नेत्याला आता नांदेड बाहेरही प्रभाव राखता येऊ नये ही चिंताजनक गोष्ट आहे.

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे एवढ मंत्रीपद आणी सातत्याने पद मिळवूनही औरंगाबादच्या बाहेर आपला दबदबा निर्माण करू शकले नाहीत. भाजपचे रावसाहेब दानवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. केंद्रात मंत्री आहेत. पण त्यांनाही जालन्याच्या बाहेर आपली जादू दाखवता येत नाही. त्यांची गमतीशीर भाषणं महाराष्ट्रभर व्हायरल होत असतील. पण त्यांचं कर्तृत्व व्हायरल होणं अपेक्षित आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.  पण त्यांच्याकडून मराठवाड्याच्या विकासाच्या घडीवर काम अपेक्षित आहे. एकमेकांवरील कुरघोडीपेक्षा. लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांनाही गटबाजीपलीकडे जावे लागेल. जयदत्त क्षीरसागर यांना कधीतरी मराठवाड्याच्या नेतृत्वाचा ध्यास होता की नाही ठाऊक नाही. आधी घरच्यांसाठी घरात सत्ता ठेवण्यात आणि आता घरच्याच माणसाच्या विरोधात उरलेल्या घरात सत्ता ठेवण्यात त्यांचा वेळ जातोय. परभणीमध्ये खूप बदल झालेत. नवे नेते आलेत.

पण मराठवाडा पातळीवर नाव गाजवण्यात अजून यश आलेलं नाही. शिवाजीराव पंडीत यांचे वारस गेवराई सोडून बीडमध्ये राहतात. मात्र त्यांचं राजकारण अजूनही गेवराईत अडकून पडलय. एकेकाळी रजनीताई पाटील यांचं दिल्लीत वजन होतं. पण त्याचा मराठवाडा सोडा बीडला सुद्धा फारसा फायदा झाला नाही. रजनीताई पाटील यांचे पती अशोकराव पाटील मंत्री होते. 

मराठवाड्याच्या नेतृत्वाला आजकाल आपला जिल्हा ओलांडणे सुद्धा अवघड झालेय. विलासराव देशमुख हे कॉंग्रेसचे खऱ्या अर्थाने स्टार प्रचारक होते. महाराष्ट्रात त्यांच्या सभेला मागणी असायची. पण अमित देशमुख मात्र अजूनही लातूर बाहेर प्रभाव निर्माण करू शकले नाहीत. असं का घडतय?

मराठवाड्यातल्या कोणत्या प्रश्नावर हे सगळे नेते एकत्र आले होते आठवतय का?

मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्ये पासून दुष्काळापर्यंत या सगळ्यांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांची नोंद आहे का? मराठवाड्यात उद्योग येत नाहीत, फारसे नवीन उद्योग निर्माण होत नाहीत यासाठी यांनी काय पावलं उचललेली आहेत? विलासराव सातत्याने मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा पाठपुरावा करायचे. आज असे किती नेते आहेत? बबनराव लोणीकर विरोधात असताना सिंचन प्रश्नावर खूप बोलायचे. पण मंत्री झाल्यावर ते जे शांत झाले ते आजही शांत आहेत.

एखाद्या वादग्रस्त गोष्टीत फक्त बातमी येते. पाशा पटेल पण अचानक शांत झाले. बरं हे सगळं कुणाच्या विरोधामुळे झालं असं नाही. एकट्या पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न त्यांच्या पक्षाने केले हे सगळ्यांना माहित आहे. पण बाकीच्यांचे काय? त्यांना कुणी अडवले आहे?

अपक्ष असताना बच्चू कडू यांच्यासारखा आमदार जे करू शकतो ते पक्षाचे पाठबळ असताना मराठवाड्यातले आमदार का करू शकत नाहीत?  

विदर्भात नितीन गडकरी यांनी जी विकासकामे केली ती मराठवाड्यात करायला रावसाहेब दानवे यांना कुणी अडवले आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या तोंडातले घास विदर्भात नेले तेंव्हा मराठवाड्यातले नेते झोपले होते काय? जो तो आपल्या भागाचा विकास करणार. पण मराठवाड्याच्या नेत्यांनी काय फक्त स्वतःचा विकास करायचा का?

पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचं अनुकरण करा अशी मराठवाड्यातल्या जनतेची मागणी होती. पण याचा अर्थ फक्त त्यांच्यासारख्या जमिनी आणि गाड्या घ्या असा नव्हता. त्यांच्यासारखे उद्योग आणा. कारखाने आणा असाही होता.

जे काम शरद पवार बारामतीसाठी करू शकतात, आर आर पाटील, जयंत पाटील सांगलीत करू शकतात, विखे त्यांच्या मतदारसंघात करू शकतात ते, बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघात करू शकतात ते काम मराठवाड्यातल्या कुठल्या नेत्याने आपल्या मतदारसंघात केलेय? कोरोनाच्या काळात जे काम नगरमध्ये लंके यांच्यासारखा साधा आमदार उभे करू शकतो ते मराठवाड्यात किती आमदारांनी केलय? कित्येक आमदारांचे निधीसुद्धा पोचले नव्हते कोरोनासाठी.

पश्चिम महाराष्ट्र सोडा मराठवाडा विदर्भापेक्षाही मागास आहे रस्त्यांच्या बाबतीत. ही परिस्थिती कुणामुळे आहे? आज पश्चिम महाराष्ट्राचे म्हणावेत असे कित्येक नेते आहेत. विदर्भाचे नेते आहेत. मराठवाड्याचा नेता कोण आहे? ज्याला संपूर्ण मराठवाड्यात कार्यकर्ते आहेत, ज्याचं संपूर्ण मराठवाड्यात काम आहे असा नेता कोण आहे? असा नेता नसेल तर हा कुणाचा शाप आहे?

राजीव सातव यांच्यासारखी प्रचंड उज्वल भविष्यकाळ असणारी माणसं कमी  वयात जातात तेंव्हा प्रचंड दुखः होतं. संपूर्ण मराठवाड्याला हळहळ वाटावी अशी ही घटना आहे. विलासराव देशमुख दिल्लीत आपलं कर्तृत्व सिध्द करत असताना वारले. गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या कामाला प्रचंड वास असलेल खातं मिळालं होतं. आणि ते नक्कीच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले असते. पण यापैकी काही घडू शकलं नाही त्या अपघाताने. प्रमोद महाजन पंतप्रधानपदाचे दावेदार होते यात शंका नव्हती. पण तेही अचानक निघून गेले.

आणि आता राजीव सातव. हा नियतीचा क्रूर खेळ आहे. पण मराठवाड्याच्या फक्त एवढ्याच नेत्यांना मोठ्या संधी मिळाल्या का?   

संधी खूप लोकांना मिळाल्या. मिळताहेत. पण मराठवाड्याचा अपेक्षाभंग जास्त होत गेला. दुर्दैवाने राजीव सातव यांच्यासारखी काही कर्तृत्ववान माणसं आपल्यात नाहीत. पण त्यांना खरी श्रद्धांजली काय असेल?

आपल्या वाढदिवशी शेतकऱ्यासाठी दिल्लीत उपोषणाला बसलेल्या राजीव सातव यांना श्रद्धांजली एकच असू शकते.

मराठवाड्यातील नेत्यांनी भानावर येणे. मुंबईत आणि दिल्लीत आपलं वजन आपल्यासाठी नाही तर आपल्या भागासाठी वापरणे. ज्या सुसंस्कृतपणे सातव बोलायचे, ज्या वाचनाच्या बळावर त्यांनी आपली अभ्यासू प्रतिमा बनवली त्या गोष्टींचे भान ठेवणे.

सातव यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या तरुणाने मनापासून ठरवले तर खूप काही होऊ शकते. पण ठरवूनही मराठवाड्यातले इतर नेते काम करत नाहीत त्याचे काय?  मराठवाड्याला नियतीचा नाही नेत्यांच्या निष्क्रियतेचा शाप आहे. 

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. मिस्टर अश्वत्थामा says

    मा. आमदार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाटबंधारे विभाग सोपवावा अशी मराठवाड्यातील बऱ्याच लोकांची इच्छा आहे. दर्जेदार काम करणारा मराठवाड्यातील धडाडीचा आमदार आहे तो असही लोक म्हणतात.

  2. Vis says

    लोणीकर नि मनत्री असताना खोऱ्याने पौसा ओढलाय म्हणून गप्प बसलाय

Leave A Reply

Your email address will not be published.