तरिही सायकल चालली पाहीजे – अरविंद जोशी.

 

लहान होतो तेव्हा शेजारच्यांकडे लँडलाईन टेलिफोन घेतला म्हणून सलग २ दिवस रडत होतो. घरात कुणीच दखल घेतली नाही. नंतर आमचे फोन शेजारच्यांकडे यायला लागले तेव्हा सुद्धा तिकडे जायला लाज वाटायची. शाळेत असताना काही मुलांना कुठलेच  शिक्षक मारत कसे नाहीत हे कळायचं नाही. तेव्हा त्यांच्यात काही तरी खुस्पट काढून मजा घ्यायचो. कॉलेजला  जायला लागल्यानंतर मात्र आपल्याला आता कळायला लागलं असं ठाम जागतिक मत झालं होतं. पण तिथेही काहीच मुलं होती ज्यांच्या मागेपुढे ललनांचा कळप चरत असायचा. मग त्याचे कार्यकारणभाव ‘कळायला’ लागले. अरे त्याच्याकडे करिझ्मा आहे, पल्सर 200 आहे, नोकिया N73 आहे म्हणून त्याच्या आयुष्यात हिरवळ आहे. ही अशी कारणं कायम समाधान देऊन जातात. वस्तू आणि मालकी हक्क या तेव्हा कळालेल्या संकल्पना. हा मालकी हक्क मिळवण्यासाठी कॉलेजमधून बाहेर आल्यावर नुसती मरमर चालू केली. म्हणून आतापर्यंत तर “जग क्रूर आहे”, “दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहीये” टाइप तत्वज्ञान मेंदूत गोंदलं गेलं आहे. मारा नाही तं मराल. Animal kingdom.

माझी आजी लहानपणी सांगायची. जगात चांगुलपणा शिल्लक राहणार नाही, कारण समोरचा माणूस चांगला वागु शकतो यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. नशिब तिने फेसबुक-व्हाट्सएपचं सर्वभक्षी जग पाहिलं नाही. तरी पण प्रश्न उरतोच की हा या काळाचाच दोष असावा का? “सायकल”ची कथा १९५० च्या दशकात घडते. या मागेही अशी कथा, असे लोक, असा चांगुलपणा आता असूच शकत नाही असा दिग्दर्शकाचा आणि प्रेक्षकांचा एक अलिखित suspension of disbelief चा करार झाल्यासारखा आहे. आपण इसापनीती, पंचतंत्र, साने गुरुजींच्या गोष्टी वाचलेल्या असतात. “सायकल”ची जातकुळी तीच आहे. आता आपला जगाकडे पहायचा एक अँगल तयार झालेला असतो त्यात ह्या नितीकथा कुठेच बसत नसतात. म्हणून साने गुरुजी ‘रडके’ आणि ‘बोरिंग’ वाटणाऱ्या माणसाला ‘सायकल’ बिलकुल आवडणार नाही.

‘सायकल’चं स्वतःचं एक स्वतंत्र परिकथेसारखं विश्व आहे ज्यात कुणीच वाईट (absolute evil) नाही. ‘केशव भटजी’ (ऋषिकेश जोशी) आणि त्यांची सायकल चोरणारे दोन चोर (भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव) यांच्या परस्परविरुद्ध दिशेच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. कोणत्याही नितीकथेप्रमाणे हा प्रवास दोन्हीकडून काहीतरी एका मूल्यशोधनाचा प्रवास होतो. कुणाला काय मूल्य सापडतं, हे आपल्याला आधीच ठाऊक असतं. आपण खूप आधीपासून अशा गोष्टी ऐकलेल्या असतात. पण त्या मूल्यांचा ‘बाजारभाव’ आपण ‘कवडीमोल’ केल्याने त्यांना फुटकळ आणि अवास्तव म्हणूच शकतो. हा ज्याच्या त्याच्या मूल्यांचा सवाल आहे. बाकी कथा सांगण्यात पॉईंट नाही, कारण अशा गोष्टी आजीकडूनच ऐकलेल्या बऱ्या नाहीत का?

‘सायकल’च्या या अवास्तव परिप्रेक्ष्यात दोनच पर्याय शिल्लक राहतात. एक तर मूल्यव्यवस्था स्वीकारून आपलं आताचं जगच किती हरामी आहे म्हणून हात वर करावे. नाहीतर सरळ भंकस म्हणून सर्व मोडीत काढावे. “जिस कवी की कल्पना मे जिंदगी हो प्रेमगीत उस कवी को आज तुम नकार दो” असं आपलं सांगून झालेलंच आहे. तिसरा पर्याय त्या मूल्यव्यवस्थेच्या सर्वकालीक सत्याचा आहे. गांधींची एकादश व्रते,अहिंसा,सत्य,अस्तेय वगैरे आता किती उपयोगी? किती खरी? आणि का? याचा निकाल लावायला पाहिजे. ज्या प्रभावातून गांधी ही व्रते सांगतात, त्याच जैन तत्वज्ञानामधल्या ‘अपरिग्रह’ (म्हणजे वस्तूंचा संग्रह न करणे) हे मूल्य सायकलमध्ये केंद्रस्थानी आहे. वस्तूमुळे माणूस मोठा की माणसामुळे वस्तू? N73 होता म्हणून एखादा मूलगा आकर्षक वाटू शकतो असा समज कायम टिकवणाऱ्या जगात हे सवालच फुसके वाटतात. वस्तूंच्या, जागांच्या, तेलाच्या मालकी हक्कातून उद्भवलेली युद्धं जगाने भोगली आहेत. तरी अजूनही अपरिग्रह हे टाकाऊ मूल्य आहे. तसाच ‘सायकल’ टाकाऊ असू शकेल.

भविष्याची चाहूल घेऊन कोणीच जन्माला येत नाही, आपलं आपल्याला सर्व कळत असतं तरी ‘काहीतरी होईलच तू प्रयत्न सोडू नको” अशी किल्ली फिरवलेली प्रत्येकाला पाहिजे असते. हा खरा सामान्य माणसाचा प्रयत्नवाद आहे. तार्किक चळवळींमुळे कुंडली बघणं अजून तरी सुटलेलं नाही. पण त्याचा उद्देश फक्त प्रयत्नमार्गी होण्यापुरता ठेवणारा केशव भटजी खरा तार्किक वाटतो. पूर्ण चित्रपट ब्राह्मणी वाटण्याचा मोठा धोका आहे. शेवटी मूल्यव्यवस्थेचे ही मालकी हक्क शोधले जाऊ शकतात. नेमाडेंनी साने गुरुजींच्या साहित्याचं ‘देशीवादी’ म्हणून पुनरुज्जीवन केलं होतं. सायकल हा बऱ्याच अंशी देशीवादी वाटू शकतो. मूल्यव्यवस्थेसाठी गाव कसं आठवतं सर्वांना? शहरं ही मालकी हक्कांच्या स्पर्धेची कृष्णविवरे झालेली आहेत का? ‘सायकल’च्या काळाचा जसा मुद्दा आहे तसाच स्थळाचा. त्याचं कोकणातलं दूरदूर पसरलेल्या वाड्यांमधलं सेटिंग पुन्हा suspension of disbelief चा तात्पुरता मुलामा लावून हा मुद्दा सोडवतं.

बाकी अभिनय सर्वांचाच चांगलाय. अम्लेन्दु चौधरीच्या मी सध्या प्रेमात पडलेलो असल्याने छायाचित्रणाविषयी बोलायलाच नको. सिनेमातली खूपशी प्रतिकं अवास्तव वाटू शकतात. शेवटी हा स्वीकाराचा भाग आहे. चित्रपट पहावाच असा नाही. तसंही चित्रपट हे काही कायमस्वरूपी बदलाचं मध्यम नाही. पाहिला आणि खिल्ली उडवली तरी हरकत नाही. पण पाहून काहीच न बोलणं हे आपल्या सेफ साईड धुर्तपणाचं लक्षण ठरू शकेल.