सिरीयल किलरची खून करण्याची विकृत पद्धत पाहून त्याला सायनाईड मोहन नाव देण्यात आलं होतं…
आजचा किस्सा आहे सायनाईड मोहनचा. आपल्या विकृत डोक्याने त्याने घडवून आणलेलं हत्याकांड सगळ्या देशाला हादरवून ठेवणारं होतं. पोलिसांनी ज्यावेळी या हत्याकांडाचा शोध घ्यायला सुरवात केली तेव्हा त्याची विकृत मानसिकता बघून पोलिससुद्धा चक्रावून गेले होते. जाणून घेऊया या सायनाईड मोहनने केलेलं हत्याकांड.
सायनाईड मोहनचं पूर्ण नाव होतं मोहन कुमार विवेकानंद. कर्नाटकमधले १९६३ साली त्याचा जन्म झाला. व्यवसायाने मोहन कुमार एक शिक्षक होता आणि कर्नाटकमधल्या एका शाळेत तो विद्यार्थ्यांना शिकवायचा. तो प्रामुख्याने फिजिकल एज्युकेशनचा शिक्षक होता आणि त्याला सायन्सबद्दलसुद्धा चांगलं नॉलेज होतं.
इतकं सगळं उत्तम असूनसुद्धा त्याने विकृतीचा मार्ग धरला होता. तो गरीब घरातल्या मुलींना हेरायचा. यात अशा घरातल्या मुलींचा समावेश असायचा ज्या लग्नात हुंडा द्यायला सक्षम नव्हत्या किंवा नवऱ्याने टाकलेल्या महिला असायच्या. पहिल्यांदा अशा मुलींना सहानुभूती देऊन मोहन कुमार त्यांचा विश्वास मिळवायचा. नंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा.
ज्या ज्या महिलांना तो जाळ्यात ओढायचा त्यांना लग्नाचं आश्वासन द्यायचा आणि मीही तुमच्याच जातीचा आहे म्हणून जवळीक साधायचा. सरकारी नोकरीत असल्याचं सांगितल्यावर या भाबड्या मुली त्याला बळी पडत असे आणि लग्नाला तयार होत असे.
सायनाईड मोहनने २००३ पासून ते २००९ पर्यंत सेम याच पद्धतीने तब्बल २० महिलांची हत्या केली होती. सायनाईड मोहनच्या गुन्ह्यांची उकल तेव्हा झाली जेव्हा त्याने कर्नाटकमध्ये २००९ साली पुतुर या गावातील अनिता नावाच्या मुलीची हत्या केली होती. या घटनेत मोहनने त्याच नाव आनंद असं सांगितलं होतं. त्याच्या ठराविक पॅटर्न ला ती मुलगी बळी पडली होती.
त्याला पोलिसांनी कस पकडलं याची स्टोरी सिनेमाच्या कथेला सुद्धा लाजवेल इतकी जबरदस्त आहे. कर्नाटकच्या पुतुर गावाची अनिता नावाची मुलगी. मोहन कुमारने तिच्यावर पाळत ठेवली आणि तिला जाळ्यात ओढलं. दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. २००९ ,मध्ये हसन जिल्ह्याच्या बस स्टॅन्डवर येऊन ते थांबले.
तिथं त्यांनी शेजारच्या हॉटेलात मुक्काम केला. मोहनने तिला सांगितलं कि उद्या आपण मंदिरात जाऊन लग्न करणार आहोत. अनिता गरीब घरातली होती पण तिला एव्हडं तर नक्कीच माहिती होतं कि लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं गैर असतं. पण मोहनच्या भावनिक गोष्टीतून ती सुटू शकली नाही आणि नाईलाजाने तिला संबंध ठेवावे लागले.
दुसऱ्या दिवशी मोहनने तिला सांगितलं कि बस स्टॅन्डवर येऊन थांब मी मंदिराचं नियोजन बघतो. बसस्टँड वर अनिता सजून धजून मोहनची वाट पाहत बसली होती. मोहनने तिला गर्भनिरोधकाची गोळी दिली आणि सांगितलं कि हे खा म्हणजे पुढे अडचणी नको. ती शेजारच्या स्वच्छतागृहात ती गोळी खायला गेली आणि गोळी खाल्यावर काही वेळ गेला असेल ती बाहेरच आली नाही.
मोहनने तिला सायनाईडची गोळी दिली होती. अनिता तिथेच कोसळली. पोलिसांनी येऊन चौकशी केली.इकडे मोहनने हॉटेलात येऊन तिच्या सामानाची चौकशी केली आणि तो गायब झाला. अनिताच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांचा शोध सुरु झाला.
२००३ पासून पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आढळून आलं कि अशा २० महिलांची हत्या सारख्याच पद्धतीने झाली आहे. सजून धजून आलेल्या महिलांचा मृत्यू बस स्टँडच्या परिसरात सायनाईडच्या गोळ्यांनी झाला आहे. यामागे एकच माणूस असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चक्रे फिरवली आणि सायनाईड मोहनचा शोध घेतला.
मंगळुरु नामक गावात मोहनच्या पुतण्याच्या मोबाइलवर अनिताने कॉल केलेला होता, माग काढत काढत मोहनच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच सायनाईड मोहनने सगळं कबूल केलं. दागिने पॉलिश करण्यासाठी तो दुकानदाराकडून सायनाईड खरेदी करायचा आणि महिलांना भुलवून तो त्यांचा जीव घ्यायचा. दरवेळी वेगळं नाव तो महिलांना सांगायचा.
फक्त खूनच नाही तर इतर बँक घोटाळ्यांमध्येही सायनाईड मोहनचा हात होता. न्यायालयात त्याच्यावर बरेच आरोप लावण्यात आले. २०१३ मध्ये लाखो रुपयांचा दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा सायनाईड मोहनला देण्यात आली होती. सिरीयल किलर सायनाईड मोहन हे प्रकरण त्यावेळी देश हादरवून टाकणारं ठरलं होतं.
हे हि वाच भिडू :
- ज्याचं डोकं जास्त चालायचं त्याचा मेंदू काढून घेणारा सिरीयल किलर….
- सिरीयलप्रमाणे आपल्या आईवडिलांचा खून करून त्यांना सिगरेटचे चटके देणारा सायको किलर.
- सायनाइड किलर : पोलीसांच्या मते केम्पम्माने सायनाइड वापरून २० हून अधिक खून केले
- आजही सदगुरुंवर त्यांच्या पत्नीचा खून केल्याचे आरोप होत असतात.