पुनावालांनी ८ वर्षांपूर्वी ७५० कोटींना घर घेतलं, पण गृहप्रवेश सरकार दरबारी अडकलाय…

सायरस पुनावाला हे नाव तुम्ही सगळ्यात जास्त कधी वाचलं किंवा ऐकलं असेल, तर लॉकडाऊनच्या काळात. एकतर तेव्हा सगळ्यांचं लक्ष लस कधी येणार या गोष्टीवर होतं आणि लस बनत होती, पूनावालांच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये. जशी लस बाजारात आली, तशा पुनावालांची प्रॉपर्टी किती, त्यांचा पुण्यातला बंगला पाहिला का, त्यांच्या गाड्या कुठल्या आहेत अशा बातम्याही आल्या. काही महिने चर्चा रंगल्या आणि नंतर थंडही झाल्या. पण लस आणि लॉकडाऊनच्या आधी सायरस पुनावाला चर्चेत आले होते, ते एका खरेदीमुळे आणि ही खरेदी होती ७५० कोटी रुपयांची.

२०१५ मध्ये एक बातमी आली होती की, सायरस पूनावालांनी मुंबईत ७५० कोटींचं घर घेतलं. आपण तेव्हाही फोटो बघूनच समाधान मानलं होतं, पण फोटो बघितल्यावर एक गोष्ट डोक्यात आली, की हे घर नाही हा आहे महाल, तेही ऐन मुंबईत.

आधी या घराचा इतिहास बघू…

या घराचं नाव लिंकन हाऊस. ब्रीच कँडी भागात दोन एकर परिसरात असलेलं ५० हजार स्क्वेअर फूटचं घर. सरकारच्या हेरिटेज यादीत या घराला ग्रेड थ्री दर्जा दिलेला आहे. ग्रेड थ्री दर्जा अशा इमारतींना दिला जातो, ज्या शहराच्या स्थापत्यशास्त्रासोबतच, सामाजिक वारसाही सांगतात.

मग लिंकन हाऊसला सामाजिक वारसा कुठला आहे ? तर महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वीचा आणि अमेरिका-भारत नात्याचा.

तत्कालीन वांकानेर राज्य मुंबईपर्यंत पसरलेलं होतं. या साम्राज्याचे शेवटचे राजे महाराणा अमरसिंह जाला यांनी मुंबईत हे घर बांधलं. ते गुजरातमधून मुंबईत आले की राहण्यासाठी या घराचा वापर करायचे. वांकानेरच्या महाराजांनी हे घर बांधल्यानं त्याला नावही, वांकानेर हाऊस असं मिळालं.

पण १९५७ मध्ये वांकानेर साम्राज्यापुढं टॅक्स भरण्याचा प्रश्न उभा राहिला, तेव्हा महाराणा अमरसिंह यांनी निर्णय घेतला वांकानेर हाऊस लीज वर देण्याचा. त्यांनी अमेरिकन सरकारला ९९९ वर्षांच्या लीजवर वांकानेर हाऊस दिलं. अमेरिकन लोकांनी या घरात आपला दूतावास सेटअप केला आणि घराचं नाव बदलून ठेवलं लिंकन हाऊस.

१९५७ पासून २०११ पर्यंत अमेरिकन दूतावास याच लिंकन हाऊसमध्ये होता. मात्र २०११ मध्ये त्यांनी लिंकन हाऊसमधून बांद्रा कुर्ला हाऊसमध्ये आपला कारभार हलवला. साहजिकच लिंकन हाऊस रिकामं पडलं, पण याचा मालकी हक्क अमेरिकन सरकारकडे होता.

त्यांनी लिंकन हाऊस विकायचा निर्णय घेतला, मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या जागेसाठी साहजिकच आकडाही मोठा येणार होता. सुरूवातीला ८५० कोटींमध्ये लिंकन हाऊस विकलं जाईल अशी चर्चा होती. पण सायरस पुनावालांनी २०१५ मध्ये ७५० कोटींचं डील करत हे घर विकत घेतलं. मुंबईतला सगळ्यात मोठा रियल इस्टेस्ट व्यवहार म्हणून हे डील ओळखलं गेलं.

पूनावालांनी हे घर घेतलं होतं, ते विकेंडला आपल्या कुटुंबाला राहण्यासाठी.

पण ८ वर्ष झाली तरी यांना या घराचा ताबा मिळालेला नाही, याचं कारण काय ?

तर लिंकन हाऊसची ही जमीन संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संपदा विभागाच्या अखत्यारीत येते. या विभागानं डीलसाठी भाडेपट्टीचे अधिकार हस्तांतरित करणं गरजेचं आहे. संरक्षण विभागानं या डीलवर आक्षेप घेतला होता, तेव्हा सांगण्यात आलं होतं की २० दिवसांच्या आत विक्रीची नोटीस आणि प्रॉपर्टीचा वापर बंद करण्यासाठी गरजेचं असताना तसं झालं नाही. तर महाराष्ट्र सरकारनंही ही जमीन आपली असल्याचा दावा केला होता.

पण फक्त इतकंच नाही, तर अमेरिका आणि भारताच्या राजकीय संबंधातही या डीलमुळे तणाव आला होता.

२०१५ मध्ये ७५० कोटींना घेण्यात आलेल्या या बंगल्याची आजची किंमत ९८७ कोटींच्या जवळपास आहे. मात्र तरीही घराचा ताबा सायरस पूनावालांना मिळालेला नाही.

याबद्दल सायरस पुनावालांचं म्हणणं आहे की, ‘एवढी मोठी रक्कम अमेरिकन सरकारच्या तिजोरीत जाऊ नये, म्हणून सरकारनं या डीलवर होल्ड आणला आहे. हा एक राजकीय आणि सामाजिक निर्णय आहे, असं मला वाटतं.’

थोडक्यात काय तर अमेरिका-भारत सरकारमधला वाद, महाराष्ट्र सरकार आणि सुरक्षा मंत्रालयाचे दावे या सगळ्यात पूनावालांचा गृहप्रवेश तेवढा अडलाय…

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.