सलग ४ वेळा आमदार, मंत्री राहिलेला हा नेता मंत्रीपद जाताच हातात साधी वळकटी घेवून गेला
चाळीसगावचे डी.डी.चव्हाण. खादीचा राखाडी रंगाचा बिनइस्त्रीचा कोट, खानदेशी वळणाचे चापूनचोपून नेसलेले धोतर, पायात चपला आणि डोक्यावर गांधी टोपी आणि तोंडात कायम एक आवडीच वाक्य,
“हाय काय अन नाय काय !!”
सलग ४ वेळा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार. पण साधेपणा एवढा की लोकांना सांगाव लागायचं की हे साहेब राजकारणी आहेत. कधीही पाहिलं तर लोकांच्या घोळक्यात उभ राहून त्यांचे प्रश्न समजून घेणारे डीडी चव्हाण लोकांच्यातीलच एक होते.
हाताशी कोणता साखर कारखाना नाही की कुठली शैक्षणिक संस्था सहकारी संस्था नाही.
स्वच्छ पारदर्शी कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढवायची आणि निवडून यायचं. करड्या शिस्तीच्या शंकरराव चव्हाणांचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. विधानसभेत प्रश्न विचारायला उभे राहिले की भल्याभल्यांना घाम फुटायचा,
आमदार असतानाही अधिवेशनाला जाताना चाळीसगावातून सतरंजीची वळकटी काखोटीला मारून चार दिवस पुरेल एवढ्या दुधाच्या दशम्या आणि दह्यातले पिठले घरातूनच बांधून रेल्वेने निघायचे आणि थेट मुंबई व्हीटी स्टेशनला उतरायचे. मुंबईच्या चमकदार दुनियेत त्यांचं मन कधी जास्त रमलच नाही.
एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर उशिरा का होईना त्यांना मंत्रीपद मिळाले. तेही त्यांना साजेसे,
“परिवहन मंत्री”
पण डीडी चव्हाणांना हे मंत्रीपद देखील हाय काय अन नाय काय असेच होते. काही जण त्यांना हिणवायचे की शंकरराव चव्हाणांचा माणूस म्हणून तुम्हाला मंत्रीपद मिळाले आहे. डीडी चव्हानांच त्यालाही उत्तर हाय काय अन नाय काय हेच असायचे. कधी राग त्यांना स्पर्श करूनही जायचा नाही.
त्यांच्या अजातशत्रू स्वभावामुळे राजकारणात असूनही त्यांचे शत्रू कमी आणि दोस्त जास्त अशी स्थिती होती.
मंत्रीपदाच आपलं काम मात्र चोखपणे केलं. परिवहन खात्यात सुसूत्रता आणली, अनेक बदल केले. चाळीसगावमध्ये त्यांच्याच प्रयत्नातून भव्य बस स्टँड उभे राहिले.
पण तो काळ म्हणजे राजकीय अस्थिरतेचा काळ होता. इंदिरा गांधीच्या हातात सगळी सत्ता होती आणि त्या दिल्लीत बसून राज्यातल मंत्रीमंडळ ठरवायच्या. सगळ्या मंत्र्याच्या डोक्यावर तलवार कायम टांगती असायची. एकदा याबद्दल पत्रकारांनी त्यांना छेडल देखील. तेव्हा कोणतेही छक्केपंजे न करता हा माणूस सरळ म्हणाला,
“आता या घडीला माझ्या खात्याचं असं चालल आहे. उद्याच कसं सांगायचं? हल्ली मन्त्रीपदचं औटघटकेच झालं आहे.”
आणि खरच तो दिवस आला. दिल्लीतून मंत्रीमंडळ कपातीची लिस्ट आली त्यात डीडी चव्हाणांच नाव होतं.
मंत्रीपद गेल्यावर लगेच त्यांनी आपली लाल दिव्याची गाडी सोडली. सतरंजीतील वळकटी, पाण्याचा तांब्या आणि छत्री एवढाच त्यांचा संसार होता. तो त्यांनी गुंडाळला. टॅक्सी पकडली ते थेट व्हीटी स्टेशनला आले. तिथे प्लॅटफॉर्मवर चाळीसगावला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होते तेव्हा कुठल्यातरी पत्रकाराने त्यांचा हातात वळकटी घेतलेला फोटो काढला.
दुसऱ्या दिवशी मुंबईच्या एका नामवंत वर्तमानपत्रात काल मंत्री असलेल्या आणि आज नसलेल्या डीडी चव्हाणांचा तो फोटो छापून देखील आला. त्याखाली कॅप्शन म्हणून त्यांच्याच बोलीभाषेतील एक ओळ छापलेली,
“हाय काय अन नाय काय?” सगळेच सारखे मानणारा नेता.
हा किस्सा जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी आपल्या लौकिक या पुस्तकात सांगितला आहे.
हे ही वाच भिडू.
- शंकरराव चव्हाणांच्या हातात, ये तेरा हसीन चेहरा लिहीलेली चिठ्ठी पडते आणि..
- फक्त ९ दिवस मुख्यमंत्रीपदावर राहून अगदी आनंदात पायउतार झालेला मुख्यमंत्री..!
- कालचा मुख्यमंत्री मुंबईत स्वतःचं साध एक घर घेऊ शकला नाही ही त्याकाळची वस्तुस्थिती होती.