चकमकीत पोलिसांच्या १९ गोळ्या खाऊनही डी के राव जिवंत राहिला होता…..
मुंबई पोलीस ज्याच्या मागे हात धुवून लागतात त्याला शेवटपर्यंत सोडत नाही असं म्हटलं जातं. ९० च्या दशकात मुंबईत वाढलेली गुन्हेगारी बघून मुंबई पोलिसांनी कायदा हातात घेऊन सुरु केलेल्या चकमकींमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. वीस वर्षात मुंबई पोलिसांनी १५०० गुंड पोलीस चकमकीत मारले होते, पण या १५०० पैकी एकजण वाचला होता.
पोलीस चकमकीतून वाचलेला तो गुंड होता डी के राव. एकदा नव्हे तर दोन वेळा डी के राव पोलीस चकमकीतून वाचला. पहिली चकमक ही एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात झाली होती.
तर दुसरी पोलीस चकमक विशेष होती कारण एका निष्णात पोलीस अधिकाऱ्याच्या तब्बल १९ गोळ्या खाऊनसुद्धा डी के राव जिवंत राहिला होता.
मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये डी के रावची केस सगळ्यात विचित्र होती. तो दिसायला साधारण होता. छोटा राजनसाठी काम करायचा पण तो एकदाही राजनला भेटला नव्हता आणि तरीही राजनचा खास माणूस बनला होता.
दाऊदच्या नजरेत छोटा शकीलचं जे स्थान होतं तेच स्थान राजनसाठी रावचं होतं. रावने अनेक वर्ष जेलमध्ये काढली होती आणि त्यामुळे त्याला कायद्याचं चांगलं ज्ञान होत तो बारीकसारीक पॉइंटवर वकीलांशी गप्पा मारायचा.
डी के रावचं ओरिजनल नाव रवी मल्लेश बोरा होतं पण एका चकमकीत त्याच्याकडे एका डी के राव नाव असलेल्या बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीचं ओळखपत्र सापडलं आणि त्याच नाव डी के राव कायम झालं. ओपी सिंग याने राजनवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला डी के राव ओपी सिंगला मारून घेतला होता, अंडरवर्ल्डमध्ये ओपी सिंगची हत्या ही सगळ्यात क्रूर मानली गेली.
डी के राव मरता मरता कसा वाचला याच्या कथा आजही मुंबई पोलीस आणि गुंड चवीचवीने सांगतात.
राजन आणि दाऊद हे एकमेकांची माणसं मारत होती. छोटा राजन १९९२ च्या बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या लोकांना मारत सुटला होता. राजनने डी के राववर शेख मोहम्मद एहतेशाम आणि बाबा मुसा चौहान यांना जबाबदारी सोपवली होती.
शेख मोहम्मद एहमतेशाहने शस्त्रास्त्रे उतरवणे आणि बाबा मुसा याने संजय दत्तला बंदूक देणे असे आरोप त्यांच्यावर होते. या दोघांना दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यासाठी ते न्यायालयात आलेले होते.
मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अंबादास पोटे यांची त्यांच्यावर नजर होती. या गुन्हेगार तिथे जमलेले होते त्यात डीके रावची टोळी सुद्धा होती. या पाच जणांच्या टोळीला इन्स्पेक्टर अंबादास पोटे यांनी दादरमध्ये झंडू फार्मास्युटिकल इमारतीजवळ अडवलं.
गुंड मारुती एस्टीममध्ये बसलेले होते, त्याच वेळी पोलिसांची जिप्सी तिथे आली त्यांनी गुंडांना गोळीबाराची संधी न देताच फायरिंग सुरु केली. सगळे मृतदेह व्हॅनमध्ये घालून पोलिसांनी नेले.
पण डी के राव वाचला, कसा वाचला याबद्दल तो स्वतः सांगतो,
टोळीतले राजे आणि विपीन जागीच मरण पावले, मी, रमेश आणि जयराम जिवंत होतो. जयरामला वेदना सहन न झाल्याने तो अम्मा म्हणून किंचाळला.
पोलिसांना कळलं कि कुणीतरी जिवंत आहे. त्यांनी पुन्हा धडाधड गोळ्या घातल्या. त्यात जयराम आणि रमेश दोघेही मेले. नंतर झाडलेल्या सगळ्या गोळ्या माझ्या पायांत घुसल्या. टोळीतले इतर चार जण माझ्या अंगावर पडलेले होते. पण सगळा वेळ मी शुद्धीवर होतो.
शेवटी गाडी केईएमच्या शवागाराजवळ आली तेव्हा मी ओरडलो, मी जिवंत आहे म्हणून. त्या दिवशी मला एकोणीस गोळ्या लागल्या आणि तरीही मी कसा जिवंत राहिलो ते मला माहिती नाही. लोक म्हणतात मला योगा येत असल्याने मी श्वास रोखून धरला असणार.
पण मी तसं म्हणणार नाही. माझ्या नशिबात होतं म्हणून मी वाचलो.
यानंतर पुढची दहा वर्षे डी के राव महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तुरुंगात होता. रावने दाऊदच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी दुबईला जाऊन दाऊदला मारण्याची तयारी दाखवली होती. एवढंच नाही २०१९ मध्ये कोर्टाच्या बाहेर डीके राववर हल्ला झाला आणि तिथंही वाचला.
तुरुंगातून सुटल्यावर धारावीत त्यानं आलिशान घर बांधलं. पोलिसांची अजूनही त्याच्यावर बारीक नजर आहे.
हे हि वाच भिडू :
- छोटा राजनला मिथुनचं इतकं वेड होतं कि तो कपडेदेखील मिथुनसारखे शिवून घ्यायचा.
- अंडरवर्ल्डचा अमजद खान, याच्या हत्येचा बदला म्हणून शर्मांनी राजनची निम्मी गॅंग संपवली..
- भारतातून पळून गेलेला दाऊद मुंबईच्या अंडरवर्ल्डवर इकबालच्या रूपात राज्य करायचा
- ठाण्याच्या विनाश पथकाची दहशत एवढी होती कि खुद्द दाऊदसुद्धा त्यांच्यासमोर टरकायचा….