दाते पंचांगाची गणितं अचूक यावीत म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीचा कागद केला होता

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचांगाला खूप जास्त महत्त्व आहे. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल, तिथी बघायची असेल तर त्यासाठी पंचांगाला पहिला मान दिला जातो. उपवास, संस्कार, विधी, सण या सगळ्या गोष्टींसाठी एक विशिष्ट वेळ भारतीय संस्कृतीमध्ये पाळली जाते आणि ती वेळ पंचांगातूनच ठरवली जाते.

साधं उदाहरण द्यायचं झालं तर सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. अगदी लग्न ठरवायचं असेल तर त्या आधीही ब्राम्हणाकडे जाऊन पत्रिका दाखवली जाते आणि ती सुद्धा पंचांगानुसार बघितले जाते किंवा मुलगी पाहायला कोणत्या वेळेत जायला हवं तिथपासून ते लग्न लावायच्या मुहूर्तापर्यंत पंचांगाला स्थान असतंच.

शिवाय महाराष्ट्रात तर मराठी माणसांमध्ये ‘दाते पंचांग’ म्हणजे विषय खोल. अगदी डोळे बंद करुन दाते पंचांगावरती कित्येक वर्ष झाली लोकं विश्वास ठेवत आली आहेत. असं हे दाते पंचांग अख्ख्या महाराष्ट्राला दिलं ते आपल्या सोलापूरच्या दाते काकांनी. दाते काकांचा संपूर्ण नाव लक्ष्मणशास्त्री दाते. त्यांना नानाशास्त्री दाते म्हणूनही ओळखलं जायचं.

लक्ष्मीणशास्त्री दाते यांचा जन्म २९ सप्टेंबर १८९० ला झाला. सोलापूरनं महाराष्ट्राला अनेक व्यक्ती दिले मात्र नानाशास्त्री दाते हे त्यातलं अग्रणीचं नाव आपण समजू शकतो. कारण जवळपास एकशे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय दाते पंचांग अजूनही घराघरात आहे. आणि तेवढ्याच विश्वासाने लोक दाते पंचांगाचं नाव घेतात.

सुरवातीच्या काळामध्ये दाते पंचांग हे फक्त सोलापूरच्या पंचक्रोशी पुरतंच मर्यादित होतं. कारण त्यावेळी दळणवळणाची काही साधनं नव्हती. दळणवळणाची साधनं जशी वाढली तशी पंचक्रोशीची हद्द सुद्धा ओलांडली. मात्र लवकरच नानाशास्त्रींना जाणवलं की, त्यांनी तयार केलेल्या पंचांगामधील गणितामध्ये एकवाक्यता अशी नाहीये. त्यांना गरज होती ती फक्त एका प्रेरणेची.

ही प्रेरणा नानाशास्त्रींना मिळाली ती लोकमान्य टिळकांकडून. टिळक नेहमी म्हणायचे, “पंचांग हा आकाशाचा आरसा असला  पाहिजे.”

बस्स! टिळकांचं हे वाक्य नानाशास्त्रींनी मनाशी घट्ट बांधलं आणि आपलं पंचांग अगदी सुयोग्य कसं होईल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

नाना शास्त्रींनी दिवस-रात्र एक केले पंचांगाच्या अभ्यासासाठी. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर भयानक दुखत असायची. पण नानाशास्त्रींना अर्जुना सारखा माशाचा डोळा भेदायचा होताच. म्हणून या दुखण्यावर उपाय म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीवर गणितं सोडवायला सुरुवात केली.

प्रयत्नांना यश मिळालं. लवकरच नानाशास्त्री अचूक पंचांग बनवू लागले. त्यांच्या पंचांगाचं नाव लोक घेऊ लागले. अगदी पंचांग म्हटलं की नानाशास्त्री दाते असं समीकरण झालं. पुढे चालून नानाशास्त्री यांचे सुपुत्र धुंडिराजशास्त्री दाते यांनी सुद्धा याच कामात लक्ष घालायला सुरुवात केली आणि अशाप्रकारे घराचा वारसा चालत राहिला.

पुढे आधुनिकतेचं पाऊल टाकलं गेलं. नानाशास्त्रींचे नातू मोहन दाते यांनी पंचांगाला आणखी लोकप्रिय केलं. १९७७ सालापासून मोहन दाते या व्यवसायात आहेत. मोहनराव दाते यांनी दाते पंचांग लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग अशी संकल्पना बाजारात आणली. कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून दातेंचं पॉकेट पंचांग सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे पंचांग इंटरनेटचं युग सुरू झाल्यानंतर अजूनच ग्लोबल झालं आणि आता तर मोबाईल ॲप्सच्या रूपातही दाते पंचांग उपलब्ध झालं आहे.

अशा या दाते पंचांगाची सुरुवात करणारे नानाशास्त्री दाते यांचं पंचांग क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. भारत सरकारचं ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठीसुद्धा दाते यांच्याकडेच येत असतं. 

हे सर्व सुरू झालं ते लक्ष्मणशास्त्री दाते यांच्याकडून. आता पंचांग क्षेत्रात दाते घराण्याची चौथी पिढी काम करत आहे. पण सुरुवात ज्यांनी केली ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचं नाव आजही तेवढ्याच अभिमानाने महाराष्ट्र घेतो. याच लक्ष्मणशास्त्री दाते यांची आज म्हणजेच २५ जानेवारीला पुण्यतिथी असते. १९८० साली नानाशास्त्री दाते यांचं निधन झालं होतं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.