दाभोलकरांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि अंनिसची चळवळ खेडोपाडी पसरली.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. डॉ. लागू यांच्या जवळचे स्नेही आणि वर्गमित्र डॉ. राम आपटे हे जळगावला वैद्यकीय व्यवसाय करत होते. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने डॉ. लागू यांचे वर्षातून एकदातरी त्यांच्याकडे जाणं-येणं होत असे.

डॉ. राम आपटे जळगाव मध्ये अंनिस साठी काम करायचे. एकदा सहज गप्पा मारत असताना डॉ. आपटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी काही तरी करायला हवे ही कल्पना डॉ. लागूंसमोर मांडली. विषमता निर्मूलन समितीच्या माध्यमातून बाबा आढाव यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उपक्रमाची सुरुवात केली.

त्यांचा डॉ. लागू यांच्याशी संपर्क होताच, शिवाय इतरही काही मान्यवरांनी यात जोडले गेले पाहिजे असा विचार समोर आला.

त्यातून कला क्षेत्रातील डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, साहित्यिक ना. धो. महानोर असे अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले.

सामाजिक संस्थेत काम करणा-या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करावी या हेतुने डाॅ. श्रीराम लागू, निळु फुले, रोहिणी हट्टंगडी या मातब्बर मंडळींनी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उपक्रमास सुरुवात केली. महाराष्ट्रात ठिकठिकाणी नाटकाचे प्रयोग करुन त्यातुन मिळालेली रक्कम हि समाजकार्याला द्यावी, हा त्यामागे हेतु होता. डाॅ. श्रीराम लागू या कार्याचे अध्यक्ष होते. तर डाॅ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्यवाही.

निळू फुले आणि डॉ. लागू मुख्य कलाकार असलेल्या लग्नाची बेडी या नाटकाचे महाराष्ट्र्भर प्रयोग करायचं ठरलं.

‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग करताना डाॅ. लागू आणि डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचा परिचय झाला. परंतु त्यापलीकडे या दोघांची ओळख नव्हती. निधी उभा करण्यासाठी नामवंत नटसंचात ‘लग्नाची बेडी’ नाटकाचे ३० प्रयोग लावण्यात आले. आखणी, नियोजन करण्याचे काम या कलाकारांनी हाती घेतलं. नाटक बसवलं आणि नंतर त्याचे प्रयोगही झाले.

डॉ. लागू आणि निळूभाऊंसारखे कलाकार नाटकात असल्यामुळे अनेक मान्यवर, दिग्गज मंडळी यासोबत जोडले गेले. तनुजा, रिमा लागू, सदाशिव अमरापूरकर, अशोक सराफ असे अनेक दिग्गज अभिनेते नाटकाच्या प्रयोगामध्ये सहभागी झाले.

हळूहळू नाटकाच्या प्रत्येक प्रयोगागणिक दाभोलकर आणि लागूंची ओळख वाढत होती.

या दरम्यान डाॅ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनावर ‘तिमिरभेद’ या पुस्तकाची निर्मिती करत होते. त्यानिमित्ताने डाॅ. नरेंद्र दाभोलकर ‘मी बुद्धीप्रामाण्यवादी कसा झालो’ या विषयावर ‘लग्नाची बेडी’ चा ३० वा प्रयोग झाल्यावर डाॅ. लागूंची मुलाखत घेणार होते. चिपळुण येथे शेवटचा प्रयोग झाल्यावर हि मुलाखत संपन्न झाली. या मुलाखतीत डाॅ. लागूंनी देवाबद्दलची आपली रोखठोक मतं मांडली. मुलाखत झाल्यावर डाॅ. लागू दाभोलकरांना म्हणाले,

सवड मिळाली तर संपुर्ण महाराष्ट्रभर जाहीरपणे हि मतं मांडण्याची इच्छा आहे. यानंतर भरपुर शिव्या खाण्याची जबाबदारी मी अर्थातच ठेवली आहे.

इथेच सुरुवात होती हे दोन डाॅक्टर एकत्र येण्याची.

एके दिवशी बार्शी येथे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या एका कार्यक्रमाला डाॅ. लागू सोलापुरमार्गे जाणार होते. त्यांना सकाळचा वेळ तसा निवांत होता. या वेळामध्ये एका स्थानिक संस्थेने देव आणि धर्म या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित केला.

या परिसंवादात डाॅ. लागू आणि डाॅ. दाभोलकर या दोघांनीही भाग घेतला. कार्यक्रम बघण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी झाली. प्रत्येक मान्यवराला फक्त १५ मिनिटात स्वतःची भुमिका मांडायची होती. दोघांनीही आपापली मतं मांडली. हि मतं मांडण्यासाठी वेळ कमी पडला, याची दोघांनाही जाणीव झाली.

या कार्यक्रमापासुन पुढे बार्शीला जाताना दाभोलकर लागूंना म्हणाले,

“याच विषयावर वादविवाद करण्यासाठी तुम्ही मला दोन महिन्यांतुन एक दिवस द्या.”

लागूंनी दाभोलकरांची हि विनंती लगेच मान्य केली. इतकंच नव्हे तर त्यावेळी लागूंनी सिनेमात काम करणं कमी केलं होतं. त्यामुळे डाॅ. लागूंनी दाभोलकरांना महिन्याचे दोन दिवस दिले. कार्यक्रमाचं नाव ठरलं ‘विवेक जागराचा वाद-संवाद’. बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र या दोन्ही डाॅक्टरांनी पालथा घातला.

या कार्यक्रमाचं स्वरुप असं होतं, ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल तिथे लोकांकडून आलेल्या प्रश्नांच्या आधारे या दोघांची मुलाखत घेण्यात येत असे. आलेल्या प्रश्नांना उत्तरं देता देता डाॅ. लागू आणि डाॅ. दाभोलकर आपले विचार मांडायचे. हा कार्यक्रम महाराष्ट्रात ठिकठिकाणी जसा गाजू लागला, तसं अनेक संस्थांनी या दोघांना आमंत्रणं देऊन कार्यक्रमाचं संयोजन केलं.

डाॅ. लागूंच्या सोबत गाडीने एकत्र दाभोलकर हा दौरा करत होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाखा संपुर्ण महाराष्ट्रात होत्या. त्यामुळे अनेकदा या शाखांकडून कार्यक्रमाचं आयोजन व्हायचं. डाॅ. लागूंना कार्यक्रमाचं कोणतंही मानधन दिलं जात नव्हतं. परंतु तरीही दाभोलकर कार्यक्रमाचा स्थानिक खर्च वगळता जे पैसे उरायचे, ते गाडीसाठी लागणा-या पेट्रोलच्या किमतीपोटी डाॅ. लागूंच्या हातावर ठेवायचे. ती रक्कम किती आहे हे न बघताच, डाॅ. लागू या रकमेचा स्वीकार करायचे.

खुपदा कार्यक्रमस्थळी असलेली राहण्याची सोय जेमतेम असे, परंतु कधीही डाॅ. लागूंनी त्याविषयी तक्रार केली नाही. हे दोन्ही डाॅक्टर ज्या कार्यासाठी एकत्र आले होते, त्यापुढे अशा गोष्टी त्यांच्यासाठी गौण होत्या.

कार्यक्रम कितीही रंगत असला तरीही दीड तासच करायचाय, हा दोघांमध्ये अलिखित नियम बनला. दीड तास संपायला पाच मिनीटं वगैरे राहिली असतील तर डाॅ. लागू दाभोलकरांना समजेल अशा पद्धतीने त्यांना घड्याळ दाखवायचे. डाॅ. लागूंचा असंख्य चाहतावर्ग या कार्यक्रमांना हजेरी लावायचा. यामुळे श्रोत्यांची अपेक्षा लक्षात घेता, जास्तीत जास्त प्रश्न डाॅ. लागूंसाठी असावेत असा दाभोलकरांचा प्रयत्न असायचा.

चळवळीच्या दृष्टीकोनातुन येणा-या प्रश्नांची उत्तरं दाभोलकर द्यायचे.

विषय वैचारीक आणि वेगळा असल्याने सतत विचारांचा भडीमार केल्याने श्रोते कंटाळतात, हि गोष्ट लक्षात ठेऊन डाॅ. दाभोलकर उत्तरं देताना चळवळीच्या अंगाने त्यांना आलेले अनुभव मांडायचे. दोन्ही डाॅक्टरांनी या कार्यक्रमात विचार आणि अनुभव याचा समतोल उत्तम साधल्याने हा कार्यक्रम रंगायचा.

डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि डाॅ. श्रीराम लागू जेव्हा धर्माबद्दल, अंधश्रद्धेबद्दल विचार मांडायचे तेव्हा देवधर्माचे ठेकेदार म्हणवणा-या तथाकथित समाजाने या दोघांचा कार्यक्रम उधळुन लावण्याचा प्रयत्न केला.

इतके मोकळे विचार ऐकण्याची मनोवृत्ती त्यांची नसायची. दोघांनाही कित्येकदा धमक्यांचे फोन, पत्र यायची. परंतु कोणाचीही भीती न बाळगता निर्भिडपणे दोघांनीही आपले विचार समाजापुढे मांडायचे काम केले.

१९८८ पासून ते १९९५-९७ पर्यंत डॉ. लागू आणि निळूभाऊंनी मराठीतील एक नाटक हिंदी, इंग्रजीत बसवून त्याचे देशासह परदेशातही काही प्रयोग केले.

तसेच लागू आणि फुले दरवर्षी त्यांच्या कमाईतील पैसे निधीमध्ये देणगी म्हणून देतच होते. शिवाय व्यक्तिगत पातळीवरही काही कार्यकर्त्यांना त्यांनी अनेकदा मदत केली आहे. अशा पद्धतीचा लागूंचा तो प्रवास, संवाद सुरू झाला.

इतर कोणी असो अथवा नसो निळूभाऊ आणि लागू दाभोलकरांच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिले आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी पोहचवलं.

आज डाॅ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन. डाॅ. दाभोलकर अनेकदा आपल्या भाषणात एक वाक्य म्हणायचे, ते वाक्य असं…

“लोग मेरी बात सुनेंगे जरुर, लेकिन मेरे मरने के बाद”.

आज डाॅ. श्रीराम लागूही आपल्यात नाहीत. स्वतःची प्रत्येक भुमिका विज्ञानाच्या अंगाने मांडणारा डाॅ. लागूंसारखा इतका बुद्धिजीवी कलाकार आता आढळणं दुर्मिळच. हि दोन्ही माणसं आपल्यात जरी नसली, तरीही त्यांनी मांडलेले विचार जर आपण आत्मसात केले तर हिच या दोघांनाही खरी आदरांजली ठरेल.

  •  देवेंद्र जाधव

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.