१६ हजारात निवडणूक जिंकली अन् पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचा झेंडा पुरंदरवर फडकला

१९७२ मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल होता. याच काळात संपूर्ण देशाबरोबरच भयाण दुष्काळाने सगळा पुरंदर तालुका मोडून पडलेला. दोन वेळच्या अन्नाला माणसे महाग झालेली. सुपारीऐवजी माणसे चिंचोके भाजून खायची. 

याच दुष्काळी काळात विधानसभा निवडणूक लागली. त्यात समाजवादीचे नेते दादा जाधवराव निवडणुकीला उभे राहिले.

पुण्यातल्या पुरंदरमधून तब्बल सहावेळा आमदार म्हणून निवडू आलेले दादा जाधवराव हे नाव पुरंदरच्या राजकीय इतिहासात कायमच महत्वाचं मानलं जाईल ते समाजवादी विचारांशी बांधीलकी असलेले आणि कायमच कॉंग्रेसविरोधी राहिले आहेत. 

५० वर्षांपासून राजकारणात असलेल्या दादा जाधवरावांची ओळख म्हणजे, समाजवादी पक्षातून त्यांनी तब्बल ९ वेळेस विधानसभेचं तिकीट मिळवलं आणि त्यातील ६ निवडणूका जिंकून विधानसभेत प्रवेश मिळवला. 

आपल्या कारकिर्दीच्या अगदी सूरुवातीच्या काळात दादा शेतकरी कामगार पक्षाचं काम बघत. हळूहळू पाय पसरत दादांनी खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी येथेही आपली माणसे निवडून आणली. १९६७ साली दादा पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले जिंकून आले. १९७२ पर्यंत जिल्हा परिषदेवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले.  

१९७१ च्या दरम्यानच प्रजासमाजवादी आणि संयुक्त समाजवादी जनता दल या दोन पक्षांचं एकीकरण झालं. 

प्रजासमाजवादी पक्षात दादा जाधवराव, गोपाळराव गायकवाड, बबनशेठ पोमण, नानासाहेब गोरे, नाथ पै असे धुरंधर लोकनेते होते.  तर समाजवादी पक्षात रावसाहेब पवार, बाळासाहेब मुळीक, बबन मांडरे, एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नाडिस आणि मधू लिमते अशी फर्डी माणसे होती.

पुरंदर तालुक्यात विधानसभेचे तिकीट कोणाला मिळणार? दादा जाधवराव यांना की बाळासाहेब मुळीक यांना? असा प्रश्न निर्माण झालेला. 

दोघेही निर्मळ मनाचे नेते जिवाभावाचे कार्यकर्ते. चोवीस तास एकमेकांच्या पाठीशी उभे राहणारे, तिकीट कोणाला द्यायचं याचा निर्णय पुण्याच्या काकाकुआ मेन्शनमध्ये होणार होता. बाहेर कार्यकर्ते वाट बघत होते. 

आणि दादा जाधवांना विधानसभेचे तिकीट जाहीर झाले.  

त्यांचे पहिले अभिनंदन बाळासाहेब मुळीक यांनी केले. हातात हात घालूनच दोघे बाहेर आले. बाळासाहेब मोठ्या मनाचे. पुरंदर गडाएवढे काळीज त्यांना लाभलेले, दादांचे अभिनंदन करत म्हणाले, “अभिनंदन दादा! आजपासून तुमच्या प्रचाराला सुरुवात करू”. वैर नाही. मनात राग नाही. कसला द्वेष नाही. त्यावेळचे राजकारणच तसे होते. 

असो तर विधानसभेची निवडणूक म्हणावी एवढी सोपी वाटत नव्हती. साक्षात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराशी गाठ होती.  विरोधक होते ज्ञानेश्वर उर्फ बापूसाहेब खैरे. जिल्ह्यात त्यांना मान होता. काँग्रेसची बैलजोडी गावागावांत पोचली होती. खैरसाहेबांचा जनसंपर्कही मोठा होता. त्यांनी काँग्रेस गावागावात पोहचवली होती.  त्यात ते खर्डे वक्ते होते त्यांच्या भाषणाला गावा-गावातले लोकं गर्दी करत.

पण दादांना मोठी अडचण वाटत होती ती त्यांच्या वक्तृत्वाची. दादांच्याकडे वक्तृत्व नव्हते. 

त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अनेक जाणत्या वक्त्यांची व्याख्याने ऐकली होती. आचार्य अत्रे, क्रांतीसिंह नाना पाटील, पन्नालाल सुराणा, केशवराव जेधे, भाई माधवराव बागल, एन. डी. पाटील, तुळसीदास जाधव… असे एकापेक्षा एक तयारीचे वक्ते दादांनी ऐकले होते. अशा मोठ्या वक्त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून दादा हळूहळू बोलू लागले. ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामाला लागले. 

दादांचे सगळेच कार्यकर्ते निःस्वार्थी, घरून भाकरी बांधून आणत. सायकलवरून प्रचार करत. तेव्हा देशभर काँग्रेसचीच सत्ता होती. त्यांना आर्थिक पाठबळ होतं. सर्वत्र सहकारी संस्था त्यांच्याच शासनही त्यांचेच. त्यांना आर्थिक मदतीचे हजारो स्रोत होते.

समाजवादी फाटके, एक दादा सोडले तर आर्थिकदृष्ट्या सगळेच कमजोर. त्यात दादांची भूमिका ठाम ‘मी जनतेच्या पैशाला कधीच हात लावणार नाही.’ दादा आपल्या मतांशी शेवटपर्यंत ठाम राहिले. पण पक्षाला आर्थिक मदत करणारी काही देवमाणसे भेटली. शशी वाल्हेकर हे राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते. त्यांचा व्यवसाय चांगला चाललेला. त्यांनी पक्षाला पाच हजाराची मदत केली.  किशोर पवार हे पक्षाचे नेते. त्या साखर कामगार संघटनेचे प्रमुख त्यांनी पाच हजार रुपये दिले. बाकी कार्यकत्यांनी चिरीमिरी दिली. 

आणि अशा पद्धतीने अवघ्या सोळा हजार रुपयांची जमवाजमव झाली. दादा निवडून यावेत यासाठी एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नाडिस, बाबा आढाव, आठल्ये गुरुजी, मृणाल गोरे यांनी आवर्जून दादांसाठी पुरंदरमध्ये सभा घेतल्या.  त्यांच्या पाठींब्याने आणि त्या १६ हजारांच्या मदतीने दादांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत दादांना २९,५८६ मतं मिळालीत तर खैरेंना २१,३६७.  

काँग्रेसचे सलग दहा वर्षे आमदार असलेले ज्ञानेश्वर उर्फ बापूसाहेब खैरे यांचा दादांनी बहुमताने पराभव केला. समाजवादी पक्षाने इतिहास घडविला आणि पुढे तीस वर्षे काँग्रेसला पुरंदरचें दरबाजे कायमचे बंद केले.

राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा समाजवादी पक्षाचा झेंडा पुरंदर तालुक्यावर फडफडला.

पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून दादा जाधवराव विधानसभेत गेले. दादा तसे सर्व आमदारांत तरुण होते. विधानसभेत पाऊल ठेवल्यावर काही वेळ दादा शांत होते. बघावे तिकडे पहाडाएवढी बुलंद माणसे, वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहिते पाटील. एकापेक्षा एक सरस राजकारणातील ही नरसले पाहून दादा भारावले.

तेवढ्यात विरोधकांनी दादांना खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक पत्रक काढले. ‘न बोलणारा आमदार निवडून देऊन जनतेचा काय फायदा होणार ? असा सवाल या पत्रकातून विचारला. दादा दुखावले. पण सहकाऱ्यांनी धीर दिला. गोपाळराव गायकवाड रागावले.  

पहिल्या अधिवेशनाच्या वेळी दादांना म्हणाले, “दादा, या अधिवेशनात तुम्हाला बोलावेच लागेल. नाही बोललात तर पुरंदरला गेल्यावर मी तुमचा राजीनामा मागेन.” दादा हसले. अधिवेशनात भाषण करण्याचे त्यांनी मान्य केले.

दादांनी भाषणाची तयारी केली. आधी सगळे भाषण लिहून काढले. चार वेळा वाचले. मग मुद्दे काढले. आश्चर्य म्हणजे २८८ आमदारांच्या पहिल्याच अधिवेशनात दादांनी बारा मिनिटांचे भाषण केले. त्याकाळात आलेल्या भीषण दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्याचे विविध प्रश्न मांडले. 

संध्याकाळपर्यंत भाषणाच्या प्रती टाईप होऊन मिळाल्या. बापूसाहेब खैरे यांचा पराभव करणारा पुरंदरचा नेता आहे तरी कसा हे पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते. त्या गर्दीसमोर दादांना लाजल्यासारखं व्हायचं. 

“न बोलणारा आमदार निवडून देऊन जनतेचा काय फायदा होणार? या सवालाला उत्तर देत ते लोकांना म्हणायचे, “मी बोलका पंडित नाही. कर्ता पंडित आहे.” 

ते बोलल्याप्रमाणे, वसंतदादा पाटलांनी काढलेली ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम  नानासाहेबांनीच खऱ्या अर्थाने राबविली. पुरंदर तालुक्यात पाण्याची काय अवस्था बिकट होती. रोज शंभर टँकर तालुक्याला पाणी पुरवत असत. 

दादांनी काम सुरु केलं.  गावोगावचे कार्यकर्ते हाताशी घेतले डोंगराळ तालुका असलेल्या पुरंदरमध्ये पाच वर्षात ६७ पाझर तलाव बांधले. १८०० सिमेंट बंधारे उभे केले. चार हजार चारशे ठिकाणी नालायडिंगची कामे केली. कन्हा नदीवर कोल्हापूरटाईन सहा बंधारे उभारले. नीरा नदीवर चार बंधारे बांधले. सगळा परिसर टँकरमुक्त झाला.

एक काळ असा होता की महाराष्ट्रातला पहिला टँकर पुरंदर तालुक्यातील पानवडी आणि काळदरीला लागायचा. या गावांना रस्ता, लाईट नव्हती. आज दादांमुळे ही गावे टँकरमुक्त झालीत. डोंगराळ भागातल्या हातांना काम नव्हते. दादांनी कार्यकत्यांना साद घातली. याच काळात मोटरसायकलवर संपूर्ण पुरंदर तालुका पिंजून काढला.. दुष्काळ हे संकट समजून हजार हातांना काम मिळवून दिले. रस्त्यांची कामे काढली. लोकांना गहू सुकडी मिळू लागली..

 

पाझर तलाव, बंधारे झाले. शिवारात पाणी फिरले. दादांच्या रूपाने आधुनिक भगीरथ खरी गंगा लोकांच्या दारात आली.

“मी बोलका पंडित नाही. कर्ता पंडित आहे”, हे त्यांनी दाखवून दिले. दादा जाधवराव वयोमानामुळे गेल्या काही वर्षापासून ते राजकारणापासून काहीसे अलिप्त आहेत. मात्र पुरंदर तालुक्याच्या इतिहासात महत्वाचे आहेत.

 

सासवड इथे ११ जून रोजी पार पडलेल्या सहकाररत्न चंदूकाका सराफ यांच्या स्मारकाचे उदघाटनाची कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे त्यांची पुन्हा एकदा आठवण झाली.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.