दादा कोंडके यांच्या नंतर सेनेचे नेते भाषण करायला घाबरत असायचे.

ते म्हणतात ना तुम्ही राजकारणापासून दूर राहू शकता पण राजकारण तुमच्या पासून दूर राहू शकत नाही, अगदी तसंच दादा कोंडकेंच्या बाबतीतही झालं…त्यांचा आणि शिवसेनेचा जसा सबंध आला तसा त्यांनी  शिवसेनेच्या अनेक सभा गाजवल्यात.

शिवसेनेतर्फे दादा कोंडकेंनी बऱ्याच सभा घेतल्या होत्या आणि त्यांच्या भाषणात अनेक विरोधी नेत्यांवर त्यांनी तोंडसुख घेतलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं भाषण नायगाव मध्ये केलं होतं जेंव्हा ते सेवा दलामध्ये होते. सेवादलामधून निघाल्यावर त्यांचा भाषणाची काही संबंध आला नव्हता पण त्यानंतर काही वर्षांनी एक छोटेसे भाषण केलं तेही कोहिनूरच्या चौकात सोंगाड्याचा वाद निर्माण झाला होता तेव्हा.

कोहिनूर थेटर वाला कपूर एका मराठी निर्मात्यावर कसा अन्याय करतो याविषयी त्यांनी एक छोटसं भाषण केलं होतं.

त्यानंतर बाळासाहेब दादांना त्यांच्याबरोबर अनेक सभांना घेऊन जाऊ लागले. त्यावेळी शिवसेनेचा इतका जोर नव्हता. पुण्यातल्या शनिवार वाड्यासमोर झालेल्या त्यांच्या पहिल्या मोठ्या सभेसाठी देखील बाळासाहेबांनी दादांना बरोबर घेऊन गेले होते. दादा कोंडके यांचा शिवसेनेशी संबंध आल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय भाषणांची सुरुवात झाली होती. त्या काळात ते काँग्रेस नेत्यांनी विरुद्ध वाट्टेल ते बोलणारा एकमेव वक्ते होते.

भाषणाच्या बाबतीत दादा कोंडके आचार्य अत्रे यांना गुरु मानायचे. अत्रे कधीही भाषण लिहून आणत नसायचे. पण फार हजरजबाबी व हशा घेणारी त्यांची भाषणे असायची. अत्रेंसोबत दादांची बरोबरी होणे शक्य नाही पण दादांच्या भाषणाला देखील बराच हशा मिळायचा.

त्यांच्या भाषणात शरद पवारांवर वाट्टेल ते बोलत असले तरी त्यांचे आणि शरद पवार यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे त्यांचे शंकरराव चव्हाण, ए. आर. अंतूले यांच्याशी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं. जिथे दादा कोंडके यांचे भाषण असायचे तिथे ए. आर. अंतूले भाषण करायला तयार व्हायचे नाहीत. ते म्हणायचे “दादा कोंडके येऊन बोलून गेला का? मग मी नाही येणार.’

प्रत्येक दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची सभा असते दर सभेला दादांना बाळासाहेबांचं आमंत्रण असायचं.

मध्ये मध्ये तर त्यांनी सभेला जाणं बंद केलं होतं त्याचं कारण काय तर एकतर भाषण करण्यासाठी त्यांना फक्त दहा-पंधरा मिनिटेच मिळू लागली. त्यात ते काय बोलणार? शिवाय स्टेजवर चपला काढून बसायचा असल्यामुळे त्यांच्या चपला चोरीला जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मिटींगला जाणं बंद केलं होतं.

शिवाय शिवसेनेत काही माणसं बाळासाहेबांचे दादांच्या विरोधात कान भरत असायचे असं दादांनी स्वतःचं लिहिलं आहे. मंत्र्यांनी नेहमीच शेवटी बोलायचं राजकीय सभेचा प्रघात असतो. पण मंत्र्यांच्या आधी दादांचे भाषण झालं की मंत्र्यांची पंचाईत होत असायची.

दादा कोंडके यांनी असे लिहिले की कणकवलीला नारायण राणे यांच्या मीटिंगला ते गेले असता, दादा कोंडके यांच्या भाषणानंतर राणे यांचं भाषण होतं.

पण दादांचे भाषण संपल्यावर लोकं उठायला लागले शेवटी राणे यांनीच लोकांना सांगितलं. हे पहा बसा खाली दादांची गाणी ऐकायची आहेत ना तुम्हाला, मग लोक पुन्हा बसले. मंत्र्यांच्या भाषणापेक्षा दादांचे भाषण ऐकायलाच लोकं उत्सुक असतात हे शिवसेनेच्या मंत्र्यांना आवडत नसायचं. त्यामुळे दादांना सभेला बोलवलं की त्यांची पंचाईत होत असायची म्हणूनच शिवसेनेचे राज्य आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून अन्य बहुतेक मंत्र्यांनी कुठल्याही समारंभाचे आमंत्रण दादांना देणं बंद केलं होतं.

याबाबत दादा कोंडके यांनी त्यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रात लिहिलं आहे. 

” ज्या शिवसेनेसाठी मी उभ्या-आडव्या महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या, उन्हातान्हाची पर्वा न करता शिवसेना नेत्यांचा प्रचार केला त्यांच्याच राज्यात मला अशी वागणूक मिळत आहे याचं मला खूप वाईट वाटतं. हे मी सर्व बाळासाहेबांच्या मैत्रीखातर निस्वार्थी मनाने केलं पण एक माणुसकी म्हणून तरी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माझ्याशी आपुलकीने वागावं अशी अपेक्षा मी करू शकत नाही का? यश मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीने आपल्या जवळच्या माणसांना मिश्रा व तसेच माझ्या बाबतीत हे मंत्री वागत आहेत”.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.