सिनेमातल्या स्टाईलने दादा कोंडकेनी हिरॉईनचा जीव वाचवला होता.

मधु कांबीकर. मराठीतल्या प्रथितयश अभिनेत्री आणि नृत्यांगना. प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कलावंत म्हणून मधू कांबीकर यांना ओळखले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील कांबी गावात कोल्हाटी समाजात जन्मलेल्या मधु कांबीकर यांना अगदी लहान वयात पायात घुंगरू बांधावे लागले. तिथून सुरू झालेला प्रवास अनेक संकटांना झेलून मोठ्या पडद्या पर्यंत पोहचला. त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली.

त्यांच्या जीवनात आलेला एक कसोटीचा प्रसंग कोल्हाट्याच पोर या पुस्तकामध्ये वर्णन केलेला आहे.

मधु कांबीकर एकदम प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या तेव्हाचा काळ. अनेक सिनेमे सुरू होते. बरेच नवीन ऑफर देखील मिळत होते. अशातच काही जण त्याना एका टिव्ही सिरीयलसाठी संपर्क करत होते,

“मधुबाई आपण जर आमच्या सिरियलमध्ये काम केलं तर आम्ही खूप आभारी होऊ.”

मधु कांबीकर यांनी त्यांना घरी बोलावलं. त्या दिवशी तीन जन त्यांच्या घरी आले. सिरीयलचे कथानक ऐकवलं. जुजबी बोलणी केली.

या माणसांचे अविर्भाव थोडे विचित्र वाटत होते.

त्यातला एक जण मधुबाईंना म्हणाला,

“पुढच्या बोलणीसाठी तुम्हाला आमच्या बंगल्यावर यावं लागेल. तिथं बाकीचे सर्व कलाकार आलेले आहेत. सर्वांचं एकमत घेऊन पुढची तारीख ठरवू.”

मधु कांबीकरांना त्या माणसांचं बोलणं, एकंदरीत हालचाली पाहून संशय येऊ लागला होता. हा सगळा बनाव आहे आणि

आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे हे लक्षात आले होते.

पण त्या धाडसी होत्या. या मवाल्यांना सहजासहजी जाऊ द्यायचं नाही, त्यांना धडा शिकवायचा हे मधुबाईंनी ठरवलं. त्या त्यांच्याबरोबर बंगल्यावर जाण्यासाठी निघाल्या.

त्या माणसांनी कार आणली होती. मधुबाई पुढे ड्रायव्हरशेजारी बसल्या तर ती तीन माणसे मागे बसली. मधुबाईंनी त्यांना सांगितलं,

“दादर कडून गाडी वळवा. मला काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि एक मैत्रीण आहे तिला भेटायचं देखील आहे.”

दादरला गाडी एका बंगल्याजवळ थांबली. मधुबाई 15 मिनिटात येते अस म्हणत बंगल्यात शिरल्या.

तो बंगला होता सुपरस्टार दादा कोंडके यांचा.

त्याकाळी दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची असलेली मैत्री सर्वश्रुत होती. मधुबाईंनी त्यांच्या सोबत काही सिनेमात काम केलं होतं.

आपल्यावर आलेल्या संकटातुन दादाच बाहेर काढतील याची मधु कांबीकर यांना खात्री होती. त्यांनी दादांना सगळ सांगितलं.
मधु कांबीकर च्या अपहरणाचा प्लॅन सुरू आहे हे दादांच्या लक्षात आलं.  दादा म्हणाले,

” घाबरू नकोस. मैत्रिणीने चहाला घ्यायला बोलावलं आहे असं सांगून त्यांना आत बोलावून घे. पुढचं मी बघतो.”

मधु कांबीकर यांनी दादांनी सांगितलं तसं केलं. ते तिघे दादांच्या बंगल्यात आले. मागून गेट बंद झाले. आत गेल्यावर समोर खुद्द दादा कोंडके उभे आहेत ते पाहिल्यावर त्या तिन्ही भामट्यांची टरकली.

दादांनी अस्सल कोल्हापुरी भाषेत त्यांची कसून चौकशी केली.

त्या तिघांची घामाने शरीरे भिजली. पण ते काहीही सांगायला तयार नव्हते. अखेर दादांनी आपले तीन चार बलदंड बॉडीगार्ड आत बोलावले.

त्यांनी त्या तिघा भामट्यांना तुडवून काढलं. दादांनी अखेरचा दम दिला,

“तुम्ही जर खरं सांगितलं नाही तर इथं तुम्हाला जीव जाई पर्यंत मारून पोलिसांच्या हवाली करून देईन, गजाआड टाकीन. मुकाट्याने सगळं खरं सांगा”

मग त्यांनी सगळं खरं सांगितलं. त्यांचा सिरीयल वगैरे सगळं खोटं होतं. मधु कांबीकर या मोठ्या संकटातून वाचल्या. त्या म्हणतात,

कितीही यश आलं तरी बाईमाणसाला अशा जीवघेण्या प्रसंगातून जावे लागते. त्या दिवशी दादा देवासारखे धावून आले म्हणून माझा निभाव लागला नाही तर माझं काय झालं असत सांगता येत नाही.”

दादा कोंडके हे फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरोच होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.